http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, October 25, 2020

127 BahujanNama Bap 25 Oct 20 Lokmanthan

बहुजननामा-127 मुलं ऐकत नसतील तर, त्यांच्या बापाकडे तक्रार करा! -1- गेल्या काही महिन्यांपासून आमचे बरेच ओबीसी नेते न्यायासाठी वणवण फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेत आहेत, सभापती नाना पटोलेंसोबत चर्चा करीत आहेत, ओबीसी मंत्री वडेट्टीवार, भुजबळ वगैरेंसोबत भेटीगाठी घेत आहेत व आपले ओबीसींचे गार्‍हाणे मांडत आहेत. बैठकांमध्ये चर्चा झडतात, समित्या, उपसमित्या स्थापन होतात, मंत्रीगट, उपगट बनतात व पुन्हा पुन्हा चर्चाच होत राहतात. प्रत्यक्षात हातात काहीच पडत नाही. एकाही ओबीसी मंत्र्याची हिम्मत नाही की, ते अर्थमंत्र्याकडे जाउन ओबीसींसाठी काही निधी आणतील. अर्थात खुद्द मुख्यमंत्रीही हे काम करू शकत नाहीत, कारण राज्याच्या आर्थिक नाड्या अजित पवारांसारख्या मराठा नेत्यांच्या हातात आहेत. त्यामुळे ओबीसींनाच काय, एस्सी, एस्टी यांनाही काही मिळण्याची शक्यताच नाही. मराठा नेते मात्र डायरेक्ट अजितदादाच्या केबीनमध्ये जातात आणी सारथीसाठी चेक घेऊनच बाहेर पडतात. मराठा नेते मुख्यमंत्र्यांच्या केबीनमध्ये जातात आणी एम.पी.एस.सी. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेउनच बाहेर येतात. या उलट ओबीसी नेत्यांची अवस्था आहे. आमचे ओबीसी नेते मोठ्या आशेने मंत्र्यांकडे व मुख्यमंत्र्यांकडे चकराच मारण्याचे काम करीत आहेत. या मंत्रीमंडळाचे ‘पालक-चालक’ माननीय शरद पवारसाहेब आहेत. मुलं नीट काम करीत नसतील तर त्यांच्या बापाकडे जाऊन तक्रार केली पाहिजे. आणी त्यांचा बापही जर ऐकत नसेल तर, वरती राज्यपाल नावाचा एक ‘आजोबा’ बसलेला आहे. त्याच्याकडे शिष्टमंडळ घेउन जा व आपले गार्‍हाणे मांडा. हे सर्व सांगायला श्रावण देवरेच पाहिजे का?
या साध्या-साध्या गोष्टी सूचत नसल्याने ओबीसी नेत्यांची सर्व बाजूंनी टोलवा-टोलवी सुरू आहे. त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. कारण हा केवळ ओबीसी नेत्यांचा अपमान नाही, तर ज्या 52 टक्के ओबीसींचे नेतृत्व तुम्ही करीत आहात, त्या ओबीसींचा हा अपमान आहे. भीख मागून काहीही मिळत नसते, हा सामाजिक-राजकीय सिद्धांत मी पुन्हा पुन्हा सांगत राहावा, अशी काही परिस्थिती नाही. तुमच्या पाठीशी किती लोक आहेत, यापेक्षा तुम्ही तुमचं म्हणणं किती अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडतात यालाही महत्व असते. जनता पाठीशी असणं, हे तर महत्वाचं आहेच! पण नेता अभ्यासू असायलाच हवा! तो आक्रमकही असावा लागतो, कारण तुमचे अभ्यासू मुद्दे दडपून टाकण्यासाठी वा डायव्हर्ट करण्यासाठी शत्रूपक्षाने त्यांचे लोक तुमच्यात सोडलेले असतात. ते लोक शिष्टमंडळाच्या मिटिंगांमध्ये घुसून आपला मुख्य उद्देशच बाजूला सारतात. या शत्रूंवर मात करून मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी आपल्या ओबीसी नेत्यांजवळ अभ्यासही नसतो व आक्रमकपणाही नसतो. अशा परिस्थितीत आपल्या ओबीसी नेत्यांना नाईलाजास्तव या बैठकांमध्ये नंदीबैलासारखी ‘गुबू-गूबू’ मान हलवावी लागते व चहा बिस्कीट खाऊन बैठकीतून हात हलवत परत यावे लागते. तुम्हाला किती मिळाले, हेही फारसे महत्वाचे नाही. तुम्ही तुमचा स्वाभीमान कीती जागवीला यालाच महत्व असते. कारण तुमचा स्वाभिमान म्हणजे 52 टक्के ओबीसी जनतेचा स्वाभीमान होय! ओबीसींचा स्वाभिमान कसा जागवायचा असतो व त्यासाठी कसे आक्रमक व्हावे लागते, याचे प्रात्यक्षिक मी अनेकवेळा जाहीरपणे करून दाखविले आहे. 16 नोव्हेंबर 2018 रोजी मंत्रालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची व मुख्य कार्यकारणीची बैठक चालू होती. या बैठकीत घुसून ‘‘खबरदार, जर मराठा आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर राज्यातला एकही ओबीसी तुमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही’’ असा कडक ईशारा मी देत असतांना प्रकाश अण्णा शेंडगे व हरीभाऊ राठोड साक्षीदार होते. शत्रू जर आपल्या गोटात घुसून आपल्या जनतेला गोलमाल करीत असेल तर त्याला कसा शिंगावर घ्यायचा, याचाही धडा मी आझाद मैदानावरील 25 हजारांच्या सभेत गिरवून दाखविला आहे. ओबीसींची ही जाहिरसभा 29 नोव्हेंबर 2019 रोजी आझाद मैदानावर झाली. बळजबरीने आपल्या सभेत घुसलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटलांचे मी कसे हाल केलेत, याचे उदाहरण आजही ओबीसी कार्यकर्ते बोलून दाखवितात. 2019च्या निवडणूकांआधी शरद पवारसाहेबांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ओबीसींची बैठक बोलावली होती. या बैठकीत ‘‘तुमच्या पक्षाच्या आमदारांना आम्ही ईशारा दिला होता की, मराठा आरक्षणाच्या विधेयकाच्या बाजूने मतदान करू नका, तरीही त्यांनी विधयेकाच्या बाजूने मतदान का केले व ओबीसींना खड्ड्यात घालण्याचे काम का केले, याचा आधी जाब द्या!’’ असा जाब मागितल्यावर पवारसाहेब माझ्यावर चिडलेत व म्हणाले की, ‘‘राजकारणाचे धडे मी श्रावण देवरेंकडून शिकायचे का?’’ सत्ताधार्‍यांमधला दिग्गज नेता जेव्हा त्यानेच बोलावलेल्या बैठकीत आगबबूला होऊन चिडचिड करतो, तेव्हा हे आपोआप सिद्ध होते की, आपली ओबीसींची बाजू सत्य व न्यायाची आहे. त्याचबरोबर हेही सिद्ध होते की, ओबीसींसाठी लढणारा नेता हा कोणालाही भीडायला मागे-पुढे पाहात नाही. हाच खरा ओबीसींचा स्वाभिमान होय! श्रावण देवरेंकडून समाजकारणाचे-राजकारणाचे धडे पवारसाहेब घेऊच शकत नाहीत, कारण त्यांना 52 टक्के ओबीसींचे नव्हे, तर 4-5 टक्के धनदांडग्या मराठ्यांचे राजकारण करायचे आहे. परंतू प्रकाश शेंडगे व तत्सम ओबीसी नेत्यांनी श्रावन देवरेंकडून अभ्यासाचे व आक्रमकतेचे धडे शिकून घेतलेत, तरच ओबीसी चळवळ स्वाभिमानाने पुढे जाऊ शकते. प्रत्येक ठिकाणी श्रावण देवरेनेच उपस्थित राहावे व त्यांनेच आक्रमक भुमिका घेउन ओबीसींची बाजू मांडावी व बाकीच्यांनी फक्त चहा-बिस्कीट खाऊन नंदीबैलासारखी गुबू-गुबू मान हलवावी, असा पायंडा पडणे चूकीचे आहे. कधीतरी श्रावण देवरेच्या गैरहजेरीत एखाद्या दिग्गज मंत्र्याला शिंगावर घेऊन दाखवा व मग सांगा की, आम्हीच खरे ओबीसींचे नेते! महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांना मराठा-ब्राह्मणांची गुलामगिरी करून आमदारकी-खासदारकी-मंत्रीपदे मिळवायची सवय लागलेली आहे. 29 नोव्हेंबर 2018च्या आझाद मैदानावरील सभेत मी जाहिरपणे सांगीतले की, ‘जे ओबीसी नेते कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपासारख्या प्रस्थापित पक्षाचे सदस्य-पदाधिकारी असतील त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा! कारण या चार पक्षात राहून तुम्ही कधीच ओबीसींचे भले करू शकत नाहीत.’ मी असा आदेश दिल्यानंतर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयात जाऊन राजीनामा दिला व नंतर लगेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषेत ‘ओबीसींच्या हितासाठी मी कोणत्याच प्रस्थापित पक्षाची गुलामगिरी स्वीकारणार नाही’, अशी प्रतिज्ञाही केली. प्रकाश अणांनी जे धाडस दाखविले तसे धाडस हरीभाऊ राठोड, बालाजी शिंदे-खरमाटेवगैरे नेते दाखवू शकले नाहीत, परिणामी प्रकाश आण्णांनीही नंतर कच खाल्ली व 2019 च्या विधासभा निवडणूकीत शिवसेनेशी तडजोड केली. मी वारंवार ओबीसींच्या स्वतंत्र राजकीय पर्यायाची कास धरायला सांगतो आणी हे ओबीसी नेते मराठा-ब्राह्मणांच्या गुलामगिरीची वाट धरतात. 1994 नंतर भारतात ओबीसी जागृतीची राजकीय लाट आली. या लाटेवर स्वार होऊन लालू-मुलायमसारख्या स्वाभिमानी ओबीसी नेत्यांनी पक्ष स्थापन केलेत व सत्तेतही आलेत. मात्र महाराष्ट्रात ‘ओबीसींचा ढाण्या वाघ’ बनून मिरविणारे भुजबळांसारखे नेते आजही मराठा-ब्राह्मणांची गुलामगिरीच पसंद करतात. कांशीरामसाहेबांचे चेले असल्याचे सांगून जानकरांनी ओबीसींचा राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नात मी स्वतः खाद्याला-खांदा देऊन साथ दिली. महाबळेश्वरच्या पाचगणी येथे त्यांच्या पक्ष-कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे पहिले शिबीर मी घेतले. या शिबीरात मी फुलेवादाची मांडणी करून पक्षाचा वैचारिक व तात्विक पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्रातील ओबीसींच्या गुलामगिरीची परंपरा जानकर तोडू शकले नाहीत. जानकरही पेशव्यांचे पाय चाटण्यात किती मश्गूल झालेले आहेत, हे महाराष्ट्र पाहतोच आहे. महाराष्ट्रातील या ओबीसी नेत्यांसमोर तामिळनाडूच्या स्वाभिमानी ओबीसी राजकारणाचा आदर्श उभा आहे, संघ-भाजपाने जेलमध्ये डांबल्यावरही न डगमगणार्‍या लालू प्रसाद यादवांचा आदर्श उभा आहे. बाप जेलमध्ये असूनही हिम्मतीने लढणार्‍या तेजस्वी यादवचे तेज आज जगासमोर उजळून निघते आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार वगैरे राज्यात एकही महापुरूष जन्मला नाही, तरीही तेथील ओबीसी नेते ब्राह्मण-क्षत्रियांच्या विरोधात मर्दानगीने लढत आहेत, आणी महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांसारखे तीन-तीन महापुरूष होउनही ‘‘ना-मर्दानगीचे’’ उकिरडे का सजवीले जात आहेत? संघ-भाजपाची अशी इच्छा असते की, महाराष्ट्रात या पुचाट नेत्यांनीच ओबीसींचे नेतृत्व केले पाहिजे. म्हणजे ओबीसी जनता कधीच जागृत होणार नाही व ते आपले मराठा-ब्राह्मणवादाचे गुलाम म्हणून पिढ्यान् पिढ्या राबत राहतील.’ माझ्या सोशल मिडियावरच्या जनजागृती मोहीमेमुळे व महाराष्ट्रात सर्वत्र आयोजित होणार्‍या माझ्या व्याख्यानांमुळे या पूचाट नेत्यांचे पितळ उघडे पडत असते. त्यामुळे संघ-भाजपाची काही माणसे आता प्रचार करीत आहेत की, ‘‘श्रावण देवरे यांचा बहुजननामा वाचू नका, त्यांची भाषणे आयोजित करू नका’’ संघ-भाजपाचा आयटी सेल माझ्या फेसबूकवर, व्हाट्सपवर, मेसेंजरवर, ईमेलवर सतत अडथळे आणीत असतो. त्याचे कारण हेच आहे की, ‘पूचाट नेत्यांना बाजूला सारून नवे स्वाभिमानी तरूण नेते पुढे येऊ नयेत.’ परंतू तरीही निराश होण्याचे काही कारण नाही. सतत अंधार नसतो. कधीरी उजाडतेच! आज तरूणांमधून काही आशेची किरणे चकाकतांना दिसत आहेत. औरंगाबादचा अविनाश खापे हा मराठा समाजाचा तरूण-कार्यकर्ता मराठा समाजासाठी आशेचा किरण आहे. हा तरूण आपल्याच मराठा नेत्याला डायरेक्ट फोनवरून प्रश्न विचारण्याची हिम्मत करतो आहे. ही फोन-क्लीप सोशल मिडियावर फारच गाजली. आपल्याच जातीच्या नेत्याला जाब विचारण्यासाठी मर्दानगी लागते. हा तरूण आपल्या मराठा नेत्याला विचारतो आहे की, ‘‘साहेब तुम्ही मराठा आरक्षणासाठी लढत आहेत की भाजपासाठी? कारण मराठा आरक्षण पार्लमेंटमधून कायद्याने आले तर ते टिकाउ असेल. मात्र तुम्ही केंद्रातील भाजप सरकारला सांगण्याऐवजी महाराष्ट्रातील सरकारला का जबाबदार धरत आहेत?’ शेवटी हा कार्यकर्ता आपल्या भाजपाई मराठा नेत्याला सांगतो आहे की, ‘‘साहेब, आपण आता फक्त जाणवे घालायचेच बाकी ठेवले आहे.’’ दुसरे आदर्श कार्यकर्त्याचे उदाहरण आहे अनिल राठोड या तरूणाचे! हा तरूण आपल्याच जातीच्या हरीभाऊ राठोडचे ‘मराठावादी-षडयंत्र’ उघडकीस आणण्यासाठी सोशल मिडियावर लढतो आहे. तुर्त येथेच थांबू या! पुढील मुद्दे पुढील बहुजननामात!! सत्य की जय हो! (लेखनः 22-23 ऑक्टोंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन 25 ऑक्टोंबर2020) ------- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 27 270 Link for this article https://shrwandeore.blogspot.com/2020/10/127-1.html Blog ब्लॉग Link- https://shrwandeore.blogspot.in/

No comments:

Post a Comment