http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, November 29, 2020

132 BahujanNama Elect Candidate 29Nov20

बहुजननामा-132 ************** प्रा. श्रावण देवरे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील सत्यजित, बंडगर, पांचाळ व खोब्रागडे यांची ‘भुमिका’ विजयी करा! -1- महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघ व पद्वीधर मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असून 1 डिसेंबरला ‘मतदेण’ संपन्न होणार आहे. मागील आठवड्यात आम्ही जाहिर केले होते की, Obc+Sc+St+Ntvj+Dnt+Sbc+Muslim Obc या प्रवर्गांच्या संयुक्त आरक्षण मंचातर्फे ‘फुलेशाहूआंबेडकरवादी’ जी भुमिका जाहीर केली आहे, तीच भुमिका घेऊन जे उमेदवार निवडणूक लढवतील, त्यांना पाठींबा देण्याचा आम्ही विचार करू. भुमिकेतील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत- 1) OBC,SC,ST,VJ/NT SBC व मुस्लीम ओबीसी या संवैधानिक प्रवर्गात मराठा जातीसारखी कोणतीही उच्चजातीय घुसखोरी सहन केली जाणार नाही. 2) शैक्षणिक अभ्यासक्रमात फुले, शाहु, आंबेडकरी विचारांचे धडे व पुस्तके समाविष्ट करायला सरकारला भाग पाडणार 3) शिक्षणक्षेत्रातील सरंजामशाही व ब्राह्मणशाहीविरोधात सतत संघर्ष करणार 4) असंख्य पद्वीधर मुले कर्ज काढून MPSC व UPSC परीक्षांची तयारी करीत असतांना महाराष्ट्र शासनाने या परीक्षा अचानक पुढे ढकलल्यात. या सर्व परीक्षार्थिंना नुकसानभरपाई म्हणून किमान 1 लाख रूपये देण्यात यावेत व लवकरातलवकर परीक्षांचे आयोजन करावे. 5) थांबवलेली नोकरभरती त्वरीत सुरू करून पद्वीधर बेरोजगारांना लवकरात लवकर नोकरीत समावून घ्यावे. 6) ऍट्रॉसिटी ऍक्ट अधिकाधिक कडक करून या ऍक्टचे संरक्षण ओबीसीमधील बलुतेदार जातींनाही मिळाले पाहिजे. त्यासाठी या ऍक्टमध्ये सुधारणा करण्यात यावी 7) जात-पोटजातनिहाय जनगणना करायला लावून आरक्षणाची वर्गवारी लोकसंख्येनुसार करायला सरकारला भाग पाडणार. 8) जात-पोटजातनिहाय जनगणना केल्यानंतर त्यातील आकडेवारीच्या आधारे सर्व मागास कॅटेगिरीतील अतिअल्पसंख्य जातींसाठी आरक्षणाचे विभाजन करायला सरकारला भाग पाडणार. 9) निती आयोग बरखास्त करून प्लॅनिग कमिशनचे पुनर्गठण करणे व संवैधानिक आरक्षणाच्या प्रवर्गांना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये निधीची तरतूद केली पाहिजे असे काही महत्वाचे मुद्दे घेउन ही निवडणूक लढवली गेली पाहिजे. ही भुमिका जाहीर केल्यानंतर या भुमिकेला बर्‍याच मतदार-कार्यकर्त्यांनी फोन करून पाठींबा दिला. आपण उमेदवारांची नावे जाहीर करा, त्याप्रमाणे आम्ही मतदान करू, असेही त्यांनी सांगीतले. पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत जानराव, पुणे पद्वीधर मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव बंडगर, औरंगाबाद पद्वीधर मतदारसंघातील उमेदवार नागोराव पांचाळ व नागपूर मतदारसंघातील उमेदवार अतूल खोब्रागडे यांनी संपर्क केला व आपण मांडलेली भुमिका घेऊनच आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत, असे सांगीतले. त्याप्रमाणे पुणे येथे 25 नोव्हेंबर 20 रोजी जाहीर कार्यक्रम घेऊन या उमेदवारांनी आपली भुमिका जाहिर केली व प्रचारयंत्रणा सुरू झाली. -2- गेल्या 10 वर्षात ओबीसी कॅटेगिरीत राजकीय व सामाजिक जागृती वाढलेली आहे. त्यामुळे ब्राह्मण-मराठ्यांसारखे प्रस्थापित शोषक असलेले जात-सनेते भयभीत होणे स्वाभाविक आहे. कनिष्ठ मागास जातीतील जागृती विकाऊ असते, हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. एखाद्या मतदारसंघात एखादा शोषित-पिडित समाजघटक संख्येने जास्त असेल तर त्यांचाच प्रतिनिधी निवडूण येण्याची खात्रीही असते. असे अनेक मतदारसंघ आहेत, ज्यात तेली, माळी, धनगर, बौद्ध यापैकी एका-एका जातीची लोकसंख्या निम्म्यापेक्षाही जास्त आहे. अशावेळी अल्पसंख्य असलेला ब्राह्मण-मराठा नेता असेकाही षडयंत्र रचतो की जेणेकरून उच्चजातीय उमेदवार अल्पसंख्य असूनही सहजपणे निवडून येतो. उदाहरण दिल्याशिवाय आमच्या बहुजनांना समजतच नाही. उदाहरण पुढीलप्रमाणे- 2019 च्या नागपूर लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्य जातीचे नितीन गडकरी भाजपातर्फे उभे होते. या मतदारसंघात बौद्धांची संख्या जास्त आहे. नितीन गडकरी यांची इमेज अशी आहे की ते जणू संघ-भाजपाचे ‘नाक’ आहेत. संघ-भाजपाचे हे नाक कापण्याची फार मोठी संधी यावेळी बौद्धांच्या हातात होती. मात्र शत्रूचे नाक कापण्याऐवजी आपले स्वतःचेच नाक कापून घेण्यात आमच्या काही आंबेडकरवाद्यांना मजा वाटते. या निवडणूकीत 18 बौद्ध उमेदवार उभे राहीलेत. त्यामुळे बहुसंख्य असलेली आंबेडकरी मते विभागली गेलीत व अल्पसंख्य असलेले नितीन गडकरी सहजपणे जिंकून आलेत. 18 बौद्ध उमेदवार एकाच मतदारसंघात उभे करण्याचे षडयंत्र गडकरींचेच होते, हे वेगळे सागण्याची गरज नाही. शत्रूचे षडयंत्र यशस्वी करण्यात बौद्ध इतके पुढे आहेत, तर मग ओबीसींनी का म्हणून मागे राहावे? शिक्षक व पद्वीधर मतदारसंघात 50-50 पेक्षाही जास्त उमेदवार उभे आहेत. कोण आहेत हे बहुसंख्य उमेदवार? हे ओबीसी व दलित उमेदवार आहेत. या उमेदवारांमध्ये ओबीसी-दलित चळवळीशी संबंध नसलेले अनेक हौसे-नौसे-गौसे आहेत. कोणी उभे केले या हौस्या-गौस्यांना? अर्थातच प्रस्थापीत मराठा समाजाच्या नेत्यांनी अक्षरशः पैसे देऊन हे उमेदवार केले आहेत. जे षडयंत्र नितीन गडकरींनी नागपूर लोकसभा निवडणूकीत यशस्वी केले, तेच षडयंत्र शिक्षक व पद्वीधर निवडणूकीत मराठा उमेदवार करीत आहेत. मराठा समाज हा राजकीयदृष्ट्या जागृत राज्यकर्तावर्ग असल्याने अनेक मराठा उमेदवारांमधून ‘नेमका’ मराठा उमेदवार कोण व त्यालाच कसे निवडून आणले पाहिजे, याचे प्रशिक्षण मराठा समाजाला देण्याची गरज नाही, कारण प्रदिर्घ काळातील सत्तेतून हे शहाणपण सहजपणे येत असते. असे शहाणपण ओबीसी व दलितांकडे नाही. त्यांची राजकीय जागृती आजही जातीतच अडकलेली आहे. ‘राज्यकर्ता वर्ग’ बनण्याची फिलॉसॉफिकल क्षमता त्यांच्यात अजून आलेली नाही. त्यामुळे 5-25 हजार रूपयात ते आपल्या जातीला सहजपणे विकून टाकतात व त्याबद्दल त्यांना कुठेही लाज-लज्जा वाटत नाही. आताही या निवडणूकांमध्ये प्रस्थापित मराठा नेत्यांकडून 5-25 हजार रूपये घेऊन ओबीसी व दलित जातीतील काही उमेदवार निवडणूकीला उभे आहेत. ते वेगवेगळ्या जातींचे असल्याने त्यांना त्यांच्या जातीची मते मिळतील व मतांची विभागणी होऊन एकमेकात पाय अडकवून पडतील. आपण पराभूत झालोत तर आपल्या समाजाचे ‘नाक’ कापले जाईल, याचीही त्यांना पर्वा नसते. 5-25 हजार रूपये मिळालेत, यातच त्यांना आनंद वाटत असतो. पैसे खाऊन स्वतः घसरतात व समाजालाही ‘आडवे’ पाडतात. अशावेळी ओबीसी-दलित समाजातील मान्यवर नेत्यांनी व विचारवंतांनी उमेदवार निवडणूकीत हस्तक्षेप केला पाहिजे व चळवळीशी कट्टर नाते असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांनाच निवडूण आणण्याचे आवाहन केले पाहिजे. परंतू बरेचसे ओबीसी-दलितेनेते व विचारवंतही प्रस्थापित मराठा-ब्राह्मण जातीशी ‘‘बांधील’’ असल्याने ते असे ‘कार्य’ करू शकत नाहीत. म्हणून आमच्यासारख्या ‘गल्ली-बोळात’ काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी हे काम शिरावर घेतले आहे. आम्ही गेल्या आठवड्यात निवडणूकीची तात्विक भुमिका जाहिर केली व या भुमिकेला जाहीरपणे मान्यता देणार्‍या चार उमेदवारांची नावे प्रथम पसंतीची म्हणून घोषित करीत आहोत. हे चारही उमेदवार दलित-ओबीसी चळवळीत काम करणारे आहेत व ‘भुमिका’ घेऊन उभे आहेत. -3- ओबीसी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रदिप ढोबळे यांनी ‘मतदेण’ प्रक्रियेत भाग घेतांना एक महत्वपूर्ण सूचना केली आहे. ती मी सर्व सोशल मिडियावर व्हायरल केलेली आहे. त्याप्रमाणे पुणे शिक्षक मतदारसंघातील सत्यजित जानराव यांना पहिल्या पसंतीचं ‘मतदेण’ करतांना त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 1 असा आकडा लिहा. त्यानंतर डॉ. राजेंद्र कुंभार यांना दुसर्‍या पसंतीचं मतदेण करतांना त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 2 असा आकडा लिहावा. रविंद्र सोलंकर यांना तिसर्‍या पसंतीचं मतदेन करतांना 3 असा आकडा लिहा. सुरेश नारायण वाघमारे यांना चौथ्या क्रमाकाचे मत द्या! पुणे पद्वीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदेण करतांना शिवाजीराव बंडगर यांना पहिल्या पसंतीचं मत द्या व त्यांच्या नावासमोर इंग्रजीत 1 असा आकडा लिहा. त्यानंतर सोमनाथ जनार्दन साळूंखे यांच्या नावासमोर 2 असा आकडा इंग्रजीत लिहा. औरंगाबाद पद्वीधर मतदारसंघातील प्रा. नागोराव पांचाळ यांना पहिल्या पसंतीचं मतदेण करा. त्यानंतर सचिन अशोक निकम यांना दुसर्‍या पसंतीचं व शेख सलीम शेख इब्राहिम यांना तिसर्‍या पसंतीचं मतदेण करा. नागपूर पद्वीधर मतदारसंघातील अतूल खोब्रागडे यांना पहिल्या पसंतीचं मतदेण करा. वरीलपैकी प्रत्येक उमेदवाराने स्वतःसाठी प्रथम पसंतीचं मत मागावे व आपल्या वैचारिक जोडीदार उमेदवारांसाठी दुसर्‍या, तिसर्‍या क्रमांकाची मते मागायची आहेत. कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा व मनसे या पाच पक्षांच्या उमेदवारांना मते देऊ नका. या पक्षांच्या उमेदवारांच्या नावापुढे कोरी जागा ठेवावी, तेथे काहीही लिहू नये. कारण या पक्षातर्फे निवडून गेलेले आमदार-खासदार हे ओबीसी-दलितांचे शत्रू म्हणूनच काम करतात. हे उमेदवार आपल्या दलित-ओबीसींच्या मोर्च्यात-मेळाव्यात येऊन क्रांतिकारक भाषणे करून टाळ्या मिळवितात, मात्र विधानसभेत-लोकसभेत गेल्यावर मराठा-ब्राह्मणांच्या हिताचेच काम करतात. पक्षांच्या बैठकीत आपल्या उच्चजातीय मालकांपुढे दलित-ओबीसींच्या प्रश्नांवर बोलण्याची यांची हिम्मतही होत नाही. त्यामुळे या पाच पक्षांतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार कोणत्याही जातीचे असोत, त्यांचा सपशेल पराभव करा व आम्ही सांगीतल्याप्रमाणे फुलेशाहूआंबेडकरी ‘भुमिका’ स्पष्टपणे घेणार्‍या उपरोक्त चार उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देऊन त्यांच्या भुमिकेला विजयी करा. सत्य की जय हो!.......  लेखकः- प्रा. श्रावण देवरे मोबाईलः- 88 301 27 270 Links for this article:- 1) https://shrwandeore.blogspot.com/2020/11/132-bahujannama-elect-candidate-29nov20.html 2) https://deoreshrawan.blogspot.com/2020/11/132-bahujannama-elect-candidate-29-nov.html ईमेलः- s.deore2012@gmail.com ब्लॉग लिंकः- https://shrwandeore.blogspot.in/

No comments:

Post a Comment