http://shrwandeore.blogspot.in/

Sunday, August 19, 2018

37 BahujanNama Lokmanthan 19 AUg 18 Safe Zone


सदतिसावी खेप ......!   (दै. लोकमंथन रविवार  19ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-37
सेफ झोन व डेंजर झोन!
बहुजनांनो.... !
     मुंबईत काही कार्यक्रम असला की, मी प्रदिप ढोबळेंना अवश्य फोन करीत असतो. सध्या त्यांच्यावर बरीच मोठी प्रशासकीय जबाबादारी असल्याने सतत बिझी असतात. बर्याच वेळा त्यांना कार्यक्रमाला येणे जमतही नाही. अशा वेळी मी त्यांना ओबीसी सेवा संघाच्या इतर पदाधिकार्यांना पाठवा म्हणून सांगत असतो. परंतू हे पदाधिकारी कार्यक्रमाकडे फिरकतही नाही. त्याचे कारण सांगतांना एकदा ढोबळेसाहेब म्हणाले की, आपले सगळे पदाधिकारीसेफ झोनमध्ये आहेत. त्यामुळे ते येत नाहीत.
          सेफ झोन म्हणजेसुरक्षित भाग’. आता ही सरक्षितता कशी आणि किती असते? रस्त्यावर काही ठिकाणी बोर्ड लावलेले असतात. त्यात एक बोर्ड असाही असतो की, ‘धोकेदायक वळण. त्याच प्रमाणे काही ठिकाणी अपघाती जागांचेही बोर्ड असतात. याचा अर्थ बाकीचा पुढचा रस्ता सुरक्षित असतो का? ‘’सुरक्षित वळण’’ किंवा ‘’सुरक्षित झोन’’  असा बोर्ड कधी कुणी रस्त्यावर बघितला आहे काय? नाही. कारण झोन सेफ असो की डेंजर, अपघात कोठेही होऊ शकतो. उद्या जर रस्ते महामंडळाने चांगल्या रस्त्यांवर सुरक्षित झोन चे बोर्ड लावलेत तर, काय ड्रायव्हर डोळे झाकून गाडी चालवेल का? अर्थातच नाही. ढोबळेसाहेबांनी सांगीतलेले लोक सेफ झोनमध्ये आहेत आणी म्हणून ते बिनधास्तपणे झोपेत घोरताहेत!

          आपण सेफ झोनमध्ये आहोत असे समजणे म्हणजे आपण व आपले कुटुंब सुरक्षित आहे, बाकीच्या समाजाचे काहीही होवो!’ आपली नोकरी सुरक्षित आहे. आपल्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित चाललेले आहे. घराचे हप्ते पगारातून नियमितपणे कापले जात आहेत, त्यामुळे घरही सुरक्षित आहे. बायकोला हव्या तेवढ्या साड्या चोळ्या मिळत आहेत व न चुकता दर रविवारी सिनेमा, हॉटेलिंग, शॉपींग होत आहे, त्यामुळे बायकोही सुरक्षितच आहे. बाहेर पेटलेला वणवा झोपड्या जाळेल, आपले घर नाही जाळू शकत, अशी त्याला खात्री असते. त्यामुळे बादलीभर पाणी घेवून आग विझविण्यासाठी मदत करावी, असा विचार त्याच्या डोक्यात येतच नाही.
          पुर्वी सेफ झोन म्हणून शेती व्यवसाय समजला जायचा! ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरीअसे हे घोषवाक्य होते. हा काळ कोणता? ज्या काळात सत्तेचं पहिलं हस्तांतरण सुरू झालेलं होतं. समाजाला नियंत्रित करणारी व त्याला वळण देणारी सत्ता धर्मसंस्था-राजसंस्थेकडून प्रशासनाकडे हस्तांतरित होत होती. त्या काळात नागरगठ्ठे असलेले शेतकरी लोक शिक्षण घेऊनहुशारबनत होते व प्रशासनात महत्वाच्या पदावर येऊ इच्छित होते. त्या काळात अतिहुशार ब्राह्मणांनी हे उत्तम शेतीचंघोषवाक्य प्रसारित केलं व आमच्या समाजात रूजविलं! अशी नवनवीन घोषवाक्ये प्रत्येक काळात येत असतात व बहुजन बावळे त्या घोषवाक्यांनी प्रेरित होऊन आपल्याच पायांवर कुर्हाड मारून घेत असतात.
          माझं जन्म गाव कळंबू! तेथलीच घडलेली घटना सांगतो. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरचा तो काळ असावा. भारताच्या बेसिक विकासाचा काळ! म्हणजे भरपूर नोकर्या निर्माण करणारा तो काळ होता. त्या काळात मोठ्या प्रमाणात गावोगावी शाळा निघत होत्या. त्यामुळे सर्वात मोठी नोकरभरती शिक्षक म्हणून होत होती. सातवी फायनल पास झाल्याबरोबर लगेच शिक्षकाची नोकरी मिळायची! माझ्या गावातील आठ लोकांना शिक्षकाची नोकरी लागली! कामावर रुजूही झालेत! त्यात कुणबी, कोळी, माळी, बौद्ध होते. मात्र पगार 8-10 रुपयाच्या वर जात नसल्याने नोकरी कनिष्ठ वाटू लागली. त्या काळात घर, गाव व शिव सोडून जाणं नामुष्कीचे समजले जायचे. समुद्रबंदी तशी स्वेच्छा-गावबंदीही होतीच. अर्थात या सर्व बंदी ब्राह्मणी संस्काराचाच भाग होय! तीन लोक वगळता बाकीचे उत्तम शेतीच्या सेफ झोनमध्ये घरी परतले! पुन्हा शेतावर कामाला लागलेत! जे नोकरीला चिकटून राहिलेत त्यांची दुसरी पिढी कारकून-शिपाई झाली व तिसरी पिढी आज प्रशासनात अधिकारी पदावर आहे. मात्र जे घरी परतले त्यांची दुसरी पिढी अल्पभुधारक झाली व तिसरी पिढी शेतमजूर!   
           सेफ झोन समजून जगणारे लोक सुस्तावतात, झोपतात व नंतर घोरायलाही लागतात. त्यांना असे वाटते की. आपण अजातशत्रू आहोत, आपले नुकसान कोण कशाला करील. मात्र त्यांना माहीतच होऊ दिले जात नाही की, दुसर्यांना डेंजर झोनमध्ये टाकल्याशिवाय स्वतःला ‘’सेफ’’ न मानणारेही लोक समाजात असतात. ‘करावे तसे भरावे’, ‘आपण चांगले तर सारे जग चांगले’, ‘द्वेषाने द्वेष वाढतो व प्रेमाने प्रेम वाढते’, आपल्या शत्रूवरही प्रेम करायला सांगणारे धार्मिक संस्कार ज्या बहुजन समाजात परंपरा म्हणून पाळले जातात, तो बहुजन समाज शेकडो वर्ष खोट्यासेफ झोनमध्येसुस्त पडलेला आहे. जर तो थोडाफार जागा झालाच तर त्याच्यासमोर चूकीचा शत्रू  उभा केला जातो व त्याला लढायला लावले जाते.
बौद्ध धम्माची क्रांती झाल्यानंतर ब्राह्मण-सकट सारेच लोक खर्या सेफ झोनमध्ये राहात होते. परंतू बहुजनांना डेंजर झोनमध्ये टाकत राहिले, तरच आपण सेफ राहू, असे ब्रीदवाक्य असलेले ब्राह्मण अस्वस्थ झाले होते. सतत जागता पहारा ठेवणारा भिक्खूसंघ जो पर्यंत अस्तित्वात होता, तो पर्यंत सर्व सेफ होतं. मात्र नंतर पुष्यमित्र शृंगाची प्रतिक्रांती झाली. जनजागृतीचा सततचा पहारा ठेवणारा भिक्खुसंघ परागंदा केला गेला, बौद्ध विद्यापीठे नष्ट करून भिक्खुसंघाची निर्मितीच थांबविण्यात आली. अशा प्रतिक्रांतीच्या काळात सेफ झोनमध्ये सुस्तावलेला बहुजन समाज केव्हाजातीच्या डेंजर झोनमध्ये येऊन पडला ते कळलेच नाही. सुरूवातीला जात सेफ झोन होती. आपला व्यवसाय सुरक्षित वाटत होता, त्यामुळे कुटुंब, नातेवाईक सर्वच सेफ वाटत होते. जातीत बंदिस्त झाल्यानंतर शिक्षणबंदी, गावबंदी, स्पर्शबंदी, रोटी-बेटी बंदी, समुद्र बंदी अशा सर्व बंदींचे फतवे निघात असतांना हा बहुजन समाज जातीच्या सेफझोनमध्ये सुस्तावलेला होता. आपण सेफ आहोत असेच त्याला वाटत राहीले.
          सेफ इंग्रज काळातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीमुळे जे काही मिळाले त्यात जाती आधारावरच्या कॅटेगिरींना आरक्षण ही फार मोठी देण होती. जातीच्या डेंजर झोनमधून बाहेर पडून तुलनात्मकदृष्ट्या अधिक सेफ झोनमध्ये जाण्यासाठी जी मुलभूत साधने लागतात त्यात जाती अधारावरचे कॅटेगिरी-आरक्षण हे महत्वाचे साधन होते. जातीअंताचा लढा लढण्याचे ते प्रभावी हत्यार होते. मात्र हे आरक्षण कॅटेगिरीला नसून जातीला आहे, असे समजण्यातून जात अधिक सेफ वाटू लागली. त्यामुळे जातीअंताच्या चळवळी क्षीण होत आहेत व जाती मात्र भक्कम!
          आज पुन्हा एकदा पेशवा-प्रतिक्रांती होत असतांना जे लोक स्वतःला सेफ समजत आहेत, किंवा जातीलाच सेफ समजत आहेत, त्यांचं येत्या 10 वर्षात काय होईल? तेच भविष्य सांगण्यासाठी आपण पुन्हा भेटू या, पुढच्या रविवारी, बहुजननामाच्या चावडीवर! तोपर्यंत जयजोती-जयभीम!!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
                                      Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
                                       Email- s.deore2012@gmail.com



No comments:

Post a Comment