http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, November 21, 2020

131 BahujanNama election Bhumika 22Nov20 Lokmanthan

बहुजननामा-131 ************** प्रा श्रावण देवरे भुमिका घेऊन ‘उभे’ राहा, म्हणजे समाज ‘आडवा’ होणार नाही!! (महाराष्ट्रात पद्वीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असून त्याबाबत OBC+Sc+St+Ntvjnt+Sbc+Minorities Obc या कॅटेगिरींच्या वैचारिक भुमिकेबद्दल या लेखात चर्चा केली आहे, ती आपल्या वाचकांसाठी सादर करीत आहोत. ----- संपादकीय) -1- ‘सहकार हा एक उच्चवर्णियांचा गट आहे.....! लुटके लाओ, बाटके खाओ, हा त्यांचा कट आहे!!’’ ----- माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडेंच्या कवीतेतील दोन ओळी
डॉ. नारायणराव मुंडे उपाख्य दादा यांच्याशी चर्चा करीत असतांना त्यांनी एक अनुभव शेअर केला. त्यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील एक मित्र आमदार होते. ते ओबीसीमधील अतिअल्पसंख्यांक जातीतील होते. पवारसाहेबांचे पाठीराखे असल्यामुळे त्यांनी एक साखर कारखाना मिळविला. कारखान्याची परवानगी मिळविणे वेगळे आणी तो उभा करून चालवून दाखविणे वेगळे. प्रस्थापित व सत्ताधारी जातींसाठी ते फारसे कठीण नसते. हे आमदार महाशय अतिअल्पसंख्यांक व त्यात पुन्हा शूद्ध ओबीसी होते! जेथे तेली, माळी सारख्या बहुसंख्य (मोठ्या) ओबीसी जातीतील आमदार कारखाना काढण्याची हिम्मत करीत नाही, तेथे ओबीसीमधील अतिअल्पसंख्य असलेल्या नाभिक, धोबी, विणकर, कोष्टी जातीच्या आमदाराने कारखाना उभा करून चालवून दाखविला, हे खूप मोठे ‘जातीय आश्चर्यच’ म्हणावे लागेल. अर्थात याचे श्रेय त्या ओबीसी आमदारालाच दिले पाहिजे कारण त्यांनी अत्यंत चिकाटीने व सर्वस्व पणाला लावून कसाबसा कारखाना उभा केला व व्यवस्थीत चालूही केला. कारखान्याचे सभासद नोंद करतांना किमान 40 टक्के सभासद ओबीसी व दलित असतील याचीही काळजी त्यांनी घेतली. डॉ. नारायणराव मुंडेंच्या त्या ओबीसी-आमदार मित्राने सर्वस्व पणाला लावून 20-25 वर्षात कसाबसा कारखाना उभा केला आणी सुरू झाल्यावर एका वर्षाच्या आत कारखान्याच्या निवडणूका लागल्यात. त्या निवडणूकीत डॉ. मुंडे यांना मित्र म्हणून प्रचारासाठी बोलावले. पहिल्याच प्रचारसभेत डॉक्टरांनी ओबीसी चळवळ, दलित चळवळ, फुलेआंबेडकर सांगीतला व अतिअल्पसंख्य ओबीसी आमदाराच्या धारिष्ट्याचे कौतूकही केले. अशा जिगरबाज नेत्यालाच कारखान्याचा चेअरमन म्हणून निवडून द्या, असे आवाहनही डॉ. मुंडे यांनी केले. डॉ. मुंडेंच्या भाषणाने आमदारसाहेब अस्वस्थ झालेत. कसाबसा कार्यक्रम आटोपता घेऊन आमदार गाडीत बसले व डॉक्टरांनाही गाडीत बसण्यास सांगीतले. गाडी गावाबाहेर आल्यावर आमदार डॉ. मुंडेंना म्हणाले, ‘‘अहो! मुंडेदादा, ही बाबासाहेबांच्या जयंतीची सभा नव्हती! माझ्या कारखान्याच्या निवडणूकीची सभा होती. तुम्ही भाषणात ओबीसी-ओबीसी केले, तर सर्व पॅनलमधील प्रस्थापित मराठे एकत्र होतील व मला पराभूत करतील.’’ दादा हसले आणी ईशारा देत म्हणाले, ‘‘तुम्ही जर आपल्या लोकांना फुलेआंबेडकर सांगीतला नाही व चळवळही सांगीतली नाही, तर एक दिवस तुमचा कारखाना तुमच्या हातातून निघून जाईल व तुम्हाला कारखान्याच्या गेटवर जायलासुद्धा अपमान वाटेल.’’ दादासाहेब डॉ. नारायणराव मुंडेंनी दिलेला हा ईशारा लगेच खरा ठरला. आज हा कारखाना मराठ्यांच्या ताब्यात आहे व कारखान्याचे संस्थापक असलेले आमचे ओबीसी आमदार कारखान्याकडे फिरायला जाण्याचीही हिम्मत करीत नाहीत. -2- हे उदाहरण द्यायचे कारण असे की, निवडणूका या गल्लीतल्या असो की दिल्लीतल्या! प्रस्थापित क्षत्रिय(?) जातीच्या विरोधात बोलण्याची हिम्मत ना ओबीसी नेत्यांमध्ये असते, ना दलित नेत्यांमध्ये! त्यामुळे स्वातंत्र्याच्या 70 वर्षात गुलामगिरीशिवाय दुसरे काहीच हाती लागले नाही. एरवी हे ओबीसी-दलित नेते प्रस्थापित जातींच्या विरोधात खाजगीत भरपूर बोलतील, 25-30 हजार रुपये मानधन घेऊन दलित-ओबीसी-भटके विचारवंत क्रांतिकारक भाषणे करतील. मात्र ऐन मोक्याच्या वेळी, निवडणूकांच्या काळात यांची अक्कल गहाण पडते. आता ताजे उदाहरण म्हणून विधान परीषदेच्या जाहिर झालेल्या पद्वीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकांचे बघा! OBC+Sc+St+Ntvjnt+Sbc+Minorities Obc या कॅटेगिरींची 9 नोव्हेंबरला मुंबईत राष्ट्रीय मागासवर्गीय आरक्षण गोलमेज परिषद (पहीली) संपन्न झाल्यानंतर, नंतरच्या परीषदा या निवडणूका जाहिर झालेल्या मतदारसंघात झाल्या पाहिजेत, जेणे करून तेथील ओबीसी, एस्सी उमेदवाराला त्या परीषदेचा लाभ होईल, या उद्देशाने आम्ही अनेक ईच्छुक उमेदवारांना ही दुसरी परीषद घेण्यासाठी आग्रह केला. मात्र बर्‍याचजणांचा अशी भुमिका घेऊन निवडणूका लढण्यास विरोध होता. निवडणूकांच्या काळात प्रस्थापित जातींना उघडपणे विरोध केला, तर त्यांची मते मिळणार नाहीत व ते नाराज होतील. काही उमेदवार म्हणाले की, ‘‘आमचे बरेचसे मित्र मराठा आहेत, ब्राह्मण आहेत. त्यांना आम्ही नाराज करू ईच्छित नाहीत.’’ आम्ही त्यांना प्रतिप्रश्न केला की, ‘‘हे तुमचे प्रस्थापित मित्र जेव्हा मराठा ओबीसीकरणाची भुमिका मांडतात, तेव्हा त्यांना तुमच्यासारख्या ओबीसी मित्रांच्या नाराज होण्याची भिती का वाटत नाही?’’ अर्थात हे सत्य आहे की, या प्रस्थापित जातींना दलित-ओबीसी मित्र नाराज होण्याची भिती अजिबात वाटत नाही, कारण या दलित-ओबीसी मित्रांची लाचारी ते गृहित धरूनच असतात. खरे म्हणजे ते एकमेकांचे मित्र नसतातच! मैत्रीच्या नावाने त्यांच्यात गुलाम-मालकाचेच नाते असते. असेच लाचार मैत्रीचे नाते ब्राह्मणांसोबतही असते. असे लाचार ओबीसी-दलित उमेदवार निवडूनभी आलेत तरी ते प्रस्थापितांच्या वाड्यावर पाणी भरण्याचेच काम करतात, याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही मराठा ओबीसीकरणाचे विधेयक मंजूर होतांना अनुभवला. त्या काळात (म्हणजे 15 नोव्हेंबर 2018 ते 29 नोव्हेंबर 2018 या 15 दिवसात) आम्ही विधानसभेच्या व विधानपरीषदेच्या बर्‍याच दलित-आदिवासी-ओबीसी आमदारांना भेटलो व मराठा ओबीसीकरणाच्या विधयेकाच्या बाजूने मतदान करू नका, असे पटवून दिले. बर्‍याच आमदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या, निवेदनं दिलीत, टिव्हीवरून, प्रिंट मिडियावरून वारंवार आवाहन केले, आझाद मैदानावर आंदोलने केलीत. मात्र एवढे सर्व परिश्रम घेऊनही या सर्व दलित-ओबीसी-आदिवासी-भटक्याविमुक्त आमदारांनी 29 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा ओबीसीकरण करणार्‍या विधेयकाला एकमताने ‘‘जल्लोषात’’ मतदान केले व सच्च्या ओबीसी जातींच्या आरक्षणावर मरणाचा घाव घातला. ज्या जातीत आपला जन्म झाला, त्या जातीबद्दल यांना अजिबात चाड नाही. वैचारिक भुमिका न घेणारे कणाहीन ओबीसी नेते नेहमीच प्रस्थापित जातींसाठी ‘‘उभे’’ राहतात व आपल्या स्वतःच्या समाजाला ‘‘आडवा’’ पाडून खड्ड्यात घालतात. आता पद्वीधर व शिक्षक मतदारसंघातून एखादा ओबीसी वा दलित उमेदवार आमदार म्हणून निवडून आला, तर तो विधान परिषदेत जाऊन ओबीसींना खड्ड्यात घालण्याचेच काम करणार आहे. कारण
त्यांचे प्रस्थापित जातीतील मित्र नाराज होणार नाहीत, याची ते डोळ्यात तेल घालून काळजी घेत असतात. शिक्षक मतदारसंघातील काही उमेदवार शिक्षणव्यवस्थेवर डझनभर भाषणे देत आहेत. परंतू शिक्षणव्यवस्थेतील जातीव्यवस्थेवर ते बोलणार नाहीत, कारण त्यांचे ब्राह्मण-मराठा मित्र नाराज होतील, अशी त्यांना भिती वाटते. असे शिक्षणतज्ञ लोक आमदार झाल्यावर प्रस्थापितांच्या वाड्यावर जाऊन मुजरा घालण्याचेच काम करतात. जोपर्यंत शिक्षणव्यवस्थेतील जातीयवाद नष्ट होणार नाही, तो पर्यंत शिक्षणाचे तत्वज्ञान कुचकामीच राहणार आहे. जो पर्यंत शिक्षणव्यवस्था शाहूराजे, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव विचारे यासारख्या सत्यशोधकांच्या ताब्यात होती, तो पर्यंत शाळा-कॉलेजात अब्राह्मणी विचारसरणी जाणीवपूर्वक शिकविली जात होती. मात्र नंतर याच संस्था सरंजामदारांच्या ताब्यात गेल्यावर ते शिक्षणसम्राट बनलेत. या शिक्षणसम्राटांचे ‘गुरू’ सत्यशोधक न राहता ब्राह्मण-भटजी झालेत. परिणामी त्यांच्या शाळा-कॉलेजात शिवजयंतीऐवजी ‘‘गणपती-उत्सव’’ साजरे व्हायला लागलेत. शिक्षणक्षेत्रातील या सरंजामशाहीविरोधात व ब्राह्मणशाहीविरोधात बोलण्याची हिम्मत ज्या उमेदवारांमध्ये आहे, असे उमेदवार आम्ही शोधत आहोत. MPSC परीक्षा व नोकरभरती बंद पाडून लाखो पद्वीधारकांना नोकरीपासून वंचित करणार्‍या लोकांना धडा शिकविण्याची हिम्मत ज्या पद्वीधर उमेदवारामध्ये आहे, असाच उमेदवार आम्ही शोधतो आहोत. त्यासाठी दिलेला कृती-कार्यक्रम ‘‘भुमिका’’ म्हणून ज्यांना मान्य असेल, ते आमचे सच्चे मित्र असतील. पद्वीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातून उभे असलेले जे उमेदवार स्पष्टपणे सरंजामशाही व ब्राह्मशाहीच्याविरोधात भुमिका घेतील, त्यापैकी एक-एक सक्षम उमेदवार आम्ही जाहिर करणार आहोत. आम्ही समस्त संवैधानिक आरक्षणवादी (OBC+Sc+St+Ntvjnt+Sbc+Minorities Obc) मतदारांना आवाहन करतो की, आम्ही जाहीर करीत असलेल्या दोन उमेदवारांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. ही दोन नावे कोणती, याबद्दलचे निवेदन आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. तो पर्यंत, जयजोती, जयभीम, इडा पिडा जाओ! बळीचं राज्य येवो!! सत्य की जय हो! (लेखनः 19 नोव्हेंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन, 22 नोव्हेंबर 2020------- -- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 27 270 Links for this Article:- 1) https://deoreshrawan.blogspot.com/2020/11/131-bahujannama-election-bhumika-22nov.html 2) Blog ब्लॉग Link- https://shrwandeore.blogspot.in/ ई मेलः- s.deore2012@gmail.com

1 comment:

  1. खूप छान सर ,
    जो पर्यंत आपण सत्याची कास धरत नाही तो पर्यंत कुठेही यश मिळत नाही आणि मिळाले तरीही ते टिकत नाही.

    ReplyDelete