बहुजननामा-112
अंगामाढो-3
-1-
आज देशात अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांमध्ये असा एकही पक्ष नाही की, ज्या पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्याने प्रवेश घेऊन देशाच्या व्यापक हितासाठी राजकीय चळवळ उभी करावी. जनता नेहमी पर्याय शोधत असते. कॉंग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय जनआंदोलनातून निर्माण झालेला पक्षही एका कुटुंबाची खाजगी मालमत्ता बनलेला आहे व तो ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य या जातींशिवाय दुसरे कोणाचेही हित साधू इच्छित नाही. कॉंग्रेस नको तर मग दुसरे कोण? जनसंघ-भाजपाकडे जाण्याआधी जनतेने अनेक पर्याय शोधलेत, स्वीकारलेत व त्यांना काही अंशी सत्ताही दिली. मात्र भारतीय जनतेचं मूलभूत जातीव्यवस्थेचं दुःख निवारण्यास सगळेच राजकीय पक्ष नालायक ठरले आहेत. बहुतेक सर्वच राजकीय पक्ष व्यक्तिगत, कौटुंबिक व स्वजातीय हिताचे झालेले आहेत. याला समाजवादी व कम्युनिस्ट पक्षही अपवाद नाहीत. कारण त्यांना जातीव्यवस्थेला कोणताही धक्क न लावता वर्गीय क्रांती करायची आहे व देशात समता आणायची आहे, की ‘जे कधीच शक्य नाही.’ जातीव्यवस्था नष्ट केल्याशिवाय या देशात कोणताही क्रांतिकारीवाद वा सुधारणावाद मूळ धरू शकत नाही, हा बाबासाहेबांचा सिद्धांत वारंवार सिद्ध झाल्यामुळे आता कुणीही प्रामाणिक कार्यकर्ता या कम्युनिस्ट पक्षांकडे फिरकणार सुद्धा नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगील्याप्रमाणे या देशाचे मुख्य दोन शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही व दुसरा भांडवलशाही! त्यासाठीच त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला होता. बाबासाहेबांनी 1936 पर्यंत संघटन, प्रबोधन व संघर्ष करतांना जातीय आधार घेतला. मात्र राजकीय मैदानावर येताच वर्गीय पक्ष स्थापन केला. सेम टू सेम तात्यासाहेब! तात्यासाहेब महात्मा फुले यांनी ब्राह्मणशाहीच्या विरोधात जातीय प्रबोधन केलं, मात्र रस्त्यावरचा जात्यंतक-संघर्ष करतांना त्यांनी वर्गीय सघटन उभं केलं. रावबहादूर कृष्णराव भालेकर व रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे तात्यासाहेबांचे महान शिष्य होत. भालेकरांनी शेतकर्यांचे संघटन करून सावकारशाहीविरोधात क्रांतिकारी बंड केलं. ते देशाचे पहिले शेतकरी नेते ठरलेत. नारायण मेधाजी लोखंडे यांनी देशातील पहिली कामगार संघटना उभी केली व यशस्वी संपही केलेत. तात्यासाहेब महात्मा फुलेंचे म्हस्के नावाचे एकमेव मराठा शिष्य होते. म्हस्केंनी ‘मराठा’ नावाने जातीय संघटन स्थापन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तात्यासाहेब महात्मा फुलेंनी त्यांचे चांगलेच कान उपटले. जातीव्यवस्था नष्ट करायची असेल तर त्यासाठी जातीय आधाराचे संघटन वा जातीय पक्ष स्थापन करून चालणार नाही. त्यातून ब्राह्मणशाहीचेच भले होईल! जातीव्यवस्था समूळ नष्ट करायची असेल तर वर्गीय संघटना व वर्गीय पक्ष स्थापन करूनच जात्यंतक-संघर्ष करावा लागेल.
तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या काळात वर्गव्यवस्था जन्मालाही आलेली नव्हती, ब्रिटिशांमुळे ‘वर्ग’ हे जातीच्या पोटात आकार घेत होते. परंतू महापुरूष द्रष्टे असतात. ते पाच हजार वर्षांचा इतिहास अभ्यासून वर्तमान काळाचे विश्लेषण करतात व पुढील 500 वर्षे मार्गदर्शक ठरेल, असे तत्वज्ञान सिद्ध करून जातात. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी द्रष्टेपणाने जातीच्या पोटात आकार घेत असलेले वर्ग पाहिले व भविष्यातील वर्गसंघर्षावर जात्यंतचीही जबाबदारी टाकून लोकशाही क्रांतीच्या नव्या तत्वज्ञानाची पायाभरणी केली. महामानव गौतम बुद्धांच्या काळात जातीव्यवस्था नव्हती, जरठ झालेली वर्णव्यवस्था होती. जाती नुकत्याच आकाराला येत होत्या. बौद्ध धम्माने वर्णव्यवस्था नष्ट करण्याची क्रांती केली. परंतू उगवत्या जातीव्यवस्थेलाही कडाडून विरोध केला. भावी काळातील जात्यंतक संघर्षाचे सूत्रही दिले. त्यालाच सौत्रांतिक बौद्धवाद म्हणतात. काळाच्या ओघात गडद अंधारात गेलेला हा क्रांतीकारक बौद्ध धम्म कॉ. शरद पाटलांना पहिल्यांदा गवसला आणी त्यांनी या बौद्धवादाचा मार्क्सवादाशी एकमय संयोग करीत ‘‘सौत्रांतिक मार्क्सवादा’’ची उभारणी केली.
त्याचप्रमाणे तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंनी उगवत्या वर्गव्यवस्थेचाही अभ्यास केला व त्यातून जात-वर्ग-स्त्रीदास्यांतक लोकशाही क्रांतीच्या तत्वज्ञानाची पायाभरणी केली. पुढे बाबासाहेबांनी हेच तत्वज्ञान विकसित करून ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ हा वर्गीय पक्ष स्थापना केला. बाबासाहेबांनी पक्ष स्थापन केल्यानंतर या पक्षाला मोठे यशही प्राप्त व्हायला लागले. एक वर्षाच्या आत झालेल्या निवडणूकीत (1937) स्वतंत्र मजूर पक्षाने 17 जागा जिंकल्यात, त्यापैकी तीन ओपन म्हणजे सवर्ण उमेदवार होते व दोन उमेदवार ओबीसी जातीतले होते. परंतू इंग्रज राज्यकर्त्यांकडून भारताला मिळत असलेले सत्तेचे मर्यादित अधिकार ‘वर्गीय’ नव्हे तर ‘जातीय’ आधारावर मिळत होते. जेव्हा बाबासाहेबांना असा प्रश्न विचारला गेला की, ‘‘तुम्ही मजूरांचे प्रतिनिधी आहात की अस्पृश्यांचे?’’ तेव्हा त्यांना स्वतंत्र मजूर पक्ष गुंडाळून ठेवावा लागला व पुन्हा जातीय पक्षाकडे वळावे लागले. बाबासाहेबांनी जातीय आधारावरचा ‘शेकाफे’ पक्ष स्थापन केला आणी 1944 च्या निवडणूकीत सपशेल पराभव झाला. खूद्द बाबासाहेबही त्यानंतर कधीच निवडून आले नाहीत. संविधान सभेत जाण्यासाठी त्यांना एकदा जोगेन्द्रनाथ मंडल यांची मदत घ्यावी लागली व दुसर्यांदा कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून यावे लागले.
अस्पृश्य चळवळीची मर्यादित ताकद, बलाढ्य शत्रू कॉंग्रेस, हिंदू महासभा व संघ-जनसंघांचा उघडा-नागडा ब्राम्हणवाद, समाजवादी-कम्यनिस्टांचं ‘‘सोशल डिस्टन्सिंग’’ व सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्रज राज्यकर्त्यांनी जाता-जाता बाबासाहेबांचा केलेला विश्वासघात; हे सर्व पाहता बाबासाहेबांना आपल्या मूळच्या जात-वर्गांताच्या क्रांतिकारक भूमिकेकडे कधीच परत जाता आले नाही. या काळात बाबासाहेबांना ब्राह्मणशाहीला अनुकूल असलेली ‘जातीय भुमिका’ घेउनच काम करावं लागलं. संविधान सभेतही जात्यंतकऐवजी जात-समन्वयाचीच भुमिका घेऊन संविधानाची निर्मिती करावी लागली. संविधान हे ब्राह्मणी व अब्राह्मणी या दोन युद्धरत राष्ट्रांमधला तात्पुरता ‘तह’ म्हणून अस्तित्वात आलेले आहे, तेही केवळ उदारमतवादी इंग्रजांच्या दबावामुळे! आपल्या या मवाळ भुमिकेचं समर्थन स्वतः बाबासाहेब करतात. ते स्पष्टपणे म्हणतात- ‘‘सतत संघर्षाची भुमिका घेत लढत राहाणं शहाणपणाचं नाही’’. ‘1945-46 नंतर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारक राहीले नाहीत,’ हे कॉ. शरद पाटलांचे म्हणणे सत्य असले, तरी त्याचे विश्लेषण मात्र शपांनी केले नाही. मी केलेले उपरोक्त विश्लेषण लक्षात घेता, त्याकाळी कोणत्याही महापुरूषाने बाबासाहेबांसारखीच भुमिका घेतली असती. इंग्रजांनी बाबासाहेबांना आजवर दिलेला पाठिंबा काढून घेतल्यामुळे कॉंग्रेस मुजोर व आक्रमक झाली होती. संपूर्ण देशाला स्वातंत्र्याचा अधिकार मिळत असतांना अस्पृश्यांनी संघर्ष करून मिळविलेले अधिकार हिरावले जातात की काय, अशी परिस्थीती निर्माण झाली होती. जे आहे तेच टिकविणे मुष्कील झाले होते. स्वतंत्र भारतात अस्पृश्यांचे अधिकार टिकऊन ठेवण्यासाठी बाबासाहेबांना समन्वयाची भुमिका घेणं भाग पडलं. समन्वयाच्या भुमिकेतून बाहेर पडून पुन्हा एकदा जात-वर्गांताच्या क्रांतिकारक सिद्धांताकडे वळण्याचा प्रयत्न त्यांचे महान शिष्य असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी केला, मात्र त्यांनाही कॉंग्रेसने त्वरीत गिळंकृत केले. त्यानंतरचे बाबासाहेब आंबेडकरांचे बरेचसे ‘वारसदार’ कॉंग्रेस व संघ-भाजपाच्या अंगणात बसून जयभीम नावाचे क्रांती-गीत गात आहेत.
‘‘वर्गीय संघर्षातूनच जातीव्यवस्था आपोआप नष्ट होईल, हे कम्युनिस्ट पक्षांचे धोरण चूकीचे आहे, जातीव्यवस्था ही वर्गाप्रमाणेच पायाभूत शोषणाची व्यवस्था आहे’’, अशी नवी सैद्धांतिक मांडणी कॉ. शरद पाटलांनी केल्यावर त्यांना मार्क्सद्रोही व पक्षशत्रू ठरविण्यात आले. तेव्हा शपांनी ‘मार्क्सवाद-फुलेआंबेडकरवाद’ या नव्या तत्वज्ञानाची मांडणी केली व जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची भूमिका घेत ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष’ स्थापन केला. 1978 ला पक्ष स्थापन होताच आम्ही या पक्षात दाखल झालोत व पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करू लागलोत. शपांना आपल्या सामर्थ्याची व मर्यादांची पूर्ण कल्पना होती. जरी शपांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केलेला असला, तरी तो वर्गवादी ब्राह्मणी कम्युनिस्टांवर बाहेरून तत्वज्ञानात्मक दबाव टाकणारा केवळ एक दबाव-गट होता.
आज 70 वर्षांनंतर खूप परिस्थिती बदलली आहे. जनतेने अनेक जातीय व वर्गीय पर्याय अनुभवले आहेत. जातीव्यवस्था जर्जर झाली असून ती आता मरणाची वाट पाहात आहे, परंतू तीच्या मृत्युस कारणीभूत होईल असा ‘‘ बस्स! एक धक्का और’’ मारणारा एकही सक्षम नेता व पक्ष आज अस्तित्वात नाही. संघ-भाजपा जातीव्यवस्थेला व्हेंटीलेटरवर ठेवून जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत व त्यातून ते नवी अखिल भारतीय पेशवाई स्थापण्याचा यशस्वी प्रयत्न करतांना दिसत आहेत. अशा परिस्थितीत भारताची शूद्रादिअतिशूद्र जनता पुन्हा एकदा नव्या पर्यायाच्या शोधात आहे. अशावेळी अंगामाढो यांनी पुढे आले पाहिजे व जनतेसमोर नवा जात्यंतक-वर्गांतक राजकीय पर्याय ठेवला पाहिजे.
या आधीचे जातीय-वर्गीय राजकीय पर्याय जनतेने स्वीकारूनही, कशामुळे ते नेस्तनाबूत झालेत, याचा अभ्यास करून या नव्या पक्षाची तात्विक बैठक तयार करावी लागेल. ही तात्विक बैठक कशी असेल, कृती कार्यक्रम काय असू शकतात व नवा संकल्पित पक्षाची रचना काय असू शकते, अशा सर्व प्रश्नांची चर्चा आपण शेवटच्या चौथ्या भागात (बहुनजननामा-113 मध्ये) करू या!
तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 22 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 24मे20)
लेखकः- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 270
Mobile – 88 301 270
Link to
read this article in text file
बहुजननामाचे सर्व लेख वाचण्यासाठी
पुढील ब्लॉग लिंकवर क्लिक करा....
Blog ब्लॉग लिंक- https://shrwandeore.blogspot.in/

No comments:
Post a Comment