बहुजननामा-84
संपेल ना कधी, हा खेळ फाळण्यांचा....! (भाग-2)
बहुजनांनो....
!
-1-
जवळपास सर्वच शेजारी देशांमध्ये सीमावाद असतो. जो देश
लष्करी प्रबळ असतो, तो शेजारच्या दुर्बळ देशाचा काही भूभाग आपल्या देशात समील करून
घेतो व सीमावाद सुरू होतो. दोन्ही शत्रूराष्ट्र जर
सारख्याच तोलामोलाचे प्रबळ असतील तर सामंजस्याचा करार करून ‘मध्य’ साधला जातो.
हॉंगकॉंग हे चीनचे बेट होते. मात्र ते 99 वर्षांच्या कराराने ब्रिटनने आपल्या ताब्यात घेतले व कराराप्रमाणे चीनला परतही केले. याच्या उलट चीनने भारताचा अरूणाचल वगैरेचा बराचसा भाग आपल्या
ताब्यात ठेवलेला आहे. डोकलाम प्रकरण आपण टिव्हीवर नेहमीच बघतो. चीन हा सर्वच
बाबतीत प्रबळ असल्याने त्याने ही हिम्मत केली. भारत प्रबळ की चीन
प्रबळ हे ठरविण्यासाठी 1962 ला भारत-चीन युद्ध झाले. या युद्धाचा एकतर्फी निकाल लागला तेव्हा सार्या जगाने मान्य केले की, आशिया
खंडात चीन देशच लष्करीदृष्ट्या प्रबळ आहे. त्यानंतर चीनने संपूर्ण जगातच व्यापारी मुसंडी मारून अमेरिका-रशियालाही
जेरीस आणले. व्यापारवाद, सीमावाद, तिबेटवाद अशा सर्वच बाबातीत चीन दंबंगगिरी करीत
असल्याने तो आपला मुख्य शत्रू आहे. परंतू 1962 पासून आपण चीनसमोर ‘उंदीर’ ठरलो
असल्याने भारताचे ‘‘भाग्यविधाते’’ चीनच्या वाटेला कधीच जात नाही. कालकथित जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री असतांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन
जगजाहीर केले की, ‘‘चीन हाच भारताचा प्रमुख शत्रू आहे, पाकिस्थान नाही.’’ त्यावेळी माजी प्रधानमंत्री आय. के. गुजराल वगळता कोणत्याही भारतीय
नेत्याने जॉर्ज फर्नांडीसच्या वक्तव्याला पाठींबा देण्याची हिम्मत दाखवीली नाही.
सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली होती. ‘‘भारताच्या भाग्य-विधात्यांनी’’ एका तासाच्या आत घाईघाईने पुन्हा नव्याने
पत्रकार परिषद घेउन जाहीर केले की, ‘जॉर्ज
फर्नांडीस यांचे ते वक्तव्य व्यक्तिगत होते, त्याचा भारतीय परराष्ट्र व संरक्षण धोरणाशी काहीही संबंध नाही.’ (https://www.oneindia.com/india/when-george-fernandes-called-china-indias-enemy-no-1-sparked-controversy-2843591.html व https://timesofindia.indiatimes.com/india/India-has-sold-out-to-China-George-Fernandes/articleshow/2911197.cms)
त्यानंतर तत्कालीन प्रधानमंत्री वाजपेयींना चीनमध्ये जाऊन
सारवासारव करावी लागली, तेव्हा कोठे चीन ‘शांत’ झाला. तेवढ्यावर चीनचे समाधान झालेच नाही. म्हणून प्रधानमंत्री वाजपेयींनी ‘तिबेट हा चीनचाच भाग असल्याचे जाहीर केले’ व
शरणागती पत्करली. चीनसमोरील आपले ‘उंदीरपण’
लपविण्यासाठी आपण दुबळ्या पाकीस्तानसमोर ‘वाघ’ बनून गुरगुरत असतो.
पाकीस्तानला मुख्य शत्रू बनविण्यात एक मोठा फायदा असतो, जो चीनच्या शत्रूत्वात
नाही. पाकिस्तानशी असलेल्या शत्रूत्वात ‘राष्ट्रीय’ शत्रूत्व दुय्यम असते,
धार्मिक’ शत्रूत्व प्राथमिक असते. पाकीस्तानशी असलेल्या शत्रूत्वामुळे भारतातील
प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात ‘पाकीस्तान’ निर्माण करता येते व अनेक
हिंदू-मुस्लीम युद्ध घडवून आणता येतात. भारतात कुठेच चीनी लोक राहात नाहीत,
त्यामुळे हिंदू-चीनी दंगली घडवून आणता येत नाहीत. त्यामुळे चीनशी असलेल्या शत्रूत्वाचा काहिहि
फायदा होत नाही, उलट नुकसानच होते. म्हणून आपण
आपला मुख्य शत्रू चीनऐवजी पाकिस्तानच ठेवलेला आहे.
‘पाकिस्तानशी असलेले धार्मिक शत्रूत्व कायम
राहावे, ते वाढवत जावे’, असाच प्रयत्न या देशाचे कारभारी ‘भारत-भाग्यविधाते’
सातत्याने करीत असतात. कारण दुबळ्या पहिलवानाशी वारंवार कुस्ती खेळण्यात व
जिंकण्यात एक वेगळाच आसूरी आनंद असतो. त्याचे अनुकरण करीत भारताच्या प्रत्येक
गावात व शहरात अशा अनेक कुस्त्या ‘दंगलींच्या’ नावाने खेळल्या जातात व जिंकल्या
जातात. या ‘नुरा’ कुस्त्या खेळण्यात दंग झालेली भारतीय जनता आरक्षणकपात, जातीअंत,
नोकरकपात, महागाई आदि जीवन जगण्याच्या कुस्त्या खेळण्याचे विसरूनच जाते. 370
कलम संविधानात घुसविणे व नंतर ते काढून टाकणे, हा राष्ट्रीय
कुस्त्यांचाच एक धोरणात्मक भाग होता व आहे.
-2-
कोणत्याही देशाला
आपल्या संस्कृतीशी मिळता-जुळता असलेला सलग भूप्रदेश आपल्या देशाचा हिस्सा असावा
असे वाटते. परंतू ज्यावेळी एखाद्या देशाची
निर्मिती होते, वा नव-बांधणी होते किंवा फाळणी होते, त्यावेळी संबंधित देशांच्या आर्थिक, लष्करी स्थितीवर व परराष्ट संबंधांवर नव्या सरहद्दी ठरतात. भारत-पाक
फाळणीच्या वेळी प्रधानमंत्री नेहरूं त्यांच्या तथाकथित समाजवादी भुमिकेमुळे भारत रशियाकडे झुकलेला होता. त्यामुळे स्वाभाविकपणे
अमेरिका-ब्रिटीश सारखे नव-साम्राज्यवादी देश उगवत्या पाकिस्थानच्या पाठीशी खंबीरपणे
उभे होते. अशाही परिस्थितीत भारत-पाकमध्ये तीन युद्धे झालीत व भारताने ती प्रचंड मुसंडी
मारून जिंकलीतसुद्धा. 1972 च्या युद्धात भारताने पाकिस्थानचा अविभाज्य भाग असलेला पुर्व
पाकिस्तान तोडून त्याला ‘बांग्ला देश’ म्हणून स्वतंत्र राष्ट्र निर्माण
करण्याचे अतिधाडसी कामही केले. हे कार्य अतिधाडसी यासाठी म्हणायचे की, दुसर्या
देशाच्या अंतर्गत कारभारात व अंतर्गत वादात तोंड खूपसणे हे आंतरराष्ट्रीय
मान्यतेच्या विरोधात आहे. आजही जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड
ट्रम्प काश्मिरबाबत ‘काही’ बोलतात, तेव्हा
समस्त भारतीय जनता, समस्त भारतीय नेते व लष्करासकट सगळेच लोक ट्रंम्पच्या ‘तोंड
खुपसेपणाचा’ निषेधच करतात. मग दुसर्या देशाच्या अंतर्गत वादात पडून त्या देशाचे
दोन तुकडे करणे, हे अतिधाडसी नाही काय? एवढे मोठे धाडस करता, मग आणखी थोडे धाडस
दाखवून काश्मिर पूर्णपणे भारतात का विलीन करून घेत नाहीत? भारताचे
लष्कर थेट लाहोरपर्यंत धडक मारून पाकला शरणागती पत्करायला लावते, हेच लष्कर
काश्मिरात मुसंडी मारून पुर्ण काश्मिरला भारतात सहज विलीन करू शकते. आणी असे धाडस करणे
कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात नाही, कारण काश्मिर हा भारताचा
अविभाज्य भाग आहे, हे सार्या जगाने मान्य केले आहे. ‘काश्मिर हा भारताचा अविभाज्य
भाग असल्याची जपमाळ’ करणारे ‘भारतभाग्य विधाते’ लष्करी कारवाई करून काश्मिरला
पूर्णपणे भारतात विलीन का नाही करीत? 370 चं दोनअंकी
नाटक कशासाठी?
श्रीलंका हे एक स्वतंत्र
बेट व राष्ट्र आहे. तेथे स्वतंत्र
तामिळ राष्ट्राची मागणी करणारी विद्रोही सशस्त्र आंदोलने व युद्धे होत आहेत. फार वर्षांपुर्वी भारत व श्रीलंका हे सलग भूप्रदेश होते. समुद्री
हालचालींमध्ये ते वेगळे झालेत. तेथे राहणारे लोक दोन भू-प्रदेशांमध्ये विभागले
गेलेत, मात्र त्यांची तामिळी संस्कृती अविभाज्यच राहीली. श्रीलंकेतील तामिळ
बहुल असलेल्या प्रदेशातील ‘हिंदू-बहुजन’ संस्कृती व श्रीलंकेची ‘सिंहली’ संस्कृती
यात कोठेही ताळमेळ नाही. त्यामुळे तेथे स्वतंत्र ‘तामिळ ईलमची’ मागणी झाली तर त्यात आश्चर्य काहीच नाही. हा श्रीलंकेच्या देशाअंतर्गत वाद आहे. त्यात भारताने तोंड खुसण्याचे काम
नाही. मात्र तरीही राजीव गांधी सरकारच्या काळात भारतीय लष्कर ‘शांतीसेने’च्या
नावाने तेथे पाठविले गेले व अत्यंत क्रुरपणे आपल्याच तामिळ बांधवांवर अत्याचार करीत
त्यांचे सांस्कृतिक स्वातंत्र्याचे आंदोलन मोडीत काढले गेले. या अनैतिक लष्करी
कारवाईच्या परिणामी आपण आपला एक तरूण प्रधानमंत्री अतिरेकी हल्ल्यात गमावून बसलो.
परंतू तरीही आमच्या भारत-भाग्यविधात्यांना त्याचे काही-एक सोयर-सुतक नाही. तामिळनाडूमधील
स्टेट व जनता श्रीलंकेतील तामिळ ईलम व लिट्टेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मात्र भारत सरकार त्यांच्या पाठीशी नाहीत, विरोधात
आहेत. याचे साधे कारण हे आहे की, श्रीलंकेत तामिळ राष्ट्र जर स्थापन झाले तर, त्याच्या सशस्त्र सपोर्टने भारतातही तामिळराष्ट्र निर्माण होईल,
याची गॅरंटी भारतीय भाग्यविधात्यांना आहे. बळीराजाची ‘तामिळ’ संस्कृती व भारत-भाग्यविधात्यांची
‘ब्राह्मणी संस्कृती’ या दोन स्वतंत्र संस्कृती असून त्यांच्यात समतेच्या
मुद्द्यांवरून इतिहासात अनेक ‘युद्धे’ झालेली आहेत व आजही हा संघर्ष सुरूच आहे. या
ऐतिहासिक युद्धाचाच एक भाग म्हणून भारतीय लष्कर शांतीसेनेचे नाव धारण करून
श्रीलंकेत गेले व तेथील तामिळी जनतेचा खात्मा करून आले. भारतातील तामिळ जनतेसकट
श्रीलंकेतील तामिळींचे एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले तर ते जात्यंतासाठी शेजारच्या
जातीयवादी देशांशी निष्ठेने युद्ध करणारे
जगातील ‘एकमेव राष्ट्र’ ठरेल व त्याच्या आक्रमणापुढे भारतीय ब्राह्मणी-छावणी फौज जीव घेउन पळत फिरेल.
-3-
श्रीलंकेसारख्या व बांग्ला देशासारख्या दुसर्या देशांचे अंतर्गत प्रश्न
सोडविण्यासाठी भारतीय लष्कराचा यशस्वीपणे वापर होतो, मात्र आपल्याच देशाचा काश्मिर
प्रश्न सोडवीला जात नाही. तो 370 च्या खूंटीवर का टांगून ठेवला जातो व आता ही
खुंटी काढून का फेकून देण्यात आली आहे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच मातीत दडलेली आहेत. आणी ती माती अन्नधान्य
उगवत नाही, फक्त धर्माची अफू, जातीय गांजा व वांशिक चरस उगवते. काश्मिरचा विषय या
देशाचा राष्ट्रीय धोरणाचा भाग होऊ शकतो, मात्र जातीअंत, आरक्षण, जात-गणना
आदि प्रश्न पार्लमेंट्री चर्चेचाही विषय होऊ शकत नाहीत, राष्ट्रीय धोरणाचा भाग
होणे फारच लांबचे. चीन हा भारताचा खरा व एकमेव मुख्य शत्रू आहे, मात्र हा विषय कधीच
पार्लमेंट्री चर्चेचा भाग नसतो, पाकिस्तानवर पार्लेमेंटमध्ये भरभरून चर्चा होते.
मिडिया तर बाराही महिने, चोबीसो तास
पाकिस्तानशिवाय दुसरी कुठलीच चर्चा करीत नाही. आधी भारताची फाळणी, नंतर
पाकिस्तानची फाळणी, आता काश्मिरची फाळणी, काही वर्षानंतर ईशान्य व पंजाब वगैरेसारखी राज्ये फाळणीचे विषय
ठरतील व तेच भारताचे राष्ट्रीय धोरण म्हणून आपल्या बोकांडी बसविले जाईल. या अशा
फाळण्यांचा खेळ पाहण्यात आम्ही दंग राहतो व आमच्या जीवन-मरणाचा विषय असलेली
ब्राह्मणी-अब्राह्मणी संस्कृतीची फाळणी करण्याचे आम्ही विसरूनच जातो.
फुले-शाहू-आंबेडकरांसारखे महापुरूष वारंवार जन्माला येतात व या सांस्कृतिक फाळणीची
आठवण वारंवार देत असतात. परंतू ही फाळणी टाळण्यासाठी ते वारंवार वेगवेगळ्या
धार्मिक व प्रादेशिक फाळण्या घडवून आणतात व ब्राह्मणी-अब्राह्मणी संस्कृतीची फाळणी
करण्याचा विषय गाडून टाकतात. ब्राह्मणी-अब्राह्मणी संस्कृतीच्या फाळणीला ‘राष्ट्रीय’ धोरणाचा भाग होऊच देत नाहीत. कोण ठरवितो ही राष्ट्रीय व परराष्ट्रीय धोरणे? पाच हजार वर्षांपूर्वी
युरेशीयातून आलेली ही ‘आर्यवंशीय माती’ आपल्या भारताच्या पवित्र मातीत एक विषारी रासायनिक खत म्हणून मिसळली गेली आहे. अशा विषमय झालेल्या मातीतून
उपजलेली माणसं ‘भारताचे भाग्यविधाते’ होऊन बसलेले आहेत व ते आपल्या देशाचे
राष्ट्रीय व परराष्ट्रीय धोरण ठरवित आहेत. ब्राह्मणी-वैदिक संस्कृतीची विदेशी
विषारी माती आपल्या मूळ भारतीय मातीत मिसळलेली आहे, ती समतेची चाळणी लावून, फाळणीने वेगळी काढून फेकल्याशिवाय आपला देशाची
माती खर्या अर्थाने स्वतंत्र व लोकशाहीवादी होऊ शकत नाही. हे समजून घेण्याची क्षमता जोपर्यंत आपल्यात येत नाही, तो पर्यंत जय जोती, जयभीम... सत्य की जय
हो!!!!
-------
प्रा.
श्रावण देवरे
Mobile
– 88 301 27 270
Blog
ब्लॉग
(महत्वाची
सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित
करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)
या
लेखाशी संबंध असलेला एक संदर्भ म्हणून महाराष्ट्र टाईम्सचा 20 वर्षांपूर्वीचा एक
अग्रलेख यथे दिलेला आहे. पुढील पानावर आहे, तो अवश्य वाचा...... त्यासोबत आणखी काही ताज्या
बातम्या.......





No comments:
Post a Comment