अकरावी खेप......! (दै. लोकमंथन रविवार – 18
फेब्रुवारी 2018 बहुजननामा-11
प्रबुद्ध होऊन शेवग्याचे झाड तोडावेच लागेल!
बहुजनांनो....
!
आपल्यापैकी प्रत्येकाने शेवग्याच्या झाडाची बोधकथा
कधी ना कधीतरी ऐकलेली आहेच. ह्याच शेंगा मी आपल्याला नवीन फोडणी देऊन खाऊ घालणार
आहे. पुर्वीचे वैभव लयाला गेलेल्या सरंजामदार घराण्याची ही कथा आहे. कुळांचे
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व लैंगिक शोषण करून माजलेले हे सरंजामदार घराणे शेकडो
वर्षांपासून ऐषआरामात जीवन जगत होते. परंतू इंग्रज आलेत. अन्यायकारी व अत्याचारी
सरंजामशाही, पेशवाई, राजेशाही गेली. कुळ स्वतंत्र झालेत, जमिनीही घेऊन गेलेत.
मोठमोठ्या गढ्या, वाडे व महाल ओसाड झाल्यात. या गढ्यांवर कुणी मुजरा करायला
जाईनासे झालेत. रस्त्यावर कुणी ‘रामराम’ ठोकला तर तो मानाचा होता की टवाळकीचा हे
समझेनासे झाले.
शोषणाची कमाईच बंद पडल्याने खाण्याची मारामार, तेथे
चैन होणार कशी? सरंजामी कुटुंबात नोकरी करणे तुच्छ समजले जाते. पण आता पोटालाच पीळ
पडायला लागला तर काय करणार? पण नोकरी काय अशी सहज मिळते का? ब्राहमण असेल तर लगेच
मिळेल! कारण ब्राह्मण म्हणजे जन्मजात मेरीट होय! मेरीटची बोंबाबोंब असलेल्या या
सरंजामदार घराण्याला नोकर्या मिळेनाशा झाल्यात. मेरीट घेऊन ब्राह्मण होता येत
नाही, मग आरक्षण घेऊन शूद्र बनायचे का, असाही एक फार मोठा गहन प्रश्न उभा राहीला.
आरक्षण मागणे म्हणजे ‘भीख’ मागणे, असे आपल्याच सरंजामदारांनी जाहीर केले आहे. मग
भीख मागायची तरी कशी??? आणी मागीतली तर लगेच मिळेल काय?
तो पर्यंत खायचे काय? मग त्यांचे लक्ष आपल्याच महालातील
एका भल्या मोठ्या शेवग्याच्या झाडाकडे गेले. पुर्वी त्या झाडाकडे कुणी ढुंकुनही
पाहात नव्हते. पण पोटाची आग शमविण्यासाठी झाडावर लक्ष केंद्रीत झाले. रोज त्या झाडाखाली
शेंगांचा सडा पडलेला असायचा. रात्री त्या सर्व शेंगा गोळा करून पोत्यात भरायच्या व
रात्रीच गुपचुप व्यापाराला ठोकमध्ये विकून यायच्या. उरलेल्या शेंगांची भाजी करून
खायची. अशाप्रकारे या शूर-वीर घराची दिन (रात)चर्या सुरू झाली. अनेक वर्ष हा
उपक्रम सुरू होता. एकदा एक ‘प्रबुद्ध’ पाहुणा त्या कुटुंबात आला. दोन दिवस त्याने
मुक्काम ठोकला. प्रबुद्ध असल्याने त्याने त्या घराचा अभ्यास सुरू केला. या एवढ्या
मोठ्ठ्या घराचं दारिद्र्य कसं संपवायचं, याचा विचार तो करू लागला. दुसर्या दिवशी
भल्या पहाटे तो उठला. कुर्हाड आधीच शोधू ठेवलेली होती. भल्या पहाटे कुर्हाड घेऊन
त्याने आपले ‘सम्यक-कार्य’ उरकले आणी निघून गेला.
सकाळीच आख्ख कुटुंब अंगणात जमा झालं. शेवग्यांचं झाड
जमिनीवर आडवं करून पाहुणा पसार झाला होता. आरडा ओरड करायला वाव नव्हता, कारण लोक
विचारणार, ‘’झाडच तोडलं ना, तुमचं काय घेऊन गेला?’’ खरं म्हणजे त्यांचं
‘’सर्वस्व’’ गेलेलं होतं, पण सांगणार कसं? मग ते संजामदार घराणं नंतर पांगलं,
वेगवेगळ्या भागात जाउन पोटा-पाण्याचे व्यवसाय करू लागलं, असा गोड शेवट या कथेचा
झाला. शेवग्याचं ते झाड त्या सरंजामदार कुटुंबाच्या पायातील बेड्या बनलेले होते.
ते रिस्क घेऊन पुढेही जाउ देत नव्हतं व मागचे दरवाजे आधीच बंद झाल्याने मागेही जाता
येत नव्हतं. शेवटी त्या प्रबुद्ध पाहुण्याने शेवग्याची बेडी तोडली व कुटुंबाच्या
विकासाचा मार्ग खुला केला.
पण ह्याच शेवग्याच्या शेंगा आता फुले-आंबेडकरी
‘’प्रबुद्धांच्या’’ पायात येऊन पडलेल्या आहेत. आणी सर्वात मोठी दुःखाची बाब म्हणजे
या बेड्यांनाच गर्वाने मिरविले जात आहे. एक नाही तर अशा अनेक बेड्या आता पायातील ‘जड’
दागीने बनलेले आहेत. या जड दागिण्यांमुळे चळवळीची वाट फारच धिमी झाली आहे.
फुले-आबेडकरी प्रबुद्धांच्या पायातील पहिली बेडी म्हणजे ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’!
बाबासाहेबांनी जे सांगून-लिहून ठेवलेले आहे तेच सत्य, बाकी सारे ‘झुट’! फुले-आंबेडकरांच्या
ग्रंथांना आज पोथ्यांचं स्वरूप आलेलं आहे. कोणताही नवा प्रश्न पुढे आला की,
पोथीतल्या मंत्राचा वा श्लोकाचा मोठ्याने जयघोष करायचा व उत्तर मिळण्याची वाट पहात
बसायचे! प्रश्न सुटत तर नाहीच, उलट गुंताच वाढतच जातो.
प्रबुद्धांच्या पायातील आणखी एक बेडी आहे, भावनिकतेची!
महापुरूषांबद्दलचे प्रेम त्यांच्या मार्गदर्शनापुरते मर्यादित हवे. पण तेवढं एक
सोडून आपण त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी सगळे भले-बुरे मार्ग अवलंबतो.
फोटो, पुतळे, स्मारकं, पावित्र्यता, स्तुतीस्तोत्र असा सर्व मार्गांनी
महापुरूषांची भक्ती केली जाते. महापुरूषांनी सांगीतलेला ‘’परिवर्तनासाठी संघर्षाचा
मार्ग’’ डायवर्ट होतो व केवळ ‘’स्मृती-स्मारकांसाठी संघर्ष’’ उरतो. खरं म्हणजे
फोटो, पुतळे, स्मारकं वगैरे हा चळवळीचा बाळबोध टप्पा असतो, तो लवकरात लवकर ओलांडून
दुसर्या टप्प्यात आलं पाहिजे. परंतू,
50-55 वर्षानंतरही आम्ही या बालिशपणातून बाहेर येत नाहीत. आणखी काही बेड्या
आहेत, त्यांच्याबद्दल पुढील खेपेत विचार करू या, तो पर्यंत.......
जयजोती! जयभीम!!
-------
प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
Email- s.deore2012@gmail.com
No comments:
Post a Comment