http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, March 28, 2018

3 BahujanNama Lokmanthan 24 Dece 2017


तिसरी खेप......!                              (दै. लोकमंथन रविवार – 24 डिसें साठी)
बहुजननामा

बहुजनांनो.... !
    गेल्या खेपेत आपण समाजाचे ध्रृविकरण व जगभरच्या समाजव्यवस्था कशा बदलल्यात याचा थोडक्यात विचार केला. कोणत्याही समाजव्यवस्थेचा कणा हा त्याच्या अर्थव्यवस्थेवर उभा असतो. अर्थव्यवस्था थोडी जरी डगमगायला लागली तरी,समाजव्यवस्थेचा कणा झुकायला लागतो. या कण्याला ताठ करण्यासाठी बेलआऊट, रोजगार हमी योजना वगैरेंची मलमपट्टी लावून तात्पुरते उपाय योजिले जातात. परंतू जे या व्यवस्थेने पिडीत असतात ते जर संघटित असतील व शास्त्रशुद्ध क्रांतिकारक विचारांनी प्रेरित असतील तर ते राजकीय बदलातून नवी अर्थव्यवस्था उभी करू शकतात. भारत वगळता इतर देशात हे सर्व परिवर्तन स्पष्टपणे दोन वर्गांच्या संघर्षातून होते. परंतू भारतात असे सरळमार्गी परिवर्तन झाले काय? तर स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे ‘नाही झाले’! जगभरच्या देशांमध्ये प्राथमिक साम्यवादी समाजव्यवस्था प्राथमिक उत्पादन साधनांच्या आधारे मर्यादित उत्पन्न निर्माण करणारी असल्यामुळे वरकड (जास्तीचे) उत्पन्न नव्हतेच, त्यामुळे संचय करणेही नाही. त्यामुळे त्या समाजात शोषणही नव्हते व वर्गही नव्हते, असे मार्क्स सांगतो. नंतरच्या विकासात जेव्हा उत्पादन साधने विकसित झालीत व उत्पादन रोजच्या गरजेपेक्षा जास्त (वरकड) व्हायला लागल्यावर या प्राथमिक साम्यवादी समाजव्यवस्थचे विघटन वर्गस्वरूपात व्हायला लागले.
प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद् पाटील मार्क्सच्या या मांडणीत मतभेद व्यक्त करतात. त्यांचे म्हणणे आहे कि, प्राथमिक साम्यवादी समाजव्यवस्थेत जरी शत्रूभावी वर्ग नव्हते तरी स्त्री-पुरूषातील राजकीय विषमतेमुळे हा समाज दोन वर्णात विभागलेला होता. उत्पादनाचे प्राथमिक साधन ज्यांच्या हातात होते त्या स्त्रीला क्षत्र वर्ण म्हटले जायचे. क्षत्र म्हणजे शेती किंवा जमिन. या स्त्रीया आपल्या गणराज्याच्या कारभारीण होत्या. पुरूषांचा ब्रह्मण वर्ण होता. ते सत्ताविहिन होते. म्हणजे केवळ राजकीय विषमता सोडली तर या भारतीय गणराज्यात समताच होती. क्षत्र वर्ण व ब्रह्मण वर्ण हे अशत्रूभावी होते.
अनेक कुलांचे मिळून एक गणराज्य बनायचे. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्यायचं तर महाराष्ट्रात 96 कुल आहेत. सोनवणे, देवरे, भामरे, सपकाळे, खोब्रागडे, पवार, खैरनार, जाधव, भोसले अशा 96 कुलांचा मिळून मराठा गणराज्य बनलेलं आहे. 96 कुळी मराठा म्हणजे जातीने मराठा नाही तर, मराठा गणराज्याचा नागरिक होय! त्या काळात अशी वर्ण-जातव्यवस्था नव्हतीच. त्यामुळे मराठा गणराज्याचा नागरिक म्हणजे मराठा व्यक्ती होय! 96 कुलांच्या 96 कुलदेवता त्यांची 96 मंदिरे महाराष्ट्रात आहेत. या 96 कुळी मराठा गणराज्याची राणी तुळजापुरची भवानी माता होय! या गणसमाजाचा जो धर्म होता तो आताच्या प्रस्थापित धर्मांच्या आधीचा धर्म म्हणजे धर्मपूर्व धर्म! हा धर्म क्रांतिकारक समतावादी व वैज्ञानिक होता. पूर्वी रानटी मानवात आई-मुलगा, बहिण-भाऊ असे शारिरीक संबंध येत होते. त्यातून विकृत संतती निर्माण होत होती. त्याचा अभ्यास या कुलधर्माने केला व पहिला कायदा करण्यात आला. जगातील हा पहिला अधिकृत कायदा सांगतो की, एकाच कुलातील स्त्री-पुरूषांच्या  शरिरसंबंधांवर बंदी टाकण्यात येत असून आता यापुढे शरिरसंबंध भिन्न कुलातील स्त्री-पुरूषात होतील. आजचे वंश-सायन्स सांगते की, अत्यंत जवळच्या रक्तसंबंधातील व्यक्तींच्या शरिरसंबंधातून निर्माण होणारी संतती ही मानसिक व शारिरीकदृष्ट्या कमजोर असते. हे सायन्स आमच्या 5 हजार वर्षापुर्वीच्या कुलधर्माने केवळ सांगीतले असे नाही तर, कडक कायदा करून सांगीतले. आजही (ब्राह्मणेतर) बहुजन समाज या मातृसत्ताक कुलधर्माचे कायदे तंतोतंत पाळतो. आजही लग्नासाठी मुलगी शोधतांना पहिला प्रश्न विचारला जातो, मामाचं कुळ काय? मामाचं कुळ म्हणजे आईचं कूळ! वधूच्या मामाचे कूळ व वराचे कूळ जर सारखे असेल तर विवाह होत नाही, कारण ते दोघे बहिण-भाऊ ठरतात. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकतच नाही. जर मुलीच्या मामाचं कूळ व वराचे कूळ भिन्न असेल तरच त्यांचा विवाह होऊ शकतो. हा कायदा आजही लोकशाहीच्या काळात राज्यघटनेत कुठेही नसतांना ब्राह्मणेतर समाज अत्यंत तंतोतंत पाळतो आहे. मात्र ब्राम्हण समाजात कूळ वगैरे काही पाहिले जात नाही. ते लग्न जुळवंतांना गोत्र पाहतात. त्यामुळे ब्राह्मणात भाऊ-बहिणींमध्ये लग्न होतात!
मित्रांनो! यापढचं विश्लेषण पुढच्या खेपेत.....
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270  Email- s.deore2012@gmail.com

No comments:

Post a Comment