बहुजननामा-113
अंगामाढो-4 (अंतिम भाग)
-1-
अंगामाढो हेच का? श्रीमंत कोकाटे, सचिन बगाडे, नागोराव पांचाळ, कल्याण दळे, राजेंद्र कुंभार, माधव सरकुंडे, सचिन डोरले, जावेद पाशा, सुनिल गोटखिंडे, आदिम कोळी, ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, अरूणा माळी, सचिन राजूरकर, बळीराज धोटे अशी असंख्य तरूणांची फौज महाराष्ट्रात प्रामाणिकपणे काम करीत असतांना तुम्ही या चारच लोकांची नावे का घेत आहात? आणी हो, तुम्ही स्वतः श्रावण देवरे जबाबदारीतून अंग का काढून घेत आहात? अंगामाढो मध्ये स्वतःचं नाव का घातलं नाही? असे अनेक प्रश्न मला विचारले गेलेत? याचा खुलासा करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
मला प्रथम हे स्पष्ट करू द्या की, अंगामाढो ही कोण्या चार माणसांची नावे नाहीत. अंगामाढो ही एक प्रवृत्ती आहे, की ‘‘जिच्यात अंगभूत गुण व कार्य-कर्तृत्वाची घुसळण आहे आणी राजकीय महत्वाकांक्षेमुळे ती सातत्याने गतिमानही होत असते’’ अशी ही अंगामाढो प्रवृत्ती महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतात लाखों तरूणांमध्ये कार्यरत आहे. त्या असंख्य तरूणांच्या कार्य-प्रवृत्तीला कोणत्या तरी नावाने एकत्रित करण्याच्या प्रयत्नात मी अंगामाढो हे नांव घेतले. उद्या असा प्रयत्न नागेश चौधरींनी केला तर ते ‘अंगामाढो’ऐवजी वेगळंच ‘भोनाडेमो’ नामकरण करू शकतात. किंवा शिवानंद हैबतपूरे यांनी असा प्रयत्न केला तर कदाचित ते ‘सोकांबझ’ असंही नामकरण करू शकतात. राजकूमार घोगरे कदाचित ‘लंसामांधु’ असे नामकरण करतील. अंगामाढो म्हणजे सुषमा अंधारे, प्रवीण गायकवाड, सुरेश माने, प्रदिप ढोबळे ही चार नावे प्रातिनिधिक आहेत. कदाचीत मी या चार लोकांच्या सहवासात जास्त आल्याने त्यांची नावे माझ्या मेंदूवर जास्त ठळकपणे कोरली गेली असावीत. या चौघांनी आपली वैचारिक बैठक पक्की करून आपल्या स्वकर्तृत्वावर ‘उभारी’ सिद्ध केली आहे व त्यांच्यात जबरदस्त राजकीय महत्वाकांक्षा आहे. राजकीय महत्वाकांक्षा नसेल तर राजकीय चळवळ उभी राहणारच नाही व परिवर्तन प्रत्यक्षात येणारच नाही. अर्थात सगळ्यांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा नसते. ज्यांना फक्त सामाजिक क्षेत्रात राहून प्रबोधनाची मशागत करायची आहे, त्यांनी ते काम करीत राहावे. परंतू या मशागत केलेल्या शेतात पेरणी, कापणी कोणी केलीच नाही तर, मशागतीचे शेत वांझोटेच राहते. तुमच्या प्रबोधनातून राजकीय पक्ष निर्माण व्हावा लागतो.
-2-
महाराष्ट्रात व भारतात असंख्य पुरोगामी व क्रांतीकारक पक्ष अस्तित्वात असतांना पुन्हा नवा पक्ष स्थापन करून काय साध्य होणार आहे, असा प्रश्नही मला विचारला गेला. अर्थात या प्रश्नाशी निगडीत विवेचन मी अंगामाढोच्या दुसर्या व तिसर्या भागात केले आहे. काहींचा असाही समझ झाला की, हे चार लोक वेगवेगळ्या चार कॅटेगिरीतील वेगवेगळ्या चार जातींचे चेहरे आहेत, म्हणून मी त्यांच्या नावाने काही नवा पर्याय सूचवित आहे. असे अजिबात नाही. वेगवेगळ्या जाती-धर्माचे चेहरे दाखवून मते घेण्याचे व सत्ता काबीज करण्याचे धंदे बहुतेक सर्वच पुरोगामी व प्रतिगामी पक्षांनी केले आहेत व आजही करीत आहेत.
कॉंग्रेसने देशपातळीवर जगजीवनराम-झाकिर हुसेन यासारखे चेहरे दाखवीलेत व मुसलमान-दलितांची मते घेऊन दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. राज्यपातळीवर मराठा जाट पटेलवगैरे क्षत्रिय जातींना राज्यस्तरावरची ‘मांडलिक’ सत्ता देऊन खूश करण्यात आले व त्याबदल्यात अखिल भारतीय सत्ता ताब्यात घेतली. परंतू याचा परिणाम असा झाला की, सातत्याने एक-दोन जातीच सत्तेवर येत राहिल्याने इतर जातीत प्रतिक्रियात्मक राजकीय जागृती झाली. परिणामी इतर जातींनी प्रादेशिक राजकीय पर्याय शोधलेत. लालू-मुलायम-कांशिराम यांनीही अशीच एक-दोन जातींची मोट बांधून काही काळ सत्ता मिळवीली. सपा, बसपा व राजद सारख्या पक्षांमुळे हिंदी राज्यातील यादवेतर जातीं व चांभारेतर जातींमध्ये प्रतिक्रियात्मक राजकीय जागृती झाली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठा जातींच्या प्रतिक्रियेत इतर जाती जागृत झाल्यात. या इतर जातींची प्रतिक्रियात्मक जागृती आधी शिवसेनेने व नंतर भाजपाने कॅश केली. भाजपाने मोदींचा ‘ओबीसी’ चेहरा दाखविला व सैतानी बहुमत घेउन पूर्ण देशच हडप केला.
जातीच्या आधारावर भक्कम राजकीय पर्याय दिला एकट्या तामिळनाडूच्या ओबीसींनी! कोणताही चेहरा न दाखवता केवळ वैचारिक प्रबोधन करून जनतेची मते घेणारे व प्रदिर्घ काळ सत्तेवर असलेले दोनच पक्ष आहेत, आणी ते म्हणजे तामिळनाडूतील डी.एम.के. व आण्ना डी.एम.के. हे पक्ष! स्वामी पेरियारांनी तेथे ब्राह्मणी-वैदिक संस्कृतीच्या विरोधात उघडपणे व आक्रमकपणे चळवळ उभारली. ही खर्या अर्थाने अब्राह्मणी क्रांती होती, जात्यंतक चळवळ होती. त्यामुळे त्या राज्यात संघ-भाजपाला व कॉंग्रेसला आजही प्रवेश मिळत नाही. तेथील दोन्ही राजकीय पक्ष शुद्ध ओबीसींचे असून तेच आलटून-पालटून सत्तेवर येत राहतात. परंतू हे पक्षही आताशा व्यक्तिगत-कौटुंबिक खाजगी मालमत्तेचे झालेले आहेत. कारण, पेरियारकृत अब्राह्मणी प्रबोधन बंद पडलेले आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये केव्हाही संघ-भाजपाप्रणित कमल हसन वा रजनीकांतचा पक्ष सत्तेवर येऊ शकतो व ब्राह्मणी प्रतिक्रांती होऊ शकते.
निव्वळ वर्गीय आधारावर कम्युनिस्ट पक्षांनी प. बंगाल व केरळमध्ये प्रदिर्घ काळ सत्ता मिळविली, मात्र अब्राह्मणी प्रबोधनाअभावी आता तेथेही व्हाया-ममता बॅनर्जी भाजपाची प्रतिक्रांती दाखल होत आहे. केरळमध्ये नारायण गुरू व बळीराजाच्या प्रभावामुळे तेथे संघ-भाजपाला अजून प्रवेश मिळालेला नाही. मात्र तेथेही सबरीमाला व आयप्पा मंदिराचा वापर करून संघ-भाजपा ब्राह्मणी प्रबोधन करीत आहे. त्याला शह देण्यासाठी केरळच्या कम्युनिस्ट सरकारकडे कोणताही अब्राह्मणी प्रबोधनाचा कार्यक्रम नाही, कारण ते निव्वळ वर्गीय पयावर उभे आहेत.
-3-
हे सर्व अनुभव पाहता अंगामाढो यांना जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची भूमिका घेऊन तात्विक बैठक तयार करावी लागेल. कॉ. शरद पाटील यांनी या दिशेने एक मोठी वाट प्रशस्त करून दिलेली आहे. त्या वाटेवर तरूण कार्यकर्त्यांना गोळा करीत प्रबोधनाची लाट निर्माण करावी लागेल. शपांना मानणारा एक मोठा तरूण वर्ग महाराष्ट्रात आहे. तुम्ही वाट पकडताच हा तरूणवर्ग तुमच्या दिमतीला हजर होईल! एकीकडे प्रबोधनाची चळवळ व दुसरीकडे जात-वर्गनिहाय जनगणनेची चळवळ अशी सैद्धांतिक व व्यवहारिक सांगड घालत पक्षनिर्मीतीकडे वाटचाल करावी लागेल. जात-वर्गनिहाय जनगणनेची चळवळ यासाठी की, जात-वर्गांतच्या लढाईसाठी आपल्याजवळ आधुनिक डेटाच नाही! मैदानी युद्धात अत्याधुनिक शस्त्र नसेल तर पराभव निश्चित असतो! त्याचप्रमाणे राजकीय-सामाजिक लढाईत ‘आधुनिक मुद्दे’ नसतील तर जिंकण्याची शक्यताच नाही. आजवर आम्ही जातीअंताची लढाई 3-4 हजार वर्षांपूर्वीच्या रामायण-महाभारताच्या कथा व पोथी-पुराणे घेऊन लढतो आहोत. आम्हाला 90 वर्षांपूर्वीची म्हणजे 1931 सालची जनगणना घेऊन ओबीसींची लढाई लढावी लागते आहे. 2021ला वर्ग-जातनिहाय जनगणना झाली तर प्रत्येक जाती-उपजातीची व कामगार-शेतकरी सारख्या कष्टकरीवर्गाचीही ताजी आकडेवारी मिळेल. करोनाच्या महासंकटात लाखो हात-मजूरांचे हाल होत आहेत. जर त्यांची जातीय-वर्गीय आकडेवारी व इतर डेटा उपलब्ध असता तर मदत करणार्या संघटनांनाही सूत्रबद्ध उपाय-योजना आखता आल्या असत्या व मजूरांचे एवढे हाल झाले नसते.
जात-वर्गनिहाय जनगणना झाली तर ‘जात-वर्गव्यवस्थेच्या नव्या अर्थशास्त्राची मांडणी तज्ञ लोक करू शकतील! हे जातीचे अर्थशास्त्रच आपले ‘नवे शस्त्र’ बनेल. त्यातून होणारी जागृती आपली चळवळ भक्कम करेल.
असा क्रांतिकारक पर्याय उभा राहात असतांना संघ-भाजपा व कॉंग्रेस-राष्ट्रवादीसारखे प्रतिगामी पक्ष आपली गंमत पाहात शांत बसून राहतील, असे समजणे चूकीचे ठरेल! सर्वात आधी अंगामाढो हे समिकरणच जूळणार नाही, असा प्रयत्न ते करतील. एकेकट्याला पकडून काहीही भीती घालून ते यात खोडा घालतील. अर्थात अंगामाढो हे आपल्या जीवनात स्वच्छ व पारदर्शी असल्याने ते अशा घाबरवण्याला भीख घालणार नाहीत. नंतर ते एकेकट्याला पकडून त्याची स्तुती करतील व त्याच्यात व्यक्तीगत इगो वा जातीय इगो जागृत करून एकमेकाममध्ये वितुष्ट निर्माण करतील. अर्थात त्याही बाबतीत अंगामाढो हे पक्के मॅच्युअर असल्याने इगो नावाचा शब्द अंगामाढोच्या डिक्शनरीतून कायमचा डिलीट झालेला आहे.
त्यानंतर पक्षाच्या पदाधिकार्यांच्या रचनेवरून वा मिळणार्या संभाव्य सत्तेच्या वाटपावरून आपसात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. असा कलह निर्माण होऊ नये म्हणून पक्षाच्या घटनेत व जाहीरनाम्यात काही अपरिवर्तनीय नियम समाविष्ट करावे लागतील. त्याची एकदोन उदाहरणे मी देतो. पक्षातील सत्ता वा राजकिय सत्ता वाटप करण्याची पद्धत शोषणाच्या जात-वर्गीय उतरंडीच्या व्यस्त प्रमाणात ठरली पाहिजे. पक्षाचे अध्यक्षपद, जनरल सेक्रेटरीपद यासारखी निर्णायक पदे व राजकीय सत्तेतील मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, अर्थमंत्री वगैरे महत्वाची पदे ही सर्वात जास्त शोषित जात-वर्गाला मिळाली पाहिजेत. ‘‘जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी भगिदारी’’ ही घोषणा भोंगळ आहे. या घोषणेमुळेच तर सपा, बसपा व राजदसारख्या जातीय पक्षांनी मुख्यमंत्री पद एकाच चांभार, यादव जातीत कायम ठेवले व इतर शोषित जातींना कायमचे सत्तेपासून लांब ठेवले. अशा चूकीच्या मार्गाने गेलोत तर अतिअल्पसंख्य धोबी, नाभिक, वडार, पिंजारी, मातंग वगैरे व्यक्ती कधीच वरच्या पदापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. नवी घोषणा अशी असेल- ‘‘शोषितोमे जिसकी जितनी संख्या कम, उसको उतना उंचा पद’’
शेवटी अंगामाढो प्रकरण संपवितांना एकच गोष्ट महत्वाची म्हणून सांगतो. जातीव्यवस्थेचे व वर्गव्यवस्थेचे छोटे-मोठे प्रश्न सोडविण्यासाठी मोर्चे, मेळावे, धरणे, जेलभरो अशी रस्त्यावरची आंदोलने आता कालबाह्य झालेली आहेत. सत्ता मिळाल्याशिवाय तुम्ही जनतेची एकही समस्या सोडवू शकत नाहीत. आणी ही सत्ता तुम्हाला केवळ प्रबोधनाची सायलेंट मुव्हमेंट अत्यंत निष्ठेने व अथकपणे राबवूनच मिळणार आहे.
अंगामाढो हे प्रकरण आता मी संपवितो! मला खात्री आहे, लिहीणे थांबल्यानंतर अंगामाढो चळवळ लवकरच सुरू होईल! तो तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 25 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 27मे20)
------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 270
Mobile – 88 301 270

No comments:
Post a Comment