http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, March 28, 2018

4 BahujanNama Lokmanthan 31 Dece 2017

चौथी खेप......    (दै.लोकमंथन रविवार –31 डिसें 2017 साठी)
बहुजननामा
जगातील पहिला क्रांतिकारी धर्म- कुलधर्म

बहुजनांनो.... !
    जगातील पहिला धर्मपूर्व धर्म म्हणजे कुलधर्म होय! जगाच्या पाठीवर जेथे नदी-खोर्‍यात मानव-वस्ती स्थिरावली, तेथे स्त्रियांनी शेतीचा शोध लावला व मातृसत्ताक कुलसंस्था स्थापन केल्यात. या कुलसंस्था पुढे गणराज्यात विकसित झाल्यात. ही गणराज्ये पुर्णपणे लोकशाही राज्ये होती. त्यांच्या गणसभा नियमितपणे भरविल्या जात होत्या. आतापर्यंतचे विश्लेषण समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचे उदाहरण योग्य राहील. महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठा गणराज्य होय! 96 कुळांचे मिळून बनलेले हे गणराज्य होय. देवरे, खैरे, पवार, भोसले, जाधव, सोनवणे, भामरे, शिर्के, मालुसरे, कांबळे, खोब्रागडे, सपकाळे अशी 96 कुळे महाराष्ट्रात आहेत. 96 कुळांच्या 96 कुलमाता. कुळ म्हणजे रक्ताची व दुधाची नाते असलेल्या व्यक्तींचा समूह! त्यांनी स्थापन केलेला धर्म म्हणजे कुलधर्म होय!
हा कुलधर्म समजून घेण्यासाठी माझ्या देवरे कुळाचेच उदाहरण घेऊ या! माझे देवरे हे सरनेम ब्राह्मण वगळता सर्व जातीत आहे. कुणबी, माळी, तेली, सोनार, नाभिक, परीट-धोबी, महार, चांभार, मातंग अशा सर्व ब्राह्मणेतर जातीत देवरे सरनेम आहे. हे सर्व जातीतले देवरे वर्षातून दोनदा आपल्या कुलमातेचे दर्शन घेण्यासाठी म्हसदी गावात येतात. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील डोंगराळ भागात म्हसदी गाव वसलेले आहे. कुलमातेचं नाव आहे धनदाई माता. धन म्हणजे धन-धान्य व दाई म्हणजे देणारी. आपल्या शेतामध्ये काठीच्या साहाय्याने हाताने जमिन खोदणारी व त्यात बी पेरून धान्य उगविणारी आद्यमाता म्हणजे कुलमाता. धनदाई मातेची यात्रा वर्षातून दोनवेळा येते. पहिला (पावसाळी) हंगाम संपला की नवरात्र येते. शेतातले धान्य खळ्यात येते. सर्व कुल-प्रजाजन खळ्यात गोळ होतात. कुलमातेला नैवद्य देतात. कुलसमाज हा मांसाहारी असल्याने मांसाचा नैवद्य दिला जातो. सीता रामासोबत वनवासाला जात असतांना वाटेत एक नदी पूराने दुथडी भरुन वाहत असते. नदी पार करण्यासाठी तिचे पूराचे पाणी उतरणे आवश्यक असते. त्यासाठी सीतामाता नदीमातेला पराती भरून मांस अर्पण करण्याचा नवस करते. याचा अर्थ सीतेचा विदेह गण व रामाच्या आईचा कोसलगण हे मांसाहारी होते.
धनदाई मातेची देवरे-खैरे प्रजा आपल्या मातेला खळ्यात नैवद्य देतात. खळ्यात धान्य काढण्याची प्रक्रिया 9 दिवस चालते. म्हणून नवरात्र! दिवसभर खळ्यात काम करायचे व रात्री कुलमातेची गाणी गात नृत्यकलेने मनोरंजन करायचे. पुरूषत्ताक समाजव्यवस्थेत खळ्यातला हा कार्यक्रम नेणीवेत जातो व घटस्थापनेत रूपांतरीत होतो. घटस्थापना म्हणजे नव-सृष्टीचे नव-जीवाचे सृजन जे आईशीच निगडीत आहे, बापाशी नाही.
देवरेंचे खैरे कसे झालेत याचीही एक मजेशीर कथा आहे. कुलमातेचा दुसरा उत्सव येतो तो उन्हाळी पीकानंतर! उन्हाळ्यात सर्व कुलमातांचा वार्षिक यात्रोत्सव चैत्रमध्ये असतो. कुलधर्माचा नियम असा आहे की, यात्रेच्या दिवशी देवीला कुल-दांपत्त्याच्या (देवरे दांपत्याच्या) मोठ्या मुलाची शेंडी अर्पण करून व मातेला बोकडाच्या मांसाचा नैवद्य देऊन लगेच ते गाव सोडावे लागते. हा नियम आजही काटेकोर पाळला जातो. एकदा काही देवरेंनी हा नियम तोडला. म्हणजे नवस फेडून हे देवरे तेथेच रात्रभर मुक्कामाला राहिलेत. तेव्हापासून ते देवरेंनी त्यांना शिक्षा म्हणून देवरे कुळातून बाहेर काढले, ते नंतर खैरे म्हणून ओळखले जाऊ लागलेत. कुल विभाजनाचे हे तात्कालिक वा प्रासंगिक कारण आहे. कुलधर्माच्या आणखी एक महत्वपूर्ण नियमानुसार दर पाचव्या वा सातव्या पिढीत कुलाचे विभाजन होत असते. पाचव्या पिढीपर्यंत कुल प्रजेची संख्या इतकी मोठी होते की, कुलधर्माच्या काही रूढी-परंपरांचे पालन करणे अडचणीचे ठरू लागते. उदाहरणार्थ सुतक पाळण्याचा एक कुल-नियम आहे. एखादी व्यक्ती मेली की, त्या कुलात 11 दिवसाचा दुखवटा असतो. दुखवटा म्हणजे सुतकच! या अकरा दिवसात कुलातील सर्व कार्यक्रम ठप्प होतात. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या कुलप्रजेचे कामकाज ठप्प करणे म्हणजे उत्पादन व्यवस्था, विनिमय व्यवस्था ठप्प होते. अर्थात याचा मोठा परिणाम कुलाच्या व गणाच्या अर्थव्यवस्थेवर होणार! हे सर्व टाळण्यासाठी कुलाचे रितसर विबाजन होते. धनदाई मातेच्या देवरे कुलाचे विभाजन होऊन आता त्याचे 13 सरनेम झालेले आहेत.
या कुलधर्माची आणखी काही माहिती पुढच्या खेपेत.. तो पर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270  Email- s.deore2012@gmail.com

No comments:

Post a Comment