http://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, August 14, 2018

35 BahujanNama Lokmanthan 5 Aug18 Saksharta


पस्तिसावी खेप ......!   (दै. लोकमंथन रविवार  5 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-35
समाज साक्षरता, संविधान साक्षरता व आरक्षण!
बहुजनांनो.... !
  इतर दिवसांपेक्षा परवा जरा जास्तच फोन आलेत. कधी नव्हे ते फेसबुक पोस्टला 100-125 कमेंटस व तेवढ्याच लाईक्सही मिळाल्यात. एक ओळखीचे मित्र डॉ. बालाजी जाधव सोडले तर बरेचसे लोक हे पहिल्यांदाच फोन करणारे होते. वैचारिक पोस्ट लिहिल्या तर बरेचसे लोक ढुंकूनही बघत नाहीत, मात्र एखादि पोस्ट ‘’कडक’’ शब्दात टाकली की, कमेंटस बॉक्सेसमध्ये धुंवादार पाऊसच पडतो. सर्वच जात-समूह व वर्गघटक वैचारिकता गमावून बसले आहेत. कशी वाढणार समाज साक्षरता?
यापूर्वीही मी मराठा आरक्षणावर अनेक वैचारिक पोस्ट लिहीलेल्या आहेत, त्यात मराठा आरक्षण मिळण्याचे कायदेशिर मार्गही मी दाखविले आहेत. अशा हजारो पोस्टवर कुणी कधीच कमेंटस केल्या नाहीत, लाईक अथवा अनलाईकही केल्या नाहीत. फोन करणे तर दुरच! वैचारिक पोस्टवर स्मशान-शांतता आणि -वैचारिकपोस्टवर मात्र धुमधडाका! अशा धुमधडाक्यातूनच बहुजन माणसं कुंभकर्णी झोपेतून जागृत होतात व वैचारिक बनायची प्रक्रिया सुरू होते. मी अशी धुमधडाका घडवून आणणारी पोस्ट जर टाकली नसती, तर मला कुणी फोन केलाच नसता. आताहे सर्व माझी प्रत्येक वैचारिक पोस्ट काळजीपूर्वक वाचणार. ही कडकपोस्ट टाकण्याचा माझा उद्देश सफल झाला. मराठा आरक्षणावर मी स्व-खर्चाने पुस्तके छापली आहेत. नचिअप्पन कमिटीचा अहवाल मराठा समाजाला माहीत व्हावा यासाठी मीच पुस्तिका छापली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीत शेकडो लेख लिहीले आहेत. आता मराठा कार्यकर्ते ते वाचतील अशी अपेक्षा करू या!
मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर पुरूषोत्तम खेडेकरसाहेब यांनी अनेक वैचारिक पुस्तके लिहिलीत. किती लोकांनी वाचलीत?? मग त्यांना जागृती आणण्यासाठी एक ‘’शिव्या-शाप’’ देणारे पुस्तकच लिहावे लागले. त्यातून जी खळबळ माजली त्यातून जागृतीच घडून आणली. असेच  दुसरे एक प्रामाणिक कार्यकर्ते डॉ. बालाजी जाधव! त्यांच्या पुस्तकाचे टायटलच- ‘’मराठायांनो षंढ झालात काय?’’  असे आहे. त्यांचेच अनुकरण करून मी गेल्या महिन्यात लेख लिहिला, ज्याचे शिर्षक होते- ‘’माळ्यांनो!, षंढ झाला आहात काय?’’ अशा शिव्या देण्यातून खळबळ माजते व त्यातून प्रेम वाढते, जागृतीही वाढते. आमच्या सार्या बहुजनांचे आजोबा, तात्यासाहेब महात्मा फुले; हे तर संतापीच होते! खळबळजनक जागृतीसाठी ते ‘’बेटीचोद’’ सारख्या खास गावरान शिव्या हासडायचे! से कडक प्रबोधनसमाज साक्षरतानिर्माण करण्यासाठी असते.
          समाज साक्षरता म्हणजे तारतम्य, तार्किकता अथवा सार्वजनिक नीतीमत्ता! या साक्षरतेचे कुठेही कायदे नसतात. समाजाच्या एकूण समजदारीतून समाज धुरिणांच्या प्रामाणिकपणातून काही अलिखित कायदे निर्माण होतात. सामाजिक न्याय याच अलिखित कायद्याद्वारे सिद्ध केला जातो. भाऊबंदकीच्या वाटा-हिस्साच्या प्रश्नावरून आपण कोर्ट-कचेरी करतो. परंतू आजही खेडे गावात एखाद्या कुटुंबाचेवाटे-हिस्सेपाडतांना याच समाज-साक्षरतेच्या माध्यमातून न्याय केला जातो. ज्या कुटुंबाचे वाटे-हिस्से पाडायचे असतात त्या कुटुंबातील भावंडांना एकत्र बोलावले जाते. मग समाज-धुरीण या बैठकित पहिला प्रश्न विचारतात की, तुमच्या कुटुंबात सर्वात लहा भाऊ कोण आहे. तो उभा राहतो. त्याला सांगीतले जाते की, तुमच्या कुटुंबातील एकूण मालमत्तेच्या हिस्स्यांपैकी तुला कोणता पाहिजे? म्हणजे तुला घर, शेती वा इतर मालमत्तेपैकी कोणता वाटा पाहिजे? त्याने आपला हिस्सा निवडल्यानंतरच बाकीच्या भावांची हिस्सा-वाटणी अनुक्रमे सुरू होते. असे का? तर सर्वात लहान, दुर्बल वा कमजोर व्यक्तीचा विचार करणे ही आमच्या बहुजन समाजाची परंपरा आहे. समाज-साक्षरतचे ते एक महत्वाचे मानवी मुल्य आहे.
         
स्वतंत्र भारतात राज्यघटनेच्या माध्यमातून सर्वांना न्यायपूर्णहिस्सा-वाटणी झाली पाहिजे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिच सामाजिक नीतीमत्ता वापरली. बाबासाहेबांनी फक्त आपल्या जातीचाच विचार केला असता तर, त्यांनी एस्सी कॅटेगीरीला 30-40 टक्के आरक्षण दिले असते बाकीच्यांना रांगेतच उभे केले असते. बाबासाहेबांनी तसे केले नाही. त्यांनी सर्वात आधी जास्त शोषित-पिडि अज्ञानी असलेल्या आदिवासी बांधवाचा विचार केला. त्यानंतर लितांचा! दलित व आदिवासींना राज्यघटनेतच सूची तयार करून आरक्षण दिले. ओबीसींसाठी घटनेत 340 कलम दिले. उच्चभ्रू असलेल्या क्षत्रिय, ब्राह्मण वगैरे जातींना त्यांनी वार्‍यावर नाही सोडून दिले. मराठा, जा, पटेल, ब्राह्मण वगैरे जातीतही आर्थिकदृष्ट्या शोषित-पिडित आहेत, याची त्यांना पूरेपूर कल्पना होती. म्हणून त्यांनी राज्यघटनेत जे 46 क्रमांकाचे कलम समाविष्ट केले आहे ते आपण काळजीपूर्वक पाहिले पाहिजे. त्यात उच्चजातीयांसकट सर्वच जाती-धर्मातील गरीब कमजोर लोकांचा एक जन-वर्ग तयार करून त्यांच्या विकासासाठी खास उपाय-योजना करण्यास सांगीतले आहे. ज्याप्रमाणे ओबीसींनी राज्यघटनेतील 340 व्या कलमद्वारा लोकशाही मार्गाने 27 टक्के आरक्षण मिळविले. त्यासाठी त्यांनी कधीच हिंसक आंदोलने केली नाहीत. त्याचप्रमाणे मराठा-जाट सारख्या जातींसाठी घटनेतील 46 व्या कलमाप्रमाणे घटनाबदल करून आरक्षण मिळविले पाहिजे.
उदारमतवादी इंग्रज सरकारच्या प्रभावामुळे प्रोत्साहनामुळे शाहु राजे सयाजीराव गायकवाडांसारखे राजे आपल्या जनतेमध्ये सामाजिक न्याय रूजवू शकलेत. स्वतंत्र भारतातील मतपेटीतून निवडून येणारे राजे हे सरंजामी, धनदांडगे जातीय गुर्मी असलेलेच राहणार आणी त्यांना मार्गदर्शन करणारा, प्रोत्साहन देणारा प्रभावी पुरोहित वर्गब्राह्म असणार, याबद्दल बाबासाहेबांना खात्री होती. पुरोहित ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखालील मराठा-जाट राज्यकर्ते हे कधीच शोषित-पिडीतांचे भले करू शकत नाहीत, अशी खात्रीही बाबासाहेबांना होतीच! त्यामुळे स्वतंत्र भारतातील सत्ता-साधनातील वाटे-हिस्से करतांना त्यांनी राज्यघटनेतून काटेकोरपणे वाटणी केली. याला म्हणतात समाज-साक्षरता, जीला बाबासाहेबांनी संवैधानिक रूप दिले. त्यातूनसंविधान-साक्षरतेची संकल्पना पुढे आली.
संगणक साक्षरता, अक्षर साक्षरता तशी संविधान साक्षरता! संविधान साक्षरता म्हणजे दुसरे तिसरे काही नाही, तर आपल्याच पुर्वजांच्या सार्वजनिक नीतीमत्तेतून साकारलेल्या ‘’समाज-साक्षरतेचे’’ नवे आधुनिक लोकशाही रुप होय! पण ही संविधान साक्षरता कीती भारतीयांमध्ये रूजली? ती रूजविण्यासाठी सत्ताधारी  व राज्यकर्त्या जातींनी कोणते शासकीय कार्यक्रम राबविलेत? संविधान लागू झाल्याचा प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला जातो? 26 जानेवारी म्हणजे झेंडा फडकविणे व पिकनिकला, सिनेमाला जाणे. त्याऐवजी संविधान तज्ञांची व्याख्याने शासकीय कार्यालयात आयोजि करणे. 26 जानेवारीला शाळा-कॉलेजात संविधानावर परिक्षा वा स्पर्धा-प्रश्नावली आयोजित करणे. राज्यघटनेतील सामाजिक राजकीय तत्त्वांचे विश्लेषण करणारे धडे अभ्यासक्रम पुस्तकात समाविष्ट करणे, असे अनेक शासकीय कार्यक्रम राबवून संविधान-साक्षरता निर्माण करता येते. आम्ही 1999 साली संविधान साक्षरतेचा सर्वे केला. देशातील 90 टक्के लोक स्पष्टपणे सांगतात की, आम्ही अजून संविधान पाहिलेच नाही. वाचणे वा समजून घेणे तर फारच दुर! कशी निर्माण होईल संविधान साक्षरता?
संविधान साक्षरता नसली तर आपणच आपल्या पायावर कुर्‍हाड कशी मारू घेतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठा-जाट आरक्षण आंदोलन होय! मराठा छावा संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष माननीय किशोर चव्हाण व त्यांच्या पदाधिकार्‍यांनी मी लिहिलेले ‘’मराठा समाजाचे ओबीसीकरण व जातीअंताचे धोरण’’ हे पुस्तक वाचले. त्यांना ते आवडले व त्यांनी माझ्याशी चर्चा केली. ओबीसी-मराठा समन्वय समिती स्थापन करून आम्ही दिल्लीला तत्कालीन (2013) केंद्रिय मंत्री असलेल्या नचिअप्पन साहेबांकडे शिष्टमंडळ नेले. बडोद्याचे माजी खासदार सत्यजितसिंह गायकवाड आमच्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष होते. सुदर्शन नचिअप्पन हे तामिळनाडूचे खासदार होते व त्यांच्याच केंद्रीय पार्लमेंट्री कमिटीने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा नष्ट करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्याशी शिष्टमंळाने केलेल्या चर्चेत जे कार्यक्रम ठरविलेत ते जर यशस्वी झाले असते तर तर आज केव्हाच मराठा आरक्षण कायमस्वरूपी मिळायलाही लागले असते. यावेळी मराठा समाजातून संविधान साक्षर असलेल्या वकील, डॉक्टर सारख्या बुद्धीमान वर्गाची साथ मिळाली असती तर आम्ही मराठा आरक्षण मिळविलेच असते. परंतू दुःख याचेच वाटते की, इतर मागास जातींप्रमाणेच मराठा समाजातील वकील वगैरे लोक ‘संविधान-साक्षर’ नाहीत, त्यांच्या संविधान-निरक्षरतेमुळेच आज मराठा आरक्षण आंदोलनात आर.एस.एस. ची पिलावळ घुसलेली आहे व ती जाती-संघर्ष घडवून आणून ‘पेशवाई’चे ब्राह्मणी हिंदू-राष्ट्र’ अस्तित्वात आणीत आहेत. मराठा समाज जर‘संविधान-साक्षर’ असता तर मराठ्यांचे युगपुरूष पुरूषोत्तम खेडेकर साहेबांना नागपूर रेशिम बागेतील आर.एस.एस.च्या वाड्यावर जाण्याची वेळ आलीच नसती. संविधान-साक्षर असलेल्या न्यायमूर्तीद्वय पी.बी. सावंत व कोळसे पाटील आदिंच्या मार्गदर्शनाखाली आजही आपण मराठा आरक्षण कायद्याने मिळवू शकतो. परंतू संविधान साक्षरतेअभावी आपण या विचारवतांना मराठा आरक्षण प्रक्रियेतून अपमानास्पदरित्या बाहेर घालविले आहे.
संविधान-साक्षर असलेल्या मराठा वकीलांनी जर राज्यघटनेतील कलम 46 वाचले तर त्याच्यातील क्रांतिकारकता लक्षात आली असती. राज्यघटनेचे कलम 46 हे जर प्रामाणिकपणे राबविले असते तर मराठा, पटेल जाट सारख्या राज्यकर्त्या जातीत गरीब शोषित वर्ग निर्माणच झाला नसता. काल-परवा खडकावर व वाळवंटात उभे राहीलेल्या छटाकभर ईज्रायल राष्ट्राने आजही शेती नफ्यातच ठेवली आहे. कारण एकच, तेथील राज्यकर्ते देशाभिमानी आहेत. आमचे राज्यकर्ते जातीअभिमानी म्हणजे देशद्रोहीच! केवळ जात-अभिमानी नाहीत तर, कुटुंब-प्रेमी आहेत. शेती हा शूद्रादिअतिशूद्राचा व्यवसाय असल्याने तो नफ्यात राहीला तर या शूद्रजाती धनवान बनतील. मनुस्मृती सांगते की शूद्र जर धनवान झाला तर तो ब्राह्मण-क्षत्रियांच्या डोक्यावर मिर्या वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या देशद्रोहींनी शेती नेहमीच तोट्यात ठेवली. परिणामी आज शेतकर्‍यांकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही.
आज निर्लज्जपणे सांगीतले जात आहे की ’शेती परवडत नाही म्हणून तुम्ही गरीब नाहित, तर तुम्हाला आरक्षण मिळत नाही म्हणून तुम्ही गरीब आहात.’’ आणी आमचे मराठा शेतकरी या धुर्त धुरीण लोकांच्या अपप्रचारास बळी पडून आरक्षणासाठी जातीय द्वेष वाढविणारी आंदोलने करतात. कारण ते संविधान-साक्षर नाहीत. ते संविधान साक्षर असते तर त्यांना समजले असते की आमच्याच जातीचे राज्यस्तरावरचे राज्यकर्ते व ब्राह्मण सत्ताधारी हे छुपे देशद्रोही असल्याने त्यांनी आपल्या विकासासाठी संविधानातील कलम-46 च्या तरतुदी वापरल्याच नाहीत. आज ते खोटी व असंवैधानिक आश्वासने देऊन निवडणुका जिंकत आहेत व जाती-जातीत युद्धे लावित आहेत.
पार्लमेंट्री नचिअप्पन कमिटीच्या अहवालाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडायला सांगीतली आहे. हा आधार व कलम 46 चा बेस घेऊन संविधानात बदल करता येईल व जाट-पटेल-मराठा व तत्सम उच्च जातींतील गरिब-कमजोर व्यक्तींचा एक स्वतंत्र ‘’जनवर्ग’’ तयार करून त्याच्या विकासाठी स्वतंत्र उपाय-योजना राबविता येईल. परंतू आजचे सत्ताधारी ब्राह्मण, मराठा, जाट जातीतील असूनही ते आपल्या जातीतील गरीबांसाठी जाणून-बुजून काहीच करीत नाहीत. कारण या आपल्याच जातीतील गरीबांना दलित-ओबीसी-आदिवासींविरोधात लढवून ते आपल्या कुटुंबियांची जात-सत्ता भक्कम करीत आहेत.
म्हणून मी आमच्या मराठा-जाट-पटेल सारख्या बांधवांना नेहमी सांगत असतो की, संविधानातील 15(4), 16(4) या कलमातून तुमचा विकास होणार नाही तर, कलम 46 चा उपयोग करूनच तुमचा विकास होणार आहे. मराठा-जाट-पटेलांना ओबीसीत व धनगरांना आदिवासीत टाकणे म्हणजे आपल्याच लहान भावांचा ‘’वाटा-हिस्सा’’ हिसकावून घेणे. ही बहुजनांची परंपरा नाही. बहुजनांची परंपरा तर सर्वात लहान भावाला प्राथमिकता देणारी आहे. लहान भावांचे ताट हिसकावणारी रानटी परंपरा ऐतखाऊ ब्राह्मणांची आहे. तुम्ही बहुजन असूनही कसे बळी पडत आहात या ब्राह्मणी परंपरेला???
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
                                      Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
                                       Email- s.deore2012@gmail.com


No comments:

Post a Comment