http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, October 18, 2020

126 BahujanNama Puchat nete2 Lokmanthan 17 Oct 20

बहुजननामा-126 पूचाट नेते....उचाट चळवळ! (भाग-2) -1- विद्यार्थी असतांनाच चळवळीत आलो. 1978 ते 80 दरम्यान आदिवासी चळवळीत व नंतरचे एक वर्ष दलित पँथरसोबत काम केले. ‘तुम्ही ओबीसी आहात तर तेली-माळी-धनगर समाजात काम करा, इकडे दलित-आदिवासी चळवळीत उर्जा का खर्च करीत आहात’, असे सल्ले मिळायला लागल्यावर ओबीसी चळवळीकडे वळलो. 1981 साल उजाडले. आणीबाणीच्या ऐतिहासिक पराभवानंतर इंदिराजी पुन्हा प्रचंड बहुमताने प्रधानमंत्री बनल्यात. मंडल आयोगाचा अहवाल पार्लमेंटमध्ये चर्चेला आला. देशभर वादंग माजले. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात या संघर्षाला तीव्र धार आली. ओबीसी चळवळीत काम सुरू केले आणी पहिलाच सामना आमचा मराठा समाजाशी झाला. मंडल आयोगाला विरोध करण्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात ‘मराठा महासंघ’ नावाची सघटना नुकतीच स्थापन करण्यात आली होती. माथाडी कामगारांच्या वर्गीय नेत्याला एका जातीचा नेता बनवून त्याला मंडल आयोगाच्या विरोधात कामाला लावणे, ही ब्राह्मणी किमया अर्थातच संघ-भाजपाची होती. त्यात मराठा राज्यकर्त्यांचा छुपा राजकीय अजेंडा होताच!
मराठा महासंघाने राज्यभर मंडल-विरोधी सभा घेण्याचा धडाका लावला. धुळ्यात मराठा महासंघाची जाहीर सभा डिक्लेअर झाली. सभेचा विषय एकच होता- मंडल आयोगाला विरोध! मिडियाने नेहमीप्रमाणे वातावरण तापविले. पुरोगामी चळवळीनेही कंबर कसली. मंडल आयोगाच्या समर्थनार्थ श्रमिक संघटनेचे प्रमुख नेते कुमार शिराळकर यांनी पत्रके छापून आणली होती. मी नुकताच चळवळीत आलेला विद्यार्थी कार्यकर्ता होतो. ही पत्रके मराठ्यांच्या सभेत वाटप करण्यासाठी आम्हाला कामाला लावण्यात आले. या आगलाव्या सभेत व हिंसक वातावरणात आम्ही जीवावर उदार होऊन मंडल आयोगाची पत्रके वाटलीत. सभेचे अध्यक्ष दै. आपला महाराष्ट्राचे संस्थापक-संपादक भाई मदाने (कॉम्रेड) होते. सभेमध्ये मुख्य भाषण आण्णा पाटलांचे झाले. आण्णा पाटलांनी सभेच्या भाषणात मंडल आयोगावर घणाघाती प्रहार केला. ‘‘मंडल आयोग म्हणजे बंडल आयोग,’’ ‘‘खबरदार! जर ओबीसींना राखीव जागा दिल्यात तर महाराष्ट्र पेटवून देऊ’’ आण्णा पाटलांच्या भाषणातील या घोषणा आजही कानात प्रतिध्वनी-स्वरूपात घुमत असते. आण्णा पाटलांचे हे आगलावे-हिंसक भाषण संपल्यानंतर अध्यक्ष म्हणून समारोपाचे भाषण करण्यासाठी भाई मदाने उठले आणी अक्षरशः आण्ना पाटलांच्या भाषणाच्या चिंधड्या-चिंधड्या केल्या! ‘तुमचं डोकं ठिकाणावर आहे काय’ असा प्रश्न आण्णा पाटलांना विचारत भाईंच्या भाषणाची सुरूवात झाली. निषेधांच्या घोषणांमध्ये आण्ना पाटलांना अक्षरशः पळता भुई थोडी झाली होती. चित्रलेखाचे ज्ञानेश महाराव हे अभ्यासू व विचारवंत पत्रकार-संपादक म्हणून ओळखले जातात. चित्रलेखाच्या परवाच्या (19 ऑक्टोंबर 2020) संपादकियात महाराव जेव्हा आण्णा पाटलांबाबत ‘‘मराठ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं, यासाठी अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'मराठा महासंघ' १९८१ पासून प्रयत्न करीत आहे.’’ असं लिहितात, तेव्हा विचारवंतसुद्धा जातीसाठी मातीच खातात हे पुन्हा-पुन्हा सिद्ध होत राहते. असो! हे सर्व सांगण्याचा माझा उद्देश एवढाच की, विद्यार्थी दशेतील आमची मंडल आयोगाची ओबीसी चळवळ मराठ्यांना अंगावर-शिंगावर घेण्यापासून सुरू झाली, ते अंगावर-शिंगावर घेणं आजही सुरू आहे. (इटॅलिक व जाड ठसा माझा) -2- त्यानंतर आम्ही कर्मवीर ऍड. जनार्दन पाटील यांच्या संपर्कात आलो. त्यांनी कॉ. शरद पाटलांमार्फत आमची जात शोधून काढली आणी मला सरळ महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून जाहीर करून टाकलं. जातीच्या आधारावर मला मिळालेलं ते एकमेव ‘सन्माननीय पद’! सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा मी (‘ऑफ दि रेकॉर्ड’) सदस्य असल्याने पक्षातर्फे माझी नियुक्ती ‘ओबीसी आघाडीवर’ झाली. कर्मवीर जनार्दन पाटलांसोबत काही कार्यक्रम यशस्वी केल्यानंतर त्यांनी टॅलेंट ओळखलं आणी माझ्यावर ओबीसी महाग्रंथ निर्मितिची जबाबदारी सोपवीली. ऍड. माधवराव वाघ यांच्या आर्थिक मदतीतून साकारलेल्या या महाग्रंथाला प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांची प्रस्तावना मिळवीली. त्यांनी प्रस्तावनेत ग्रंथाला ‘केवळ ओबीसी चळवळीचाच नव्हे तर जात्यंतक चळवळीचा मार्गदर्शक’ म्हणून गौरवीले आहे. या ग्रंथाच्या नावापासूनच जात्यंतक प्रबोधन सुरू होते. ‘‘मंडल आयोगः ओबीसींच्या लोकशाही मुक्तीचा जाहीरनामा’’ हाच तो ग्रंथ होय! त्या काळात मंडल आयोग-ओबीसी चळवळीचे जात्यंतक तत्वज्ञानाच्या कसोटीवर विश्लेषण करणारा हा एकमेव ग्रंथ होता. या ग्रथाचे प्रकाशन दिल्ली येथे झालेल्या (1989) एन.यु.बी.सी.च्या महाअधिवेशनात तत्कालीन केंद्रीयमंत्री रामविलास पास्वान यांच्या हस्ते झाले. या ग्रंथाचे उत्स्फुर्त स्वागत दै. लोकसत्ता, मटा, सकाळ सारख्या दैनिकांनी पुस्तक समिक्षण करून केले. 5 महिन्यातच पाच हजार कॉपीज विकल्या गेल्याचा विक्रमही या ग्रंथाने केला. या ग्रंथाने महाराष्ट्रभर ओबीसी संघटनेचं जाळं विणायला मोठी मदत केली. याच काळात मी कॉलेजमधील विद्यांर्थ्यांना घेऊन ‘सत्यशोधक विद्यार्थी संघटना’ स्थापन केली. तो पर्यंत मंडल आयोगाची ओबीसी चळवळ फक्त सामाजिक-राजकीय स्तरावरच होती. ती चळवळ आम्ही विद्यार्थी वर्गात नेली. 1990-91 च्या काळात तत्कालीन शेकापचे नेते माननीय दि. बा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय ‘राखीव जागा संरक्षण समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीचा मी सदस्य होतो. अनेकवेळा या समितीच्या बैठका शेतकरी संघटनेचे आमदार मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या मुंबईस्थित निवासात होत होत्या. काही महत्वाच्या बैठकांचे वृतांत माझ्या ‘‘मंडल आयोग व आधुनिक पेशवाई’’(ऑक्टोंबर-1993) या पुस्तकात छापलेले आहे. या बैठकांना रिपब्लीकनचे रा.सु.गवई, शेकापचे आमदार दत्ता पाटील, भाई बंदरकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ल.स. कारखानीस, ऍड. जनार्दन पाटील आदि दिग्गज मंडळी आवर्जून उपस्थित राहायची. मंडल आयोग चळवळ शासकीय कर्मचारी-अधिकारी वर्गातही गेली पाहिजे, या उद्देशाने प्रदिप ढोबळेंच्या सोबत ओबीसी सेवा संघ स्थापन केला. राज्यात सर्वत्र कर्मचार्‍यांची अधिवेशने घेऊन प्रबोधनाची चळवळ उभी केली. ओबीसी चळवळ केवळ सामाजिक राजकीय स्तरावर राहून चालणार नाही, तर तीचा तात्विक पाया मजबूत करण्यासाठी तीला सांस्कृतिक स्तरावर नेली पाहिजे. यासाठी आम्ही तत्कालीन आमदार माननीय सुधाकरराव गणगणे यांच्या मदतीने अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलने आयोजित करायला सुरूवात केली. मराठा समाजाला खोट्या व चूकीच्या मार्गाने एस.ई.बी.सी. दर्जा देऊन आरक्षण देणे म्हणजेच त्यांचे ओबीसीकरण करणे होय! अशा ओबीसीकरणाला विरोध करण्यासाठी प्रकाश आण्णा शेंडगे यांना सोबत घेऊन ‘ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समिती’ स्थापन केली. मी कोणत्याच एका संघटनेत अडकून पडलो नाही. संघटना निर्माण केल्या, उभ्या केल्या आणी काही कालावधीनंतर सक्षम लोकांकडे सोपवून पुढच्या टप्प्यावरच्या कामाला वाहून घेतले. -3- चळवळीत संघटनात्मक जनआंदोलनाला जेवढे महत्व असते, तेवढेच महत्व त्या चळवळीच्या वैचारिक मार्गदर्शनाला असते. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्रीयांसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा काढणे, विधवाश्रम, दुष्काळ व प्लेग निवारण, शेतकरी व कामगार संघटन आदि कामे केलीत. मात्र त्यासोबत त्यांनी ग्रंथसंपदाही निर्माण करण्यावर भर दिला. त्यातूनच जात्यंतक तत्वज्ञानाच्या निर्मितीची मुहुर्तमेढ रोवली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पूर्ण आयुष्यात दोनच महान जनआंदोलने केलीत. एक महाडचा चवदार तळ्याचा महासंगर व दुसरा काळाराम मंदिराचा सत्याग्रह! मात्र त्यांनी जात्यंतक चळवळीला युगेनुयुगे मार्गदर्शक ठरतील अशा महाग्रंथांचा डोंगरच रचला! हेच 100-150 वर्षांपूर्वीचे ग्रंथ वाचून आम्ही आजची चळवळ चालवीत आहोत. मंडल आयोग चळवळीला जात्यंतक दिशा मिळावी म्हणून आम्ही शेकडो लेख लिहीलेत, डझनवारी पुस्तके स्वतःच्याच खिशातील पैसे खर्चून छापूलीत व विकलीत. वैचारिक परिसंवाद, व्याख्यानमाला, स्पर्धापरिक्षा, तत्वज्ञान विद्यापीठ आदि अनेक मार्गाने प्रबोधनाचे काम अविरत केले. केवळ ओबीसीच नव्हे तर आदिवासी, दलित, मराठा या समाजघटकांमध्ये सर्वाधिक व्याख्याने देण्याचा विक्रम आम्हीच केला आहे. ज्यांना कोणाला हे तपासून घ्यायचे असेल त्यांना आमच्या घरातल्या 20-25 बॉक्स फाईलींपैकी 4-5 फाईली कार्यक्रम पत्रिकांच्याच भरलेल्या सापडतील. आतापर्यंत शेकडोंनी लेख लिहीलेत, डझनावारी पुस्तके लिहीलीत परंतु अनेकांनी आग्रह करूनही कधी स्वतःवर काहीच लिहीले नाही. हा पहिला लेख असेल की ज्यात मला स्वतःबद्दल लिहावे लागते आहे. आमच्या ओबीसी चळवळीत जे काही थोडेफार लोक हौसे-नवशे-गवसे घुसलेले आहेत, ते अभ्यासाचे शत्रू आहेत, ते पुस्तकांचे शत्रू आहेत व ते वाचन-शत्रूही आहेत. एकूणच ते विचार-शत्रू आहेत. एक काळ असा होता की कोकण प्रदेशात सर्वत्र कुणबी आमदारच निवडून यायचे! आगरी समाजाचे आमदार व मंत्री असायचे! परंतू अलिकडच्या काळात या जातींचे बावकर-तांडेल सारखे नेते वाचन-शत्रू व विचारशत्रू असल्याने त्यांनी या दोन्ही जातींना राजकीय व सामाजिकदृष्ट्या प्रभावहीन करून टाकलेले आहे. वास्तविक या दोन्ही जाती मंत्रालयाच्या सर्वात जवळच्या परिघात राहतात. 3 तासात 3 लाखांचा घेराव मंत्रालयाला घालण्याची ताकद या दोन्ही समाजात आहे. परंतू नेते जर हौसे-नवशे असतील तर काहीच होऊ शकत नाही. कधीतरी जातीच्या 2-3 हजार लोकांची गर्दी आझाद मैदानावर जमवायची, गर्दीसमोर स्वतःचं नेतृत्व सिद्ध करायचं व हात हलवत निघून जायचं! आपल्या जातीला व्यापक ओबीसी चळवळीशी जोडून घेणं यांना कधीच जमलं नाही. विचारातच नाही तर कृतीत कुठून येणार! जे विचार देतात, त्यांच्याशी यांचा उभा दावा! एकमेव हायकोर्टातील त्यांची मराठा आरक्षणविरोधी पिटिशन तयार करण्यासाठी मी दोन वैचारिक तरूण दिले होते. प्रा. शंकर महाजन व कमलाकर हे माझेच कार्यकर्ते आहेत. पिटिशन तयार झाल्यावर श्रेय उपटण्यासाठी या दोन्ही वैचारिक तरूणांना हाकलून देण्यात आलं. आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे संस्थापक असलेल्या राजाराम पाटलांचे निरिक्षण असे आहे की, ‘या नेत्यांनी आगरी व कुणबी समाजात कधीच वैचारिक चळवळ रूजवीली नाही.’ अलिकडे माधव कांबळेंसारखे तरूण वैचारिक प्रबोधनाचा भरपूर प्रयत्न करीत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ओबीसी चळवळीचे धडे आम्ही जनार्दन पाटील, दिबा पाटील यासारख्या दिग्गज आगरी व कुणबी नेत्यांकडून शिकलो. ही शिकवण घेऊन आम्ही महाराष्ट्रातील माळी, तेली, धनगर, बलुतेदार जातीत ‘ओबीसी’ म्हणून काम केले. परिणामी आज या जातीत आमदार, खासदार व मंत्री दिसत आहेत. शिक्षण संस्था व इतर पायाभूत रचनात्मक कामे दिसत आहेत. तुर्त येथेच थांबू या! पुढील मुद्दे पुढील बहुजननामात!! सत्य की जय हो! (लेखनः 17 ऑक्टोंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन 18 ऑक्टोंबर2020) ------- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 270 Link for this article https://shrwandeore.blogspot.com/2020/10/126.html ईमेलः-s.deore2012@gmail.com Blog ब्लॉग Link- https://shrwandeore.blogspot.in/

No comments:

Post a Comment