http://shrwandeore.blogspot.in/

Monday, May 18, 2020

110 BahujanNama AGMD 17May20 Daily Lokmanthan


बहुजननामा-110
अंगामाढो-1
-1-
न मिळालेल्या आमदारकी संदर्भात सध्या सोशल मिडियावर सुषमाताई अंधारे यांचे नाव बरेच गाजते आहे. लोकसभा-2019 च्या निवडणूकीत न मिळालेल्या कॉंग्रेसी तिकीटामुळे प्रवीणदादा गायकवाड यांचे नाव असेच गाजले होते. हाच संदर्भ अजून ताणला तर या दोघांच्या सोबतीने ऍड. सुरेश मानेसाहेब व प्रदिप ढोबळेसाहेबांचे नाव घेता येईल. म्हणून या बहुजननामाचे नाव आहे- ‘अंगामाढो’, अर्थात अंधारे, गायकवाड, माने व ढोबळे!

महाराष्ट्रील या चारही व्यक्तींबाबत एक साम्य आहे. या चारही जणांनी आपली कर्तबगारी आपल्या अंगभूत गुणांनी सिद्ध केलेली आहे. डॉ. सरेश माने आपल्या सुक्ष्म व सखोल अभ्यासातून घटनातज्ञ म्हणून ओळखले जातात. बहुजन समाज पक्षाचे एक देशपाळीवरचे नेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती. महाराष्ट्रात असे एकही सभागृह वा मैदान नसेल जेथे सुषमा अंधारे यांची मुलुख मैदान तोफ धडाडली नसेल. त्यांच्या मार्‍यातून भलेभले दिग्जज सुटलेले नाहीत. पवार-चव्हाणांपासून मोदि-फडणवीसपर्यंतचे राजकारणी त्यांच्या शाब्दिक मार्‍याने घायाळ झाले आहेत. सुषमाताई माईकसमोर स्टूलवर उभ्या राहिल्यात की, गजानन-साईबाबापासून ते गणपती-पार्वतीपर्यंतचे सर्व देवी-देवता आपापले देव पाण्यात घालून बसतात! त्यांचे आडवे-तिडवे ऑपरेशन झालेच समजा! स्वतःच्या वकृत्व शैलीतून करियर घडविणारी महाराष्ट्रातील ही पहिली महिला! प्रविण दादा गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेड स्थापन करून तमाम महाराष्ट्रातील आधुनिक पेशव्यांना अक्षरशः घाम फोडलेला आहे. पुण्यातील भांडारकर तोडले, संभाजी उद्यानातले गडकरी फोडले, लाल महालातला दादू उखडला अशा अनेक वादग्रस्त घटनांच्या मालिकेतून प्रवीणदादा सतत चर्चेत राहीलेले आहेत. या तिघांनी सामाजिक चळवळीतून आपली कर्तबगारी सिद्ध केली. अंगामाढो हे चार मणी मी एकाच माळेत घातले असले तरी त्यात प्रदिप ढोबळे या मण्याचा रंग वेगळा असल्याने त्यांच्याबद्दल मी नंतर लिहीणार आहे. आता आपण फक्त अंगामा या तिघांबद्दल चर्चा करणार आहोत. 
सामाजिक चळवळीतील कर्तबगारी सिद्ध झाल्यावर ती तेथेच थांबत नाही व रेंगाळतही नाही. नव्या दिशा, विस्तारलेले क्षितिज आणी गगनभरारी या कर्बगारीला खुणावत असतात.  परंतू येथून पुढचा प्रवास सामाजिक-राजकीय असतो. हा प्रवास तीन दिशात विभागलेला असतो. एक रस्ता आपल्याला नेऊ इच्छितो सामाजिक चळवळीच्या वैचारिक शिखरावर! आजवरच्या अभ्यासातून व अनुभवातून मार्गदर्शन करून चळवळीला वैचारिक दिशा देण्याची बुजुर्ग भुमिका वठविणे, या रस्त्याला अभिप्रेत असते. दुसरा रस्ता राजकिय महत्वाकांक्षेचा असतो. स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करा व सत्ताप्राप्ती करा, असे हा दुसरा मार्ग सुचवितो. आणी तिसरा मार्ग अत्यंत शॉर्टकट असतो. एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षाचे शेपूट पकडून विधानसभेत-लोकसभेत पोहोचणे!
नोकर भरती, सैन्य भरती, नाक्यावरची बिगारी भरती यांचे जसे वेगवेगळे नियम असतात, त्याचप्रमाणे राजकारणातील नेता-भरतीचेही वेगळे नियम असतात. भारतात जातीव्यवस्था असल्याने सगळ्याच भरती-प्रक्रियांमध्ये ‘जात’ फॅक्टर काम करतो. राजकारणात तर तो फारच प्रभावी असतो. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांचे गड-किल्ले आपापल्या जात-तटबंदीने सुरक्षित केलेले असतात. आपल्या गड-किल्यात नवीन व्यक्तीला भरती करून घेतांना सर्वात आधी जातीचा फॅक्टर विचारात घेतला जातो. कोणत्याही पक्षाची रचना ही गड-किल्ल्यासारखीच असते. पक्षातील बिगार-भरतीला तटबंदीच्या आत प्रवेश नसतो. सैन्यात जसे रसद ने-आण करणारे ‘बाजार-बुणगे’ असतात, तसे पक्षातही असतात. या बाजार-बुणग्यांना किल्ल्यात प्रवेश असतो, परंतू दरबारात प्रवेश नसतो. काही सरदारांना दरबारात प्रवेश असतो, मात्र खलबत-खान्यात प्रवेश नसतो.
सामाजिक चळवळीत प्रबोधन व संघटनचे काम एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर राजकीय वेध लागतात. स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणे व सत्ता हस्तगत करणे, हे फार खडतर काम असते. शतकात एखादाच ‘कांशिराम वा लालु-मुलायम’ अवतार घेतो व उच्चजातीयांची तटबंदी तोडत थेट दरबारात घुसून सिंहासनावर कब्जा मिळवितो. लालु-मुलायम व कांशिरामसाहेबांचे अनुकरण करीत स्वतंत्र पक्ष स्थापण करण्याचा प्रयत्न नंतर अनेकांनी केला. मात्र जेथपर्यंत लालू-मुलायम-कांशिराम पोहोचलेत तेथपर्यंत नंतर कोणीही पोहोचू शकलेले नाहीत. लालू-मुलायम-कांशिराम हे आपापल्या एकाच राज्यात अडकून उध्वस्त का झालेत, दिल्लीपर्यंत का पोहोचले नाहीत, या सर्व प्रश्नांचा उहापोह करण्याची ही जागा नाही. तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. फक्त एकच हिंट देऊन ठेवतो कि या देशाचे नियंते-भाग्यविधाते हे कर्मठ-ब्राह्मणावादी आहेत व ते जिथपर्यंत जाण्याची परवानगी देतात, तिथपर्यंतच तुम्ही पोहोचतात. त्यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण-रेखा’ ओलांडण्याचा विचार जरी तुमच्या डोक्यात आला तरी, तुम्ही भस्म होतात.
आज बहुतेक सर्वच स्वतंत्र राजकीय महत्वाकांक्षी नेते प्रस्थापित उच्चजातींच्या पक्षांना शरण गेलेले आहेत व त्यांच्या ओसरीवर विसावलेले आहेत. हा सर्व अनुभव बघता अंगामा नेत्यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दुसरा खडतर मार्ग न स्वीकारता तिसरा शॉर्टकट रस्ता पकडला. आता आपण राजकीय पक्षाच्या भरती-प्रक्रियेकडे येऊ! लोकशाहीचा डोलारा स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन खांबांवर उभा आहे व त्याला जागतिक मान्यता पावलेले मानवी मुल्य समजले जाते. व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक-वांशिक समता व सर्वधर्मसमभावाची बंधुता ज्या देशात नांदते, तोच देश लोकशाही-प्रधान देश समजला जातो व त्या देशालाच जागतिक महासत्तांची मान्यता मिळते. अशी मान्यता मिळविण्यासाठी त्या देशाला लिखित संविधान आवश्यक असते. मोकळ्या व सुरक्षित वातावरणात निवडणूका व सर्व समाजघटकांना समावून घेणारे राजकीय पक्ष असावे लागतात. अर्थात हा केवळ जागतिक मान्यतेचा प्रश्न नाही! तिसर्‍या जगातील विकसनशिल देशांमध्ये राजकीय जागृती वाढत असल्याने त्या मुल्यांचे पालन करणे ही बहुतेक सर्वच देशांची व त्यातील राजकीय पक्षांची अपरिहार्यता झालेली आहे. त्याशिवाय त्या पक्षांना सत्ता हस्तगत करताही येत नाही. हुकूमशाही असलेल्या देशातही जनतेचा हिंसक उठाव होऊ नये म्हणून कमी-अधिक प्रमाणात ही लोकशाही मुल्ये स्वीकारावी लागतात. भारतातलेच एक उदाहरण देतो. भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर जनसंघ नावाचा एक पक्ष स्थापन झाला. जनसंघ हा सुरूवातीपासून ‘‘वाण्या-बामणांचा पक्ष’’ म्हणून ओळखला जात होता. हा पक्ष उघडपणे जागतिक हुकूमशहा असलेल्या हिटलरला आदर्श मानतो. जनसंघाचे ध्येय, धोरण व उद्देश ‘नाझी’ पक्षासारखेच आहे. त्यामुळे या पक्षाला भारतात सत्ता मिळणे दूरच, 2-4 नगरसेवकही निवडून आणणे शक्य नव्हते. जेव्हा हा जनसंघ लोकशाही मूल्ये असलेल्या जनता पक्षात विलीन झाला, तेव्हाच त्याचे खासदार निवडून आलेत व सत्तेत सहभागही मिळाला.
हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की, सर्वच राजकीय पक्षांना आपला मुखवटा पुरोगामी ठेवावा लागतो. त्यासाठी हे पक्ष अधून-मधून आपल्या पक्षात पुरोगामी कार्यकर्त्यांची ‘भरती’ करीत असतात. बाबा आढावांनी त्यांच्या चळवळीत तयार केलेले काही भटके-विमुक्त कार्यकर्ते शरद पवारांनी कॉंग्रेस पक्षात भरती करून घेतलेत. अनेक दलित नेते व ओबीसी नेते मतांची रसद पुरविण्यासाठी पक्षात भरती केलेले आहेत. राजकीय पक्षातील सत्ताप्राप्तीची लढाई जेव्हा अटी-तटीची होते, तेव्हा सामाजिक चळवळीतील काही कर्तबगार कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे भाव वधारतात. या पार्श्वभूमीवर अंगामा यांचे राजकीय महत्वाकांक्षा प्रकरण व प्रस्थापित सत्तांकाक्षी पक्षांशी त्यांची जवळीकता बघीतली पाहिजे.
अंगामा यांनी 2019 च्या लोकसभा-विधानसभा निवडणूकीत स्वतःचे कमावलेले सर्व करियर पणाला लावून कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षासाठी खर्च केले. प्रवीणदादा यांनी स्वतःचे (संभाजी ब्रिगेड पक्ष व शेकाप हे) राजकीय पक्ष गुंडाळून कॉंग्रेस पक्षाचे तिकीट मागीतले. मानेसाहेबांनी सुद्धा स्वतःचा राजकीय पक्ष, त्याचा झेंडा व चिन्ह वगैरे गुंडाळून ठेवले व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर-चिन्हावर निवडणूक लढविली. सुषमाताईंनी आपली कमावलेली ईमेज पणाला लावली, आपली ब्राह्मण-मराठाविरोधी भूमिका सोडून देत राष्ट्रवादी पक्षाचा झंझावाती प्रचार केला. अंगामा या तिघांच्या पुरोगामित्वाचा फायदा निश्चितच कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला झाला आहे. आज हे पक्ष सत्तेत सहभागी आहेत. त्याचे थोडेतरी श्रेय या तिघा नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेचा थोडाफार लाभ मोबदल्यात मिळण्याची अपेक्षा ठेवणे गैर नाही, त्यांचा तो हक्कच होता व आहे. विधान परिषदेची आमदारकी या तिघांना मिळणे अपेक्षित होती. सोशल मिडियात तशी चर्चाही रंगली होती. मात्र ती तिघांनाही मिळाली नाही. ती का मिळाली नाही याची कारणमिमांसा आपण बहुजननामाच्या पुढील 111 व्या भागात करू या!
तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 16 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 17मे20 

लेखकः- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 270
Blog ब्लॉग https://shrwandeore.blogspot.in/                  

Links for this article to read text file………………..




No comments:

Post a Comment