बहुजननामा-111
अंगामाढो-2
-1-
जगातील सर्व क्रांतीकारी व प्रतिक्रांतीकारी
महापुरूष, संघटना वा पक्ष हे हाय-रिस्क घेउन काम करीत असतात, म्हणूनच ते क्रांती
वा प्रतिक्रांती करू शकतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील हायमेरिटची माणसं किंवा
स्वयंभू मास लिडर्स या सर्वांना जोडून त्यांना आपल्यात सामावून घेतात व क्रांती वा प्रतिक्रांतीची वाट मोकळी करतात. मात्र प्रस्थापित व्यक्ती, संघटना व पक्ष
कोणतीही लहान-मोठी रिस्क घेतांना 100 वेळा विचार करतात. कारण त्यांना कोणतीही
क्रांती वा प्रतिक्रांती करायची नसते. आहे त्याच व्यवस्थेतील आपले स्थान मजबूत
करणे एवढे एकच उद्दिष्ट्य घेऊन ही महान(?) माणसं काम करीत असतात. ते सतत
भीतीग्रस्त असतात. आपले स्थान, आपले कुटुंब व आपली जात धोक्यात येईल की काय,
अशी भीती कायम त्यांच्या मनात घर करून बसलेली असते. त्यामुळे हाय मेरिटची माणसं
आपल्या पक्षात येणार नाहीत, याची ते पूरेपूर काळजी घेत असतात.
अंगामाढो (अंधारे, गायकवाड, माने, ढोबळे) हे चारही नेते आपापल्या कॅटेगिरीतले
स्यंवंभू
नेते आहेत व ते वैचारिकदृष्ट्या मजबूत आहेत. या दृष्टिने पाहता हे चारही लोक हाय
मेरिटचे आहेत. त्यामुळे या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन आमदार-खासदार बनविले तर
आपल्या पक्षाचे कौटुंबिक व जातीय स्वरूप धोक्यात येईल, ही कॉंग्रेस व राष्ट्रवादी
नेत्यांच्या मनातील भीती रास्तच आहे. सुषमाताई राष्ट्रवादी कॉंग्रेस
(राकॉं) पक्षात येऊन आमदार झाल्यात तर सुप्रियाचं ‘ताई’पद फिके
पडेल. प्रविणदादा पक्षात आलेत तर अजितदादांचं स्थान धोक्यात येईल. मानेसाहेब
व ढोबळेसाहेब जर या पक्षात आलेत तर पक्षाचा ‘मराठा-गाभा’च नष्ट होईल. राष्ट्रवादी
कॉंग्रेस पक्षात जर माने-ढोबळेंसारखे नेते आमदार-खासदार बनलेत तर मराठा आरक्षणाचं
बील विधानसभेत कधीच मंजूर झालं नसतं! करोनाच्या पार्श्वभूमीवर पवारसाहेबांनी मराठा
सम्राटांच्या साखर कारखान्यांसाठी आर्थिक पॅकेज मागीतले, माने-ढोबळे राष्ट्रवादीचे
नेते झालेत तर, साखर कारखान्यांऐवजी बारा बलुतेदारांच्या जात-व्यवसायांसाठी
‘बेलआऊट’ पॅकेज मागावे लागेल.
-2-
भारतातील बहुतेक सर्वच राजकीय पक्ष कौटुंबिक व
जात-हितसंबंधी झालेले आहेत. स्वातंत्र्य चळवळीसारख्या महान जनआंदोलनातून
कॉंग्रेस पक्षाची निर्मिती झाली. या जनआंदोलनात आदिवासी, ओबीसी, दलित, मराठा,
ब्राह्मण, मुसलमान वगैरे सर्वच जाती-धर्मातील लोक सहभागी होते. परंतू
जनआंदोलनाचे नेतृत्व करणारा कॉंग्रेस पक्ष जन्मापासून आजवर ब्राह्मण-वर्चस्ववादीच
होता व आहे. गोखले, टिळकांसारखे ब्राह्मण नेते बहुजन नेत्यांना पक्षात कोणतेही
महत्वाचे पद द्यायला तयार नव्हते. वास्तविक त्यावेळचे काही दिग्गज मराठा
टिळकांसोबतच होते. मात्र तरीही मराठा-कुणब्यांना असेंब्लीमध्ये घ्यायला टिळक विरोध
करीत होते. त्याकाळी तात्यासाहेबांच्या सत्यशोधक चळवळीचा दरारा इतका जबरदस्त
होता की, ब्राह्मण ताकही फुंकून पीत होते. सत्यशोधक चळवळीच्या प्रभावात
मराठा-कुणबी हे कॉंग्रेस पक्षातील ब्राह्मणांचे वर्चस्व नष्ट करतील, याची खात्री
ब्राह्मणांना होती.
परंतू, जनतेचा सहभाग असल्याशिवाय कोणतीही चळवळ
यशस्वी होत नाही, हे तत्कालीन उगवते वैश्य-भांडवलदार जाणून होते. सत्यशोधक
चळवळीच्या प्रभावात सामान्य जनता ‘ब्राह्मणविरोधी’ झालेली होती. त्यामुळे
कॉंग्रेसचे नेतृत्व ब्राह्मणांच्या कडून काढून घेऊन ते ब्राह्मणेतर व्यक्तीकडे
दिले, तरच सामान्य जनता स्वातंत्र्य चळवळीत येईल, असा साधा व्यवहारिक विचार
तत्कालीन वैश्य-भांडवलदारांनी केला. कॉंग्रेस पक्ष वैश्य-भांडवलदारांच्या
पैशांवर चालत होता, त्यामुळे कॉंग्रेसचे नेतृत्व वैश्य गांधींजींकडे जाणे
स्वाभाविक होते. भारतातील उगवत्या वैश्य-भांडवलदारांना स्व-वर्गाच्या विकासासाठी
स्वातंत्र्य आंदोलन यशस्वीपणे चालवायचे होते. त्यासाठी या उगवत्या भांडवलदारांनी
कॉंग्रेसची संपूर्ण निर्णय प्रक्रिया गांधींजींच्या हाती सोपविली. आपल्या
नेतृत्वाला ब्राह्मणांचा कडवा विरोध होऊ नये म्हणून एकीकडे गांधीजींनी
वर्ण-जातव्यवस्थेचे कट्टर समर्थन केले व दुसरीकडे ब्राह्मणेतर लोक कॉंग्रेसमध्ये
यावेत म्हणून ‘जोतीराव फुले हेच खरे महात्मा’ अशी घोषणाही केली.
असेंब्लीच्या सत्तेसाठी हपापलेल्या मराठ्यांनी गांधीजींचा तेव्हढाच सोयीचा धागा
पकडला आणी कॉंग्रेसच्या चरख्यावर बसून सत्तेचा स्वर्ग गाठला. कॉंग्रेस पक्षाचं
नेतृत्व बदललं, धोरण बदललं, डावपेंचही बदललेत, मात्र टिळकांनी पक्की ठासून भरलेली
वेदांती-ब्राह्मणी तत्वज्ञानाची चौकट कायम राहीली. त्याचे कारण काय?
कॉंग्रेसवरचं ब्राह्मणी वर्चस्व कमी होत असतांना त्वरीत दुसरा पर्याय अवलंबला
गेला. त्याला ‘प्लॅन-बी’ म्हणतात. प्लॅन-बी प्रमाणे वैदिक ब्राह्मणांनी लगेच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना केली व गांधीजींवर दबावतंत्राने
नियंत्रण ठेवले. त्यामुळे गांधीजींनी कॉंग्रेसच्या या ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या
चौकटीला धक्का लावण्याची हिम्मत कधीच केली नाही. जेव्हा जेव्हा ही चौकट
तोडण्याची शक्यता निर्माण होई, तेव्हा तेव्हा गांधीजींच्या कानफटीवर बंदुकीची नळी
ताणली जायची!
याचा अर्थ गांधीजी मरायला घाबरत होते, असे नव्हे!
त्यांच्यासमोर वैश्य-भांडवलदारांनी जे टार्गेट ठेवलेले होते, ते ‘राजकीय स्वातंत्र्य’
मिळवीण्यापुरतेच मर्यादित होते. समाजसुधारणा हे टार्गेटच नव्हते! ब्राह्मणेतरांनी
आपले सामाजिक प्रश्न बाजूला ठेवून स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या सख्येने यावे व ती
चळवळ यशस्वी करावी, एवढाच उद्देश गांधीजींचा होता. आणी हे टार्गेट गांधीजींच्या
केवळ एका घोषणेने साध्य झाले. कोणती घोषणा? ‘‘जोतीराव फुले हेच खरे महात्मा!’’
फक्त तोंडी घोषणा! लेखी कुठेच नाही! गांधीजींच्या कोणत्याही अग्रलेखात, बातमीत,
मासिकात, त्यांच्या कोणत्याही भाषणात या घोषणेचा साधा उल्लेखही नाही. तात्यासाहेबांचे
सत्यशोधक विचार कॉंग्रेसने स्वीकारण्याचा प्रश्नच पुढे आला नाही. कारण कॉंग्रेसमध्ये
घुसलेल्या मराठ्यांनी तसा आग्रह कधीच धरला नाही. सत्ता मिळण्याशी मतलब! तीला
सत्ता तरी कशी म्हणायची? मालक ब्राह्मण, मांडलिक मराठा! मंत्रालयातल्या
शिपायालासुद्धा ‘साहेब’ म्हणावे लागते, इतकी ती हीन दर्ज्याची सत्ता! आता नुकतेच
कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांना ‘राष्ट्रपती-नियुक्त’ खासदारपदाची भीख वाढण्यात
आली. हे छत्रपती अनेकवेळा निवडणूकीत पडलेत, कारण जनता त्यांना आपले छत्रपतीही
मानीत नाही. लोकप्रतिनिधीही मानीत नाही. परंतू संघी-ब्राह्मणांना असे मांडलिक
छत्रपती सेवेसाठी लागतात.
मराठे तात्यासाहेबांच्या सत्यशोधक चळवळीची कुबडी
वापरून कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे ग्रामीण भागातील दलित-ओबीसी मोठ्या संख्येने
कॉंग्रेसमध्ये गेलेत. कॉंग्रेस भक्कम झाली. सत्यशोधक चळवळ खतम झाली! करारच तसा
झाला होता. आम्ही तुम्हाला (मांडलिक) सत्ता देतो, तुम्ही सत्यशोधक चळवळ संपवा! त्याकाळी
केशवराव विचारे हे एकमेव मराठा नेते होते ज्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सत्यशोधक
चळवळ गावो-गावी रूजविली. बाकीचे सर्व मराठा नेते कॉंग्रेसच्या नादी लागलेत व
सत्यशोधक चळवळ नष्ट करायला कारणीभूत झालेत. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये या
सत्यशोधक मराठ्यांचे प्रचंड हाल सुरू झालेत. ब्राह्मणांकडून अवमानकारक वागणूक मिळायला
लागली. सेम टू सेम खडसे-मुंडे-बावनकुळे! छळ असह्य झाल्यावर हे मराठा नेते
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेत व शेकाप नावाच पक्ष स्थापन केला. परंतू तोवर
कॉंग्रेसी ब्राह्मणांनी कट्टर सत्यशोधकविरोधी मराठ्यांना नेता बनविले होते. रॉयवादी
यशवंतराव चव्हाण हे कट्टर सत्यशोधकविरोधी नेते म्हणून कॉंग्रेसचे ‘साहेब’ झालेत.
कॉंग्रेसमधील या सर्व प्रतिगामी मराठ्यांनी सत्यशोधक चळवळ संपवीली, 1956 नंतर
त्यांच्या मराठा वारसदारांनी दलित चळवळ संपवली! मराठ्यांच्या ज्या शाळा-कॉलेजात
शिवजयंती-उत्सव साजरा व्हायला पाहिजे होता, त्याऐवजी तेथे 10 दिवसांचा गणपती-उत्सव
थाटामाटात साजरा होऊ लागला. मंत्रालयात जेथे बळीराजा महोत्सव साजरा व्हायला पाहिजे
होता, तेथे सत्यनारायणाच्या भाकडकथा मनोभावे ऐकविल्या गेल्यात. मंत्रालयात
सत्यनारायणाची पोथी वाचणारा ब्राह्मण, कधी मुख्यमंत्री बनून छातडावर बसला, हे या
मराठ्यांना कळलेसुद्धा नाही! सेम टू सेम 300 वर्षांपूर्वीच्या मराठा
सरंजामदारांनी पेशवाई उरावर बसवून घेतली, तशीच 2014 साली या राष्ट्रवादी
कॉंग्रेसच्या मराठ्यांनी भाजपाला पाठींबा देऊन फडणवीसी-पेशवाई महाराष्ट्राच्या छातडावर
बसवली. सेम टु सेम इतिहासाची पुनर्रावृत्ती!
-3-
हा सर्व इतिहास सांगण्याचा उद्देश हा की, अंगामा
नेत्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागू नये! हे पक्ष कधीच पुरोगामी नव्हते
व यापुढेही ते कधीच पुरोगामी होणार नाहीत, याची गॅरंटी तात्यासाहेबांनी दिलेली असतांनाही
तुम्ही ‘पुरोगामी’ आयडेंटी घेऊन या पक्षांमध्ये जाणार व आमदारकी-खासदारकीची
स्वप्ने पाहात बसणार! तुम्ही खूपच लाचार झालेत आणी पुढे आयुष्यभर लाचार राहण्याचा
बॉण्ड पेपर लिहून दिला, तर कदाचित तुम्ही या पक्षामार्फत आमदार-खासदारकी मिळवालही,
मंत्रीसुद्धा व्हाल! लाल दिव्याची गाडी, प्रशस्त बंगला व नोकर-चाकर, ऐषआरामी जीवन
जगाल. आम्हाला आनंदच वाटेल! परंतू तुम्हाला ज्या समाजाने पुरोगामी होण्याची संधी
दिली व ज्या समाजाला तुम्ही फुले-शाहू-आंबेडकरी ‘बळीराष्ट्राचे स्वप्न’ दाखवीले,
त्याचं काय होईल? राष्ट्रवादी कॉंग्रेससारखे पक्ष पुन्हा फडणवीसी पेशवाई महाराष्ट्राच्या
छातडावर बसवणार नाहीत, याची काय गॅरंटी तुमच्याकडे आहे? हेच राष्ट्रवादी सरंजामदार
फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीत पुन्हा सामील होणार नाहीत, याची काय गॅरंटी आहे
तुमच्याकडे? कॉंग्रेसनेच बाबरी मशिद पाडण्याचा रस्ता प्रशस्त करून दिला व
संघ-भाजपाला देशाच्या छातडावर बसायला मदत केली, तीच कॉंग्रेस पुन्हा काशि-मथूरेच्या
मशिदी पाडण्यासाठी संघ-भाजपाला मदत करणार नाही, याची कोणती खात्री तुमच्याकडे आहे?
त्यापेक्षा मी सांगीतलेल्या तीन मार्गांपैकी दोन
नंबरच्या मार्गावर या! जर तसे झालेच, तर पुढची तुमची वाटचाल कशी असावी, याबद्दलची
चर्चा शेवटच्या तिसर्या भागात करू या!
तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 19 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 20मे20)
लेखकः- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27270

nice article sir
ReplyDelete