http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, November 1, 2020

128 BahujanNama Buddhiman 1 Nov 20 Lokmanthan

बहुजननामा-128 बुद्धिमंतांनो ! बाहेर पडा आणी तोंड उघडा !! -1- झी-24 तासचे एंकर आशिष जाधव यांनी परवाच्या म्हणजे 28 ऑक्टो 20 च्या रोखठोख कार्यक्रमात मराठा आरक्षणावर चर्चा घेतली. या चर्चेत त्यांनी प्रवीणदादा गायकवाडांना अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. ‘‘प्रवीणदादा तुम्ही मराठा समाजाच्या ईडब्ल्युएसकरणाची भुमिका मांडत आहात. परंतू मराठा समाजाचा एकही नेता तुम्हाला पाठींबा द्यायला तयार नाही, असे का?’’ आता ही वस्तुस्थीती आहे की, प्रवीण गायकवाड हे मराठा समाजात एकटे पडलेले आहेत. त्यांच्या सामंजस्याच्या भुमिकेला कुणीही नेता पाठींबा द्यायला तयार नाही. नेत्यांचं जावू द्या, ते तर राजकीय स्वार्थाने प्रेरीत असतात, त्यांना जातीच्या हितापेक्षा व्यक्तीगत स्वार्थाची पडलेली असते. त्यांना पक्षाने दिलेली आमदारकी-खासदारकी टिकवायची असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाने सांगीतलेली ‘ओबीसी-मराठा भांडण वाढविण्याची भुमिका’ पार पाडावीच लागते. मात्र प्रवीणदादा गायकवाड यांना कोणत्याही आमदारकी-खासदारकीचा हव्यास नाही. ते दलित-मराठा-ओबीसी मध्ये सख्य सांधण्याची भुमिका मांडतात व त्यातही मराठा समाजाला टिकाऊ व मजबूत आरक्षण कसे मिळू शकते, हेही ते सिद्ध करतात. तरीही मराठा जातीतील विचारवंत, बुद्धिमान म्हणविणारे लोक प्रवीण गायकवाडांच्या भुमिकेवर काहीही बोलायला तयार नाहीत. प्रवीण गायकवाडांची भुमिका चूक असेल तर चूक सांगा, बरोबर असेल तर बरोबर सांगा. तोंडात गुळणी धरून बसू नका. प्रविणदादा हे काही सर्वसामान्य कार्यकर्ते नाहीत. मराठा आरक्षणाची चळवळच मुळात त्यांच्यापासून सुरू झालेली आहे. अर्थात यात मी माननीय पुरूषोत्तम खेडेकरांचं श्रेय नाकारीत नाही. खेडेकरांच्या संघटन-कौशल्यापुढे व विचार-सामर्थ्यापुढे तत्कालीन मराठेच काय दलित-ओबीसीसुद्धा नतमस्तक झाले होते. विदर्भातले तिरळे-कुणबी असूनही खेडेकरसाहेबांना मराठा-नेतृत्व म्हणून मान्य करणे, हा सुद्धा एक धाडसाचा प्रयोग होता. हे धाडस प्रवीणदादा, श्रीमंत कोकाटेंसारख्या मराठा तरूणांनी दाखविले व ब्राह्मणवादाला धडकी भरण्याइतपत मोठे संघटन उभे केले, हे या मराठा तरूणांचे श्रेयही नाकारून चालणार नाही. -2- मराठा समाजाला आरक्षणवादी बनविणे, हे काम अत्यंत जिकीरीचे, कष्टाचे व डोकेफोड होते. सत्तेची गुर्मी, क्षत्रियत्वाची बाधा आणी त्यात पुन्हा ब्राह्मणवादाची चेटकीण या दुहेरी-तिहेरी जंजाळात
अडकलेल्या मराठा समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून व भांडारकर-तोडफोडसारख्या आक्रमक कार्यक्रमातून धक्क्यावर धक्के द्यावे लागले. वीजेचे शॉक द्यावेत त्याप्रमाणे ब्राह्मणवादाला झटके देऊन मराठा समाजाला फुले-शाहू-आंबेडकरवादाकडे आणावे लागले. हे काम म्हणजे महाकाय डोंगराला भूईसपाट करण्यासारखे होते. दाभोळकर, पानसरेंसारख्या दिग्गजांचे खून पडत असतांना जीवावर उदार होऊन गायकवाड-कोकाटेसारखे मराठा तरूण ब्राह्मण-धर्माविरोधात शिवधर्माचे काम उभे करीत होते. हेच काम आम्ही ओबीसींमध्ये करीत असल्याने आम्हाला या मराठा तरूणांच्या साहसाची व तळमळीची पूर्ण जाणीव आहे व कदरही आहे. हे माझे म्हणणे काही अंशी तुम्हाला अतिशयोक्त वाटेल. परंतू आठवा तो काळ 1981-82चा! या काळात संघ-भाजपाने आण्णा पाटलांना पुढे करून मराठा महासंघ स्थापन केला व संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर सभा घेऊन मंडल आयोगाविरोधात व ओबीसी-जातींच्या विरोधात अक्षरशः महाराष्ट्र पेटविण्याची भाषा केली होती. आठवा तो 1988-89 चा काळ! दैनिक लोकसत्ताच्या समाजवादी ब्राह्मण संपादकाने मराठा समाजाला चिथावणी दिली आणी मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली शशीकांत पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘‘रिडल्स’’ ग्रंथाची जाहीर होळी केली. मराठा समाजाने महाराष्ट्रभर दंगली-सदृश्य परिस्थिती निर्माण केली होती. त्याकाळीही प्रचंड मोर्चे व प्रतिमोर्चे काढले गेलेत. अशा हिंसक, जातीयवादी व ब्राह्मण्यग्रस्त मराठा नेत्यांच्या पार्श्वभुमीवर माननीय पुरूषोत्तम खेडेकरसाहेबांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा ‘मराठा सेवा संघ’ स्थापन केला, आणी त्याचे जंगी स्वागत दलित-ओबीसींनी केले. बामसेफ, ओबीसी सेवा संघ व मराठा सेवा संघ यांचे संयुक्तपणे कितीतरी प्रबोधनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर झालेत. प्रवीणदादाच्या नेतृत्वाखाली ‘संभाजी ब्रिगेडची’ स्थापना झाली व जेम्सलेनविरोधी, पुरंदरेविरोधी, भांडारकर-फोड, गडकरी पुतळा-तोड, दादू कोंडदेव पुतळा-उखाड यासारखी आक्रमक आंदोलने घेण्यात आलीत. याच आक्रमक आंदोलनांमुळे मराठा समाज जागृत झाला व आज आरक्षण मागायला पात्र झाला. त्यापूर्वी मराठा समाज ब्राह्मणांच्या नादी लागून ‘आरक्षणविरोधीच’ झालेला होता. संभाजी ब्रिगेडच्या या कार्यक्रमांमुळे मराठा समाज पुरोगामी वळणाला लागला. यामुळे मराठा समाजातून विचारवंत, साहित्यिक, लेखक, कवी, व्याख्याते निर्माण होण्याची साखळीच तयार झाली. मा.म. देशमूख व डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्या काळात अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घातला. -3- परंतू मराठा, ओबीसी व दलितांच्या या संयुक्त सामाजिक संसाराला दोन ब्राह्मण पेशव्यांची दृष्ट लागली आणी उभा महाराष्ट्र विस्कळीत झालेला आज आपण पाहात आहोत. फुले शाहू आंबेडकरी विचारांकडे जाणारा मराठा समाज आज अचानक ‘यु-टर्न’ घेऊन पुन्हा संघ-भाजपाच्या आहारी गेलेला आहे. मराठा समाजातील गायकवाड-कोकाटेंसारख्या पुरोगामी तरूणांनी मराठा आरक्षण चळवळ उभी केली आणी आज ही चळवळ पेशव्यांनी हायजॅक केली आहे. भोसले-मेटे त्रिकूटाला खासदारकी-आमदारकी देऊन खांद्यावर बसवून घेतले आहे. हे त्रिकूट संघ-भाजपाच्या खांद्यावर बसून मराठा आरक्षणाची चळवळ ब्राह्मणवादाच्या घशात घालत आहेत. मराठा आरक्षणाच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरत आहेत व दंगली-सदृश्य हिंसक वातावरण निर्माण करीत आहेत. मनुवादी मिडीया ‘‘मराठा-फोबीया’’ निर्माण करीत आहे. या गंभीर समस्येच्या काळात केवळ मराठा समाजातीलच नव्हेत तर दलित-ओबीसी कॅटेगिरीतील भलेभले विद्वान कोमात गेल्यासारखे सूम्म झाले आहेत. काय बरोबर आहे व काय चूक आहे, हे सर्व त्यांना स्पष्टपणे दिसत असूनही एक शब्द यांच्या तोंडातून निघत नाही. ही कोणती दहशत काम करते आहे? न्यायमुर्ती पी. बी. सावंत, न्यायमुर्ती बी. जी. कोळसेपाटील, मा. म. देशमुख, डॉ. आ. ह. साळुंखे, श्रीमंत कोकाटे, व्याख्याते बनबरे, हलकारे असे असंख्य विद्वान आज संकटकाळात कुठे लपून बसले आहेत, हे कळायला मार्ग नाही. ओबीसींमधले हरि नरके, कोत्तापल्ले! दलितांमधले खोब्रागडे, मच्छिंद्र सकटे, पोळके! भटक्यांमधले दोघे लक्ष्मण, माने, गायकवाड, अंधारे! मुसलमानातले आय.पी.एस. मुश्रीप, इनामदार, अजीज नदाफ हे कोणत्या फोबीयाला बळी पडलेले आहेत? ही कोणती दहशत काम करीत आहे? एरवी शांततेच्या काळात व सुगीच्या दिवसांमध्ये हेच विचारवंत-बुद्धीमान शेकड्याने व्याख्याने देत फिरतात. पत्रकार परिषदा घेऊन शासनाला कडक ईशारे देण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही. मग आता काय लकवा मारला गेला की काय यांना? आज प्रवीण गायकवाडसारखा एकमेव नेता संघभाजपाच्या दहशतीला झुगारून उघडपणे भुमिका घेतो आहे व ओबीसी-मराठा-दलित सख्य सांधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला साधा सपोर्ट देण्यासाठी तरी बीळातून बाहेर या! तुमची मूक-संमती हीच संघभाजपाची फार मोठी ताकद बनलेली आहे. त्यामुळे संघभाजपाचे लोक उघडपणे मराठा नेत्यांना चिथावणी देउन परीक्षा बंद पाडणे, नोकरभरती बंद पाडणे यासारखी बेकायदेशीर कृत्ये करीत आहेत व बेरोजगारीची विषारी फळे महाराष्ट्रातील करोडो तरूणांना भोगावी लागत आहेत. मुख्यमंत्री हतबल होउन यांच्या झुंडशाहीला बळी पडत आहेत. विचारवंतांनो! तुमच्यासारखे बुद्धीचे प्रखर सुर्य अंधारात लपून बसल्यामुळे काजव्याचीही लायकी नसलेले लोक आपली बे-अक्कल पाजळतांना दिसत आहेत. तुम्ही चुप्पी साधल्यामुळे लायकी नसलेले लोक वाटेल ते बरळत आहेत व समाजाचे स्वास्थ्य बिघडवीत आहेत. कोणी तलवार काढण्याची भाषा करतांना दिसतो आहे, ‘‘आम्हाला नाही, तर कोणालाच मिळू देणार नाही’’, अशी मद्यधुंद बडबड दुसरा कोणीतरी ‘बिनडोक’ करतांना दिसतो आहे. अशा परिस्थितीत या विचारवंतांनी किमान एकदा तरी बाहेर यावे व पत्रकार परिषद घेऊन ‘जे चालले आहे ते चूकीचे चालले आहे’ एवढे तरी म्हणण्याची हिम्मत दाखवावी. औरंगाबदहून मराठा समाजातील अविनाश खापे, मुंबईतून बंजारा समाजातील अनिल राठोड, सातारा-कराडमधून नाभिक समाजाचे संपतराव पवार यांच्या सारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आपापल्या जातीच्या चूकलेल्या नेत्यांना जाहीरपणे जाब विचारत आहेत. आणी तुम्ही सगळे दिग्गज म्हणविणारे बुद्धिमान मेंदूला कडी-कुलूप लावून घरात बसलेले आहेत. थोडी हिम्मत करा, बाहेर निघा, मुंबईत या, पत्रकार परिषद घ्या, भुमिका मांडून समाजाला मार्गदर्शन करा, हतबल झालेल्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांत्वन करा, त्यांना धीर द्या. राज्यपालांना भेटा, पवारसाहेबांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. शांततेच्या काळात प्रसिद्धीच्या झोतात वावरतांना गुदगुदल्या होतात, परंतू संकटाच्या काळात, संघर्षाच्या भोवर्‍यात सापडलेल्या महाराष्ट्राला तुमची गरज असतांना पळ काढू नका! बाहेर पडा आणी तोंड उघडा! तुर्त येथेच थांबू या! पुढील मुद्दे पुढील बहुजननामात!! सत्य की जय हो! (लेखनः 30 ऑक्टोंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन 01 नोव्हेंबर 2020) ------- प्रा.श्रावण देवरे Mobile – 88 301 27 270 ई मेलः- s.deore2012@gmail.com Blog ब्लॉग Link- https://shrwandeore.blogspot.in/

No comments:

Post a Comment