http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, March 28, 2018

5 BahujanNama Lokmanthan 7 January 2018


पाचवी  खेप......!                      (दै. लोकमंथन रविवार – 7 जानेवारी 2018साठी)
बहुजननामा

बहुजनांनो.... !
जगात पहिले नाते नैसर्गिक होते. अपत्याला जन्म देणारी स्त्री ‘आई’ म्हणून संबोधली गेली. तिने जन्म दिलेल्या अपत्याला मुलगा अथवा मुलगी संबोधले गेले. आई-मुल नाते स्थापन झाल्यानंतर रक्तसंबंधात शरीरसंबंध थांबविण्यासाठी भाऊ-बहिण हे दुसरे नाते कृत्रिम निर्माण करण्यात आले. तिसरे जे नाते पिता निर्माण झाले, ते पितृसत्ताक कुटूंबव्यवस्था उदयास आल्यावर कृत्रिमपणे निर्माण करण्यात आले. कुलधर्मात आई, मुलगा, मुलगी व भाऊ-बहिण ही दोनच नाती होती. कुलमाता असते, कुलपिता कुठेच सापडत नाही, कारण कुलधर्मात पिता कुणीच नसतो. जगभरच्या कुलसंस्था व गणराज्ये ही स्त्रीयांच्या नावाने ओळखली जातात. गांधारीचे गांधार गणराज्य, वैदेही-सीतेचे विदेह गणराज्य, द्रौपदीचे द्रुपद गणराज्य, कानबाईचे कान्हदेश (खानदेश) गणराज्य, कैकयीचे केकय गणराज्य, कौसल्याचे कोसल गणराज्य अशी असंख्य गणराज्ये छोट्या-मोठ्या नदींच्या काठवर वसलेली होती.
महाराष्ट्रात मराठा गणराज्य हे 96 कुळांचे होते. या कुलसंस्था तापी, नर्मदा, मुळा, मुठा अशा मोठ्या नद्दयांच्या खोर्‍यात वसलेल्या होत्या. मराठा गणराज्याची प्रमुख राणी माता तुळजा भवानी होय! आपल्या प्रजेच्या हितासाठी ती सारखी राज्यात भटकत असायची. त्यावरुन तीला ‘भटक भवानी’ असे नाव पडले. आर्यांच्या सांस्कृतिक वर्चस्वात ‘भटक भवानी’ हे नाव कुत्सितपणे घेतले जाऊ लागले. आजही गावात एखादी मुलगी एकटी रस्त्यावर दिसली की वडिलधारी माणसं तिला सहजपणे विचारून हटकतात- ‘काय गं ए भटक भवाने, कुठे फिरते आहे?’ तर, अशी ही आमची भटक भवानी, आमची गणराणी होय! छत्रपती शिवराय याच मातृसत्ताक गणराणीची गादी चालवित होते. भवानीच्या तलवार भेटीचा हाच अर्थ काढला जाऊ शकतो!
आमचे काही भटाळलेले लेखक विचारवंत सहजपणे सांगून जातात की, ‘जिजाऊंनी शिवरायांना लहाणपणी राम-कृष्णाच्या गोष्टी सांगीतल्या’ मात्र ते खरे नाही. जीजाऊंनी शिवरायांना राम-कृष्णाच्या गोष्टी सांगीतल्या असत्या तर, शिवराज्यानी आपल्या राज्याला ‘रामराज्य’ म्हटले असते, माता भवानीचे राज्य कधीच म्हटले नसते. भवानी हे सन्माननीय राजक पद आहे. काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंतच्या अनेक भागात भवानी मातेचा टिळा लावून फिरणार्‍या अनेक टोळ्या होत्या. विस्थापित झाल्यावर त्या गुन्हेगारीकडे वळल्या!
सर्वसामान्यपणे कोणताही हुशार राजा हा सांस्कृतिकदृष्या प्रजेचा गुलाम असतो. म्हणजे ज्या लोकांवर राज्य करायचे असते त्या लोकांच्या सांस्कृतिक प्रभावाचा अभ्यास करून धोरणे ठरवित असतो व तशी प्रतिकेही सन्मानीत करीत असतो. मराठा गणराज्याची  गणराणी माता तुळजा भवानीचा सांस्कृतिक प्रभाव हा महाराष्ट्रीयन मानसाच्या रक्तात आहे. तो कुलधर्माच्या माध्यमातून आजही घट्ट आहे. कुलधर्माची चक्रपूजा व त्यानंतर पिठाचे दिवे दुधात कुस्करून एकाच परातीत एकत्र बसून खाण्याची प्रथा आजही काटेकोरपणे पाळली जाते आहे. म्हणजे आजही दुधाचे नाते जगात सर्वात भक्कम मानले जाते. आंतरकूलीय विवाहामुळे सगळी 96 कुळं रक्ताच्या नात्यानं घट्ट बांधली जायची व उत्तरोत्तर पुढची पिढी अधिक प्रगल्भ व तल्लख होत जायची.
शूद्र शिवाजीचे सैन्य अशा 96 कुळी शूद्रादिअतिशूद्रांचे बनलेले होते. हे सैन्य पगारी नव्हते. सैन्य पोटावर चालते असे आपण म्हणतो, ते इतर राज्यकर्त्यांसाठी खरेच आहे. मात्र शिवाजीराजेंबाबत ते खरे नाही. त्यांचे सैन्य उत्स्फुर्तपणे गुलामगिरीच्या विरोधात लढण्याच्या उद्देशाने एकत्र झालेले होते. आणी याच एका कारणास्तव महाराष्ट्रातील क्षत्रिय वतनदार व ब्राह्मण-सचिव-पुरोहित हे शूद्र शिवाजीच्या स्वराज्याच्या विरोधात सतत कारवाया करीत राहिलेत. परंतू 96 कुळी शूद्रादिअतिशूद्रांचे मावळी सैन्य शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने ब्राह्मण व क्षत्रिय जातीच्या कारवायांना ते पुरून उरलेत. हे 96 कुळी शुद्र मावळे केवळ लष्करी सैन्य नव्हते, ते जीवलग मित्र होते शिवरायांचे! ते सल्लागार होते शिवराज्याचे! जोपर्यंत शूद्र मावळे सल्लागार होते तो पर्यंत स्वराज्य भक्कम होते व शिवरायही सुरक्षित होते. मात्र शिवरायांनी या शूद्र मित्रांना बाजूला सारून ब्राह्मण सल्लागार नेमताच स्वराज्याचे अधःपतन सुरू झाले. ब्राह्मण व क्षत्रिय या ऐतिहासिक जोडगोळीने आपले नेहमीचे विध्वंसक कार्य सुरू केले. शिवरायांना अनेकवेळा विष पाजून मारण्याचा प्रयत्न झाला. शिवरायांनी आपल्या स्वराज्याची कायदा-सुव्यवस्था ठिकठाक ठेवण्यासाठी शिकलेल्या ब्राह्मणांची नियुक्ती सचिव म्हणून केली. हे सचिव म्हणजे पगारी नोकर असतात. परंतू हातात राज्यकारभार येताच हे सचिव-ब्राह्मण स्वतःला मालकच समजायला लागतात. आज तुम्ही कोणत्याही राज्याच्या सचिवालयात जा, तेथे तुम्हाला हेच चित्र दिसेल. शूद्रादिअतिशूद्र आमदार-खासदार-मंत्री-मुख्यमंत्री-प्रधानमंत्री-राष्ट्रपती या सर्व घटनात्मक पदांना त्यांनी रबरी शिक्के करून ठेवले आहे.
ब्राह्मण सचिवांची ही ब्राह्मणी परंपरा चंद्रगुप्त मौर्यापासून चालू आहे. या परंपरेचा आढावा आपण पुढील खेपेत घेऊ या!
तोपर्यंत  जयजोती! जयभीम!!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
 Email- s.deore2012@gmail.com

No comments:

Post a Comment