http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, June 6, 2020

116 BahujanNama cream-3 Daily Lokmanthan 7 June 2020

बहुजननामा-116
क्रिमी लेयरः लांडगा आणी बगळा (अंतिम भाग-3)
-1-
क्रिमी लेयर (दुधावरची साय) केवळ अट नसून ते शोषणाचे तत्व कसे आहे, हे आपण क्रिमी लेयरच्या पहिल्या लेखांकात (बहुजननामा-114) पाहिले, दुधावर साय (क्रिम) कसे तयार होते व ते तयार होतांनाच का व कसे नासवीले जाते, हे आपण दुसर्‍या लेखांकात (बहुजननामा-115) पाहिले. आता आपण या तिसर्‍या अंतिम लेखांकात क्रिमी लेयर तत्वाच्या मागे नेमके काय तर्कशास्त्र आहे, त्याचे समर्थन कशा पद्धतीने केले जाते व ते तत्व कसे नष्ट केले जाऊ शकते, ते आता पाहू या!
शासक व शोषक ‘‘पुरूषी जात-वर्ग’’ त्यांच्या हिताचे सिद्धांत व तत्वज्ञान जनतेवर लादत नसते, तर ते पद्धतशीरपणे गळी उतरविले जाते. त्यांना माहित असते की आपला हा सिद्धांत मूळात ‘वाईट’च आहे. त्याला असाच्या असा जनतेसमोर मांडला तर आपण उघडे-नागडे होऊ. त्यासाठी ते आपल्या सिद्धांताला सुंदर आकर्षक रंगी-बेरंगी कपडे घालून जनतेसमोर सादर करतात. त्यांना एक माहित असते की, सर्व-सामान्य जनता शिक्षित-अशिक्षित असली तरी ती भोळी व अंधश्रद्ध असते. सर्वसामान्य जनतेतल्या काही मुठभर हुशार लोकांना हे षडयंत्र लक्षात येते, परंतू अशा मूठभर लोकांवर आधीच ‘‘ब्राह्मणद्वेष्टा-मराठाद्वेष्टा’’ असा शिक्का मारलेला असतो त्यामुळे त्यांचे कुणीही ऐकत नाहीत. आपल्या सर्व महापुरूषांची अवस्था अशीच आहे. महापुरूष मेल्यावर मग त्यांचा जयजयकार केला जातो, परंतू तो पर्यंत शासक-शोषकांचा उद्देश सफल झालेला असतो.
या क्रिमी लेयरच्या कडू गोळीला वरून ‘गोड व सुंदर’ आवरण लावलेले असते. वरवर गोड लागले की ती गोळी सरळ पोटात जाते व वीष पसरविण्याचे काम फत्ते होते. क्रिमी लेयरच्या तत्वाचे असेच गोड समर्थन केले गेले. ‘‘आरक्षणाचा लाभ खर्‍या गरीब लोकांनाच मिळाला पाहिजे, त्यासाठी ओबीसीतील श्रीमंतांना आरक्षणाचा लाभ घेण्यापासून वगळले पाहिजे’’, अशी भुमिका घेत सुप्रिम कोर्टाने क्रिमी लेयर तत्व अस्तित्वात आणले. आता गरीब शब्द कानावर पडताच सर्वसामान्य माणूस लगेच ‘दयाळू’ बनतो. रस्त्यावर कुणी गरीब भिखारी दिसला कि, बरेचसे लोक पटकन खिशात हात घालतात व दोन-चार आणे देऊन टाकतात. ही मानवतावादी भुमिका उदात्त असते. त्यामुळे त्या काळात अनेक विचारवंत व नेत्यांनी सुप्रिम कोर्टाच्या क्रिमी लेयर तत्वाचे ‘चांगली अट’ म्हणून स्वागत केले.  या सर्व उदार लोकांनी पटकन ओबीसींच्या खिशात हात घातला व दोन-चार आणे देऊन टाकले. त्यामुळे या बुद्धिवंतांवर या क्रिमी लेयर अटीचे वैचारिक विश्लेषण करण्याची जबाबदारी आलीच नाही. या विचारवंतांनी क्रिमी लेयरला एक ‘तत्व’ म्हणून समजून घेतले असते तर त्यांना त्याचे वैचारिक विश्लेषण करण्याची गरज भासली असती.
कोणीही डावी वा पुरोगामी व्यक्ती (अपवाद वगळता) नेहमीच विशलेषण करतांना शोषक-शोषिताची भाषा वापरते. परंतू जातीचा संदर्भ आला की यांची भाषाच बदलते. शोषक-शोषित ऐवजी ते ‘‘गरीब-श्रीमंत’’ अशी भाषा वापरायला लागतात. वास्तविक जगाच्या पाठीवर कुठेही ‘गरीब-श्रीमंत’ असा भेद अस्तित्वाच नाही. शोषणाच्या व्यवस्थेतून वर्ग भेद, जातीभेद वा वंशभेद निर्माण होतात, गरीब-श्रीमंत भेद नाही. गरीबी वा श्रीमंती हे शोषणाचे परिणाम आहेत, शोषणाचे कारण नाहीत. एखादी व्यक्ती गरीब का आहे, तर तीच्याजवळ शोषणासाठी उत्पादन साधनांची मालकी नाही म्हणून! एखाद्या गरीबाला अचानक सट्टा-लॉटरी लागली तर त्याला आपण ‘श्रीमंत’ झाला असे म्हणतो. परंतू ते खरे नाही. सट्टा-लॉटरीच्या स्कीममध्ये असंख्य लोक आपली कमाई गमावतात व मूठभर लोक पैसे कमावतात. सट्टा-लॉटरी ही शोषणाची स्कीम आहे व श्रीमंती-गरीबी हे त्या शोषणाचे परीणाम आहेत.    
त्यामुळे जगात कोठेही गरीब-श्रीमंत असे वर्गभेद वा जातीभेद वा वंशभेद अस्तित्वात नाहीत. एखादा माणूस श्रीमंत का आहे, कारण तो सरंजामदार आहे कींवा भांडवलदार आहे म्हणून! एखादी व्यक्ती भांडवलदार का आहे, कारण त्याचेजवळ उत्पादन साधनांची मालकी आहे म्हणून! एखादा माणूस सरंजामदार का आहे, कारण त्याचे जवळ शेकडो एकर जमिनीची मालकी आहे म्हणून! ज्यांचेजवळ उत्पादन साधनांची मालकी नाही ते सर्व आपोआपच कूळ, कामगार, मजूर वा कर्मचारी बनतात व परिणामी तुलनेने गरीब राहतात.
हे सर्व विश्र्लेषण करण्याचा एकच उद्देश आहे की, क्रिमी लेयरचे तत्व हे गरीब-श्रीमंत भेदावर उभे नाही. कारण असा भेद जगात कुठेच अस्तित्वात नाही. जगात फक्त वर्गभेद, जातीभेद व वंशभेद हेच अस्तित्वात आहेत. त्यामुळे ओबीसी कॅटिगिरीचीच नव्हे तर दलित, आदिवासी सकट कोणत्याच काटिगिरीची विभागणी करतांना क्रिमी लेयर व नॉन क्रिमी लेयर (गरीब-श्रीमंत) अशी करता येणार नाही. ओबीसी कॅटिगिरीची विभागणी मंडल कमिशनचे एक सदस्य एल. आर. नाईक यांनी केली होती. त्यांची डिसेंट नोट मंडल आयोगाच्या अहवालातच जोडलेली आहे. नाईकांनी स्पष्टपणे जातीच्याच आधारावर ओबीसी कॅटिगिरीची व ओबीसी आरक्षणाची विभागणी करण्याची शिफारस केली होती.  जातीव्यवस्था ही उतरंडीची व्यवस्था असल्याने त्यात प्रत्येक जात ही तीच्या कॅटिगिरीतील वरच्या जातीपेक्षा जास्त मागास असते व खालच्या जातीपेक्षा कमी मागास असते.
उदाहरण दिले तर माझ्या शूद्रादिअतिशूद्र बांधवाला लवकर समजेल. खानदेशात आदिवासी कॅटिगिरीत कोकणी आदिवासी जमातीपेक्षा भील्ल आदिवासी जमात जास्त मागासलेली आहे. दलित कॅटिगिरीत महार जात ही इतर जातींपेक्षा जास्त पुढारलेली आहे. ओबीसी कॅटिगिरीत कुणबी, माळी जाती या इतर ओबीसी जातींपेक्षा पुढारलेल्या आहेत. सवर्ण कॅटेगिरीत ब्राह्मणजात ही क्षत्रियजाती+वैश्य-जातींपेक्षा जास्त पुढारलेली आहे. भटके-विमुक्त कॅटिगिरीत धनगर जात ही इतर भटक्या जातीपेक्षा जास्त पुढारलेली आहे. त्यामुळे मागास जातींच्या आरक्षणाची विभागणी ‘‘तुलनेने अधिक मागास जाती व तुलनेने कमी मागास जाती’’ या तत्वावरच झाली पाहिजे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी मागासलेल्या शूद्रादिअतिशूद्र जाती व पुढारलेल्या ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य जाती अशी विभागणी केली होती. ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य जाती म्हणजेच भटजी+शेटजी+लाटजी जाती, असा त्याचा अर्थ होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तात्यासाहेबांच्या या सिद्धांताचा विकास केला. तात्यासाहेबांची ही जातीय विभागणी अधिक काटेकोर करीत बाबासाहेबांनी ‘‘एस.सी.+एस.टी.+ओबीसी विरूद्ध ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य जाती ’’ अशी परिपूर्ण व रास्त जातीय विभागणी केली. यात कुठेही ‘‘गरीब-श्रीमंत’’ अशी विभागणी नाही. आणी तरीही सुप्रिम कोर्ट व त्यांचे सत्ताधारी मालक क्रिमी-नॉन क्रिमीच्या नावाने गरीब-श्रीमंत असा अप्रस्तूत भेद मागास जातींवर का लादत आहेत?
आरक्षण हे गरीबांनाच मिळाले पाहिजे, असे जेव्हा सत्ताधारी जाती म्हणतात, तेव्हा ते शूद्रादीअतिशूद्र जातीतील गरीबांची काळजी घेत आहेत, असे चित्र उभे राहते. या उच्च जातीय सत्ताधार्‍यांना मागास जातीतील गरीबांची एव्हढीच काळजी होती, तर मग त्यांच्या आरक्षणासाठी किती टिळक, किती गांधी, किती नेहरू व किती अटलबिहारी लढलेत? फुले-शाहू-आंबेडकर या शूद्रादिअतिशूद्र जातीतील नेत्यांनाच का लढावे लागले? उच्चजातीय सत्ताधार्‍यांना मागास जातीतील गरीबांची आठवण केव्हा येते? जेव्हा त्यांना आरक्षण मिळायला लागले तेव्हा! त्या आधी ते एकूणच मागास जातीच्या आरक्षणाला विरोध करीत होते. तेव्हा त्यांना मागास जातीतील गरीबांची काळजी का वाटली नाही?
मागास जातीतील आरक्षणाचा लाभ घेऊन जो एक सुशिक्षित मध्यम वर्ग निर्माण होत आहे, तो सत्ताधारी जातींसाठी फार मोठा धोका आहे, ही बाब ते एक मिनिटभरसुद्धा विसरायला तयार नाहीत. या शिक्षित मध्यमवर्गाला शाळा-कॉलेजातून ब्राह्मणी शिक्षण देऊन नासविले असले, तरी त्यातील बरेचसे लोक स्व-अभ्यासातून क्रांतिकारी बनतातच! त्यासाठी ते मागास जातीतून मध्यमवर्गाचे विद्रोही ‘क्रिम’ तयारच होणार नाही, अशी तत्वे अमलात आणतात. त्यापैकी एक तत्व आहे ‘क्रिमी लेयर वगळण्याचे तत्व’ होय! प्रतिनिधित्व (आरक्षण) तत्वाचा लाभ घेण्यापासून क्रिमी लेयरला वगळणे म्हणजे त्याला आपल्या जन्मदात्या मागासजातीतून ‘अलग’ पाडणे. क्रिमी लेयर कॅटिगिरीत ढकलला गेलेला माणूस असा हवेत टांगला जातो की, त्याचा मागास जातीचा आधार तुटतो व वरच्या जातीचा आधार मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा प्रकारे त्याला क्रांतीपासून तोडले जाते व अप्रत्यक्षपणे तो प्रतिक्रांतीला मददगार ठरतो.
क्रिमी लेयर तत्वामागे एकूणच आरक्षणाचे तत्व नष्ट करण्याचे षडयंत्र आहे. त्यासाठी एक ईसापनीतीचे उदाहरण देतो. एकदा लांडगेदादाने बगळेआण्नाला जेवणाचे निमंत्रण दिले. बगळेआण्णा खूश झालेत. बगळेआण्णा लांडगेदादाच्या घरी पोहोचलेत तेव्हा त्यांचे जंगी स्वागत झाले. पातेल्यातील गोड खीरीचा खमंग वास पसरलेला होता. जेवणाचे ताट तयारच होते. लांडगेदादाने ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असा श्र्लोक म्हणून जेवणाला सुरूवात केली. भरपेट जेवण झाल्यावर त्याने बगळेआण्णांकडे पाहिले, बगळे आण्णा जेवण न करताच निघून गेले होते व त्यांच्या ताटातील खीर जशीच्या तशी पडलेली होती. लांडगेदादाने ‘त्या’ ताटातील खीरही फस्त केली व वामकुक्षीला निघून गेला. बगळे आण्ना जेवण न करताच का निघून गेला? कारण लांडग्याने बगळे आण्णाला ज्या ताटात खीर वाढलेली होती ते ताट पसरट होते, त्यामुळे त्याची लांब-लांब चोच खीरमध्ये बुडतच नव्हती, तर खीर खाणार कसा? लांडग्याला मात्र पसरट भांड्यातील खीर खाता येत होती.
परंतू बगळेआण्णाही हुशार होते. काही दिवसांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा बगळेआण्णांनी लांडगेदादांचे जेवण दिल्याबद्दल आभार मानले. परतफेड म्हणून बगळेआण्णांनी लांडगेदादाला जेवणाचे आमंत्रण दिले. लांडगेदादा जेवणासाठी बगळेआण्नांच्या घरी पोहोचलेत, जंगी स्वागत झाले. जेवणाचे ताट तयारच होते. बगळेआण्णा भराभर जेवण करून ढेकर देऊ लागले. परंतू लांडगेदादा जेवण न करताच निघून गेले होते, कारण बगळेआण्णांच्या घरी जेवणासाठी जे भांडे होते ते उभट होते व त्याचे तोंड अरूंद होते (गडू वा तांब्या). त्या अरूंद भांड्यात लांडगेदादाचे तोंड घुसतच नव्हते व त्याला खीर खाताच येत नव्हती. लांडगेदादांना अद्दल घडविल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.
ही कथा सांगण्याचा उदेदेश असा की, आरक्षणाची खीर श्रीमंताला खाता येत नाही, कारण त्याला क्रिमी लेयर म्हणून आधीच पंक्तीतून हाकलून दिलेले आहे. आणी गरीबालाही ती खाता येत नाही, कारण त्या गरीबाची चोच त्या आरक्षणापर्यंत पोहोचतच नाही. आरक्षणाची खीर तशीच ताटात पडून राहते. ‘‘खीर खाण्यासाठी मागास वर्गातून पात्र उमेदवार मिळालेच नाहीत’’, असे कारण दाखवून ती खीर लांडगे-कोल्हे-कुत्रे खाऊन फस्त करतात.
क्रिमी लेयर तत्वाचे विश्लेषण करणारे आणखी असे अनेक मुद्दे आहेत. अभ्यासकांनी ‘क्रिमी लेयर’’च्या अभ्यासासाठी माझे 1993 साली प्रकाशित झालेले ‘‘मंडल आयोग व आधुनिक पेशवाई’’ हे पुस्तक वाचावे, अशी विनंती करतो. पुढच्या बहुजननामात नवा विषय घेऊन पुन्हा भेटू या!
तो तोपर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 6 जून 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 7 जून 20)
------- प्रा. श्रावण देवरे
 Mobile – 88 301 27
270


No comments:

Post a Comment