http://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, October 1, 2019

89 BahujanNama FuleMarg, 30 Sept 2019


बहुजननामा-89                                             

फुले महामार्ग व जातीअंताची दिशा........!

बहुजनांनो.... !
-1-
माळी समाजाच्या दोन वेगवेगळ्या सत्ता संपादन मेळाव्याविषयी मी लिहिले. त्यापैकी नागपूरच्या संघ-भाजपाप्रणित माळी मेळाव्याच्या आयोजकांनी मला निमंत्रण दिले होते. निमंत्रण स्वीकारण्याचे कारण फार अजब होते. संयोजकांनी मला फोनवर सांगीतले की, ‘‘तुम्ही जे बहुजननामात कडक भाषेत लिहीतात, तेच तुम्हाला इथे भाषणात बोलायचे आहे. पेशवा आणी सरंजामदारांच्या नादी लागलेले माळी व त्यांचे नादाड नेते या सर्वांची चंपी करण्याची हिम्मत फक्त तुमच्यातच आहे. तुम्ही अवश्य या.’’ त्यांनी ठरविल्याप्रमाणे माझे दोन्हीकडच्या प्रवासाचे रेल्वेचे एसी बुकींग करून पाठवीले, विशेष प्रयत्न करून त्यांनी दोन्ही तिकीटांचे रिझर्वेशन कन्फर्मही करून दिले. राहण्याचीही व्यवस्था केली. एवढं सगळं झाल्यावर मी त्यांना कार्यक्रम पत्रिका व्हाट्सपवर पाठविण्याची विनंती केली. त्यांनी ती एकदिवस आधी पाठवली. कार्यक्रम पत्रिकेत माझे नावच कुठे छापलेले नव्हते. अर्थात माझे जाणे रद्द झाले.
कार्यक्रम पत्रिकेतून माझे नाव गायब करण्याचे उद्योग यापूर्वीही झालेले आहेत. महाराष्ट्रातील काही सरंजामदार व पेशवा यांच्या हिट-लिस्टमध्ये माझे नाव आहे. त्यामुळे माझ्यावर, माझ्या कार्यक्रमावर, माझ्या नावाचा समावेश असलेल्या कार्यक्रम-पत्रिकांवर, माझ्या फेसबुकवर व माझ्या इतर सोशल मिडियावर 24*7*12 असा जागता पहारा असतो. आता काही मित्र म्हणाले, ‘कार्यक्रम पत्रिकेत नाव नसले तरी, जा आणी चंपी करा!’ कार्यक्रम पत्रिकेत नाव नसतांनाही अनेक हवसे-नवसे स्टेजवर येऊन बसतात व भाषणही करून जातात. त्यांच्याबद्दल कोणीही आक्षेप घेत नाह, कारण ते नेहमीच ‘लाळघोटे’ बोलत असतात. चाटूगिरीचं भाषण सर्वांनाच आवडतं. पण माझ्यासारख्या वक्त्याचे ‘कडक’ भाषेत भाषण चालू असतांना, पत्रिकेवर बोट ठेऊन माझे भाषण बंद केले जाऊ शकते. असा काही प्रकार घडला तर संयोजकांची अडचण होईल, एवढ्या एका कारणास्तव मी नागपूरच्या पेशवा-प्रणित माळी मेळाव्याला जाणे टाळले.
तर मुख्य मुद्दा आहे माळी समाज ‘चिपळूणकर-गोळवलकर’ मार्गावरून फुले महामार्गावर येण्याचा! 2018 च्या एप्रिल-मे महिन्यात 45 अंशापेक्षा जास्त तापमान असतांना डॉ. ज्ञानेश्वर गोरे, मायाताई गोरे, सुनिता काळे, माचनवार, विलास काळे आदि फुले-आंबेडकरवादी ओबीसी नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी राज्यस्तरीय ओबीसी जनगणना यात्रा संपन्न केली. राज्य-यात्रेचा दौरा पर्ण झाल्यावर 11 मे रोजी समारोपाचा कार्यक्रम आझाद मैदानावर होता. उद्घाटक बाळासाहेब प्रकाश आंबेडकर व अध्यक्ष भुजबळसाहेब होते. या समारोप सभेचा इतिवृतांत मी तत्कालीन बहुजननामांमध्ये लिहीला आहे. त्या सभेला अपेक्षेप्रमाणे ओबीसी उपस्थित राहीले नाहीत, यावर मी एक बहुजननामा लिहीला, त्याचे शिर्षक होते ‘‘माळ्यांनो! षंढ झालात का?’’ तेव्हा केवळ शिव्या देऊन आम्ही स्वस्थ बसलो नाहीत. आपण अजून जास्त धडाडीने काम केले पाहिजे, अशी प्रेरणा घेऊन आम्ही पुन्हा कामाला लागलो. बैठका, मेळावे, धरणे आंदोलने, मोर्चे, व्याख्याने असा धडाका लावला. पायाला भींग्री लावून महाराष्ट्र 3-4 वेळा पालथा घातला. ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समिती स्थापन करून ओबीसीकरणाच्या मराठा-आरक्षणाविरोधात जीवाची पर्वा न करता लढलोत. काहिही करून माळीसकट संपूर्ण ओबीसी समाजाला फुले-मार्गावर आणलेच पाहिजे, यासाठी आम्ही जीव धोक्यात घालून मेहनत घेतली. या आमच्या कष्टाचे फळ आम्हाला 29 नोव्हेंबर 2018 रोजीच्या आझाद मैदानावरील ओबीसी धरणे आंदोलनात व 25 मार्च 2019 च्या आझाद मैदानावरील मोर्च्यात बर्‍यापैकी समाधानकारक दिसले. हे झाले फुले मार्गावर येणे. परंतू माळी फुले महामार्गावर येणे म्हणजे काय, हे आपण समजून घेतले पाहिजे.
-2-
जातीचे कार्यक्रम, कॅटेगिरीचे कार्यक्रम घेऊन त्यांचे फुले-आंबेडकरी प्रबोधन करणे, अशा कार्यक्रमांना जनजागृतीचे कार्यक्रम म्हणतात. हे कार्यक्रम स्व-जातीच्या नेतृत्वाखाली अथवा स्व-कॅटेगिरीच्या नेतृत्वाखाली होत असतात. ब्राह्मण-क्षत्रिय-सरंजामदार-वैश्य या जातीतील व्यक्तीला खालच्या जातींनी नेता मानणे, त्यालाच मते देणे व निवडून आणणे; ही झाली जातीय गुलामगिरी! आणी आपल्याच जातीच्या नेत्याच्या सभेला जाणे, आपल्याच जातीच्या माणसाला मते देणे, ही झाली जात-जागृती! आणी कनिष्ट जातीच्या पक्ष नेतृत्वाखाली काम करणे याला म्हणतात, डिकास्ट होणे. जात्यंतक फुले मार्गावर येण्यासाठी ही पहिली कसोटी आहे. सर्वात मोठी गोष्ट ही की, फुले-आंबेडकरी सत्यशोधक विचारधारा स्वीकारून सर्व जातजमातीय व श्रमिक वर्गीय संघटन उभारणे व जातवर्गस्त्रीदास्यअंतक समाज निर्मीतीसाठी कार्य करणे, याला म्हणतात फुले महामार्गावर येणे.
अल्पस्वरूपात का होईना परंतू माळी समाज आता फुले महामार्गावर येण्याची सुरूवात
झाली आहे. माझ्यासारखे लहान-मोठे कार्यकर्ते जे काम करीत आहेत, त्यांच्या कष्टाला फळ येण्यास सुरूवात झाली आहे. आमचे हे माळी समाजाबद्दलचे सर्व विश्लेषण वाचून मराठा सेवा संघाच्या एका कार्यकर्त्याची प्रतिक्रिया आली- ‘आमच्या मराठा समाजाने हेच काम 25 वर्षांपूर्वीपासूनच करीत आहे. मराठा सेवा संघाची (मसेस) स्थापनाच मुळी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांवर झालेली आहे. मराठा सेवा संघाने मराठा जातीतून अनेक पुरोगामी विचारांचे लेखक, वक्ते, संशोधक तयार केले. ते ब्राह्मणांवर व त्यांच्या विचारांवर अक्षरशः तुटून पडतात. खेडेकर साहेबांच्या पुस्तकाच्या विरोधात कोर्टात केसेस चालू आहेत. आम्ही भांडारकर फोडले, दादू कोडंदेव तोडला. ब्राह्मणशाही नष्ट करण्याचे इतके आक्रमक कार्य मराठा व्यतिरिक्त दुसरी कोणतीही जात करीत नाही.’
या मराठा कार्यकर्त्याचे म्हणणे प्रथमदर्शनी लगेच पटते. परंतू जात्योन्नती आणी जातीअंत यांच्यातला फरक ज्याला कळत नाही, असा सामान्य कार्यकर्ता भूलभूलैय्याला कसा बळी पडतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा मराठा कार्यकर्ता होय! इतिहासाची साक्ष काढली तर नेमकी दिशा उलटीच आहे. फार प्राचिन काळातील ब्राह्मण विरूद्ध क्षत्रिय सत्तासंघर्षाची उदाहरणे मी देणार नाही. परंतु अगदी अलिकडची उदाहरणे पाहिली तरी या दोन उच्चवर्ण-जातीतील सत्तासंघर्ष कसा मतलबी आहे, ते कळते. वर्ण-जातीव्यवस्था पक्की करून ब्राह्मणशाहीचे वर्चस्व अधिकाधिक मजबूत करणे यासाठी या दोन्ही उच्चवर्ण-जाती सतत सतर्क राहून काम करीत असतात.
तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत अभावानेच एखादा मराठा होता. बहुतेक सर्व दिग्गज मराठा हे टिळकांसोबत काम करीत होते, असे आपल्याला डॉ. य.दि. फडके सांगतात. सत्यशोधक या जात्यंतक चळवळीत मोठ्या प्रमाणात शूद्रादिअतिशूद्र जाती व कामगार वर्ग काम करीत होता. ही चळवळ याच स्वरूपात राजकीय क्षेत्रात उतरली असती तर निश्चितच जात्यंतक राजकीय पक्ष म्हणून देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली असती. परंतू राजकीय फायद्यापोटी या चळवळीत जसजसे मराठा-सरंजामदार प्रवेश करते झालेत, तसतसे मराठा वर्चस्व वाढत गेले. परिणामी या चळवळीतून शूद्रादिअतिशूद्र हद्दपार होत गेलेत. सत्यशोधक मराठ्यांनी टिळकांविरूद्ध व एकूणच ब्राह्मणांविरूद्ध आक्रमक भुमिका घेतली. सत्यशोधक पक्ष स्थापन करण्याऐवजी ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केला. या भुमिकेमूळे त्यांचे राजकारणातील एकजातीय उपद्रव-मूल्य वाढले. त्यातून पुढे ब्राह्मण-मराठा तह झाला. आणी नंतर हे सर्व सत्यशोधक-मराठे ‘सत्ता शोधत-शोधत’ ब्राह्मणी कॉंग्रेसमध्ये जाऊन विलीन झालेत. 70 वर्ष ‘बहुजन’ नावाने सत्ता भोगणारे मराठे आज भाजपामध्ये जाण्यासाठी पेशव्यांच्या दारी कसे रांगेत उभे आहेत, हे आपण आज पाहात आहोतच.
-3-
तर मराठा सेवा संघाच्या (मसेस) कार्यकर्त्याने उपस्थित केलेला मुद्दा हा होता की, स्थापनेपासूनच म्हणजे गेल्या 25-27 वर्षांपासून मसेस ब्राह्मणशाहीविरोधात लिहीतो, बोलतो व लढतो आहे. आणी माळी समाजाचा एक मेळावा झाला तर तो तुम्हाला क्रांतीकारक वाटतो. हे कसे, असाही प्रश्न त्याने विचारला. मराठा समाजाची भुमिका कितीही पुरोगामी व क्रांतिकारक वाटत असली तरी ती केवळ जातीचे उपद्रवमूल्य वाढवून जातीसाठी फायदा करून घेण्यासाठी आहे, हे इतिहासात अनेकवेळा सिद्ध झाले आहे. तुम्ही जेव्हा ब्राह्मणांच्या विरोधात बोलतात, तेव्हा तुमची भुमिका जात्योन्नतीची न ठेवता जातीअंताची हवी. जर ती तशी असती तर तुम्ही इतर जातीतल्या पुरोगामी विचारवंत व लेखकांना सोबत घेतले असते. पण असे होत नाही. आतापर्यंत जेवढी अधिवेशने मसेसची झालीत, त्यापैकी एखाद-दुसरा अपरिहार्य अपवाद वगळला तर मसेस ने कधीही ओबीसी-दलित-आदिवासी विचारवंत-नेत्यांना स्टेजवर घेतले नाही. मराठा आरक्षणाला आक्रमकपणे पाठिंबा देणार्‍या रामदास आठवलेंपासून प्रदिप ढोबळेंपर्यंतच्या ओबीसी नेत्यांना कधीच कार्यक्रमपत्रिकेत मानाचे स्थान मिळाले नाही. मात्र एकीकडे ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या आणी दुसरीकडे ब्राह्मणांचे मुखंड व पेशवाईचे कारभारी असलेल्या गडकरी-फडणवीसांना सन्मानाने प्रमुख पाहुणे म्हणून स्टेजवर बोलाविले जाते. कार्यक्रमपत्रिकेतही त्यांना सनमानाची वरची जागा मिळते.
कोण प्रमुख पाहुणा यावर क्रांतिकारकता ठरत नाही, पण दिशा मात्र ठरते. तुमचा नेता
कोण, यावर ‘क्रांतीकारकता’ ठरते. नागपूरच्या माळी मेळाव्यात दिशा देणारा नेता गडकरी असेल तर, ती निश्चितच ब्राह्मणवादी (प्रतिक्रांतीकारी) दिशा आहे. अरणच्या माळी मेळाव्यात नेतृत्व स्थानी प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी होती. म्हणून ती निश्चितच क्रातीकारी व ब्राह्मणशाहीविरोधी दिशा आहे. मराठा समाज तेव्हाच क्रांतिकारी ठरेल जेव्हा तो प्रा. जोगेंद्र कवाडेंना नेता मानून रिपब्लिकन पक्षाच्यासोबत राजकारण व समाजकारण करेल. भारतात कोणतीही एक जात क्रांतीकारक वा प्रतिक्रांतीकारक होऊ शकत नाही. समान ध्येय-धोरण असलेल्या किमान दोन जाती एकत्र आल्यात तरच क्रांती वा प्रतीक्रांती होते. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा पेशवाईची प्रतीक्रांती व्हायची असते, तेव्हा तेव्हा ब्राह्मण-मराठा या दोन जातीच एकत्र आलेल्या दिसतात. शूद्र व अतिशूद्र (स्पृश्य-अस्पृश्य) या दोन कष्टकरी ‘वर्ण-शक्ती’ एकत्र आल्यावरच वर्णांताची बौद्ध क्रांती व जैनक्रांती झाली. उत्तर प्रदेशात (दलित) बसपाने कॉंग्रेस खतम केली होती व (ओबीसी) सपाने भाजप खतम केली होती. परंतू जेव्हा या दोन्ही क्रांतीकारक शक्ती शत्रूभावी झाल्यात, तेव्हा पुन्हा भाजपने प्रतिक्रांती करीत सत्ता बळकावली.
महाराष्ट्रात मराठ्यांनी 1910 साली सत्यशोधक चळवळीचा व 1995 साली फुले आंबेडकरी वारसा यासाठी ‘‘उचलला’’ की, लोकशाहीतील राजकीय सत्ता केवळ दलित, आदिवासी व ओबीसींमुळेच मिळते. परंतू सत्ता मिळाल्यावर तीचा सर्वात जास्त फायदा ब्राह्मणांना, वैश्यांना व आपल्या सरंजामदार नातेवाईकांनाच करून देण्यात आला, असे डॉ. बाबा आढाव सिद्ध करतात. दलित, आदिवासी व ओबीसींना तर आपल्या संवैधानिक हक्कांसाठी सतत लढत राहावे लागले. मोर्चे, धरणे, लाठ्या खाणे व प्रसंगी छातीवर गोळ्या खाणे हाच त्यांचा गेल्या 70 वर्षांचा इतिहास आहे. जर मराठ्यांनी तामिळनाडूतील ओबीसींप्रमाणे प्रामाणिकपणे बहुजन म्हणून राज्यकारभार केला असता तर, आज मोठमोठ्या मराठा सरंजामदारांना भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून भीखेची झोळी हातात घ्यावी लागली नसती.
या विषयाशी निगडीत अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर आपण पुढील बहुजननामात चर्चा करीत राहू........तो पर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 29 सप्टेंबर व प्रकाशनः 30 सप्टेंबर 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)

Letter to Baliram Sirskar from Shrawan Deore, 2 Oct 2019


माननीय आमदार बळीराम सिरस्कर यांना
प्रा. श्रावण देवरे यांचे अनावृत्त पत्र
 2 ऑक्टोंबर 2019
माननीय आमदार बळीरामजी सिरस्कर,
                                  सत्य की जय हो!

     आपण गेल्या 10 वर्षांपासून ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून भारिप-बहुजन महासंघात व वंचित बहुजन आघाडीत काम करीत आहात. पक्षातर्फे आपण आमदार म्हणून 10 वर्षे विधानसभेत बाजू मांडत आहात. माळी समाजाच्या व इतर ओबीसी कार्यक्रमात मी आपल्या पुरोगामी भुमिकेबद्दल अनेकवेळा गौरवोद्गार काढले आहेत. दलित व ओबीसी सामाजाला एकत्र जोडणारा दुवा म्हणून मला आपल्याबद्दल नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे.
     नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूकीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीने तिकीट नाकारल्याचे प्रसिद्धीमाध्यमातून कळले. आपण पक्षाचे एकमेव व विद्यमान आमदार असतांना आपल्याला तिकीट नाकारले गेले, याबद्दल आपणासकट समस्त ओबीसी बांधवांना वाइट वाटणे स्वाभाविक आहे. अशा दुखःद प्रसंगी आपण भावनिक व व्यक्तिगत होऊन काही चूकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाटते. म्हणून ओबीसी चळवळीतील एक कार्यकर्ता व आपला हितचिंतक म्हणून आपल्याला हे पत्र पाठविण्याचे धारिष्ट्य करीत आहे.
     तिकिट नाकारल्यानंतरही आपण निवडणूकीसाठी फॉर्म भरला आहे. म्हणजे आपण पक्षाविरोधात बंडखोरी करीत निवडणूक लढविणार, हे स्पष्ट झाले आहे. याबाबत मी आपणास एवढेच सांगू इच्छितो की, आपण पक्षाशी बांधील राहावे व संयम ठेवून निर्णय घ्यावेत. तुम्ही केवळ एक व्यक्ती नाहीत. तर ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून एक ‘शक्ती’ आहात. ही शक्ती पेशव्यांना मदतकारक ठरेल असा निर्णय घेऊ नका.
     आज महाराष्ट्रात पेशवा व सरंजाम या दोन जातींनी पुन्हा दुसर्‍यांदा युती केल्यामुळे पेशवाईचे पुनरूज्जीवन झालेले आहे. महाराष्ट्रासकट सर्व भारतातील दलित-आदिवासी-ओबीसी-अल्पसंख्यांकांना वेठबिगारीच्या खाईत लोटण्याचे काम सुरू झालेले आहे. जातीव्यवस्था नष्ट करणारे दलित-आदिवासी-ओबीसींचे पॉझिटिव्ह आरक्षण खतम केले जात आहे व जातीव्यवस्था मजबूत करणारे पेशवा-सरंजामदारांचे निगेटिव्ह आरक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या पेशवाईच्या संकटाला शह देण्यासाठी दलित-आदिवासी व ओबीसींनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. अशा कठीण समयी आपण केवळ व्यक्तीगत अन्यायाकडे न पाहता व्यापक व लांब पल्ल्याचा विचार करून दलित-ओबीसी ऐक्य अबाधित ठेवावे व त्यासाठी आपण पक्षविरोधी बंडखोरी करण्याचा निर्णय रद्द करावा. आपण असा निर्णय घेतला तर आपल्या ह्या त्यागाची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्यासारख्या मोठ्या माणसांच्या त्यागातूनच क्रांतीची बीजे पेरली जातात व पुढच्या पीढीला प्रेरणा देत असतात. जात्यंतक चळवळीच्या इतिहासात आपण ‘त्यागमूर्ती’ म्हणून ओळखले जाल. वंचित बहुजन आघाडीत अनेक प्रामाणिक कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यापैकी अनेकांना तिकीट नाकारले गेले असेल. राजकारणात पक्ष नेत्वाकडून काही चूका होऊ शकतात. आजघडीला त्याचा बाऊ न करता या सर्व अन्यायग्रस्त कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की, त्यांनीसुद्धा बंडखोरीचा विचार न करता पक्षासोबत राहून काम करावे व जास्तीतजास्त आमदार वंबआतर्फे निवडून आणावेत, ही विनंती.
     बळीराम जी, आपणही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकाल व त्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा करतो.  धन्यवाद!
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-



Friday, September 27, 2019

Pune Progr on Satyashodhak Samaj 24 Sept 2019

Satyashodhak samaj day was observed in Pune at Savitrimai Smarak Hall on 24Sept2019. I was chief speaker of the progr. A half minute cliff of my lecture, I  emphasized   a very imp point.....

Monday, September 23, 2019

88 BahujanNama AranMali 20 Sept 2019


बहुजननामा-88                                               (प्रकाशनः 20 सप्टेंबर 2019)        


सावधान! माळी समाज ‘फुले-महामार्गावर’ येत आहे.....

बहुजनांनो.... !
-1-
माळी समाजाचे एकूण दोन ‘सत्ता संपादन मेळावे’ गेल्या रविवारी व सोमवारी संपन्न झालेत. रविवारी 15 सप्टेंबरला गडकरींचा संघभाजप-प्रणित माळी-मेळावा नागपूरला संपन्न झाला व सोमवारी 16 सप्टेंबरला बाळासाहेब प्रकाश आंबेडकर-प्रणित माळी-मेळावा अरण गावी संपन्न झाला. या मेळाव्यांमध्ये काही समान मुद्दे ठळकपणे दिसत होते.
1)     हे दोन्ही मेळावे ‘सत्ता-संपादन’ मेळावे होते व ते माळी जातीचे होते.
2)     दोन्ही मेळाव्यात जमलेले माळी एक विशिष्ट ‘मेरीट’ चे होते. म्हणजे बाजार-बुणगे वा मेंढरं नव्हती.
3)     दोन्ही मेळाव्यात जमलेल्या लोकांची संख्या मर्यादित असली तरी ती जागृत माळ्यांची संख्या होती.
एवढे तीन साम्य सोडले तर या दोन्ही मेळाव्यात ब्राह्मणी-अब्राह्मणीइतका प्रचंड मोठा फरक होता. तो फरक आता आपण पाहू.....
1)     नागपूरचा माळी मेळावा हा ‘पेशव्यांसाठी सत्ता संपादन’ मेळावा होता. तर, अरणचा मेळावा हा माळ्यांसकट सर्वच ‘ओबीसी-दलितांसाठी सत्ता संपादन’ मेळावा होता.
2)     नागपूरच्या मेळाव्यात वामन-अवतारी पेशवे हे मुख्य मार्गदर्शक होते, जे तात्यासाहेब महात्मा फुलेंवर जीवंतपणी जीवघेणा शारिरीक हल्ला करीत होते व त्यांच्या मृत्युनंतरही त्यांच्या विचारांवर हल्ला करीत आहेत. तर, याउलट अरण येथील माळी मेळाव्यात तात्यासाहेबांचे वैचारिक शिष्य असलेल्या बाबासाहेबांचे नातू माननीय प्रकाश आंबेडकर मुख्य मार्गदर्शक होते, ज्यांच्या समाजाने घरोघरी तात्यासाहेबांचे फोटो लावून व ग्रंथ वाचून त्यांना भौतिक व वैचारिकदृष्ट्या जीवंत ठेवले आहे.
3)     नागपूरच्या मेळाव्यात जमलेले माळी जागृत असले तरी ते लाचार, लाळघोटे व पेशव्यांचे गुलाम होते, तर अरणला जमलेले माळी स्वाभीमानी, ताठ मानेचे व पेशव्यांना लाथाडणारे होते.
नागपूरच्या मेळाव्यात समोर माळी समाज बसलेला असतांना व पाठीमागे तात्यासाहेब महात्मा फुलेंचा फोटो असतांना गडकरींनी आपली ‘फुले-मारेकर्‍या’ची भुमिका सोडली नाही. भाषणात त्यांनी फुले-विचारांवर विषारी हल्ला चढविला. गडकरी म्हणाले, आरक्षणाने काहीही प्रगती होत नाही. नागपूरात माझ्या जातीची 5-10 घरे आहेत, तरीही मी निवडून येतो व मंत्रीही होतो.’ गडकरींच्या भाषणाचा सरळ मतितार्थ असा होता की, तुम्ही संख्येने कितीही जास्त असा. शेवटी तुम्ही मेंढरं ते मेंढरंच राहणार आहात. आरक्षण नसतांनाही आम्ही प्रगतीपथावर आहोत, सत्ताधारी आहोत, आणी तुम्ही माळी लोक आरक्षण असूनही माझ्यासारख्या अल्पसंख्य ब्राह्मणासमोर ‘लाचार’ म्हणून बसलेले आहात.
नागपूरला उपस्थित माळी लोक व्यक्तीगत स्वार्थापूरते जागृत आहेत. त्यांच्यापैकी कुणाच्या सहकारी बँका आहेत, शिक्षण संस्था आहेत, सोसायट्या आहेत. या संस्था टिकवून ठेवण्यासाठी सत्ताधार्‍यांच्या पायाशी लोळण घ्यावीच लागते, हे मी समजू शकतो. परंतू त्यासाठी सत्ताधार्‍यांचे पाय चाटण्याचा कार्यक्रम जाहीरपणे व तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या साक्षीने साजरा करू नका. तुम्ही नासला आहात, तसे इतरही माळ्यांना नासवू नका. तुम्हाला काय लाळघोटेपणा करायचा असेल तो गडकरींच्या केबीनमध्ये जाऊन, बँडवाजा लावून साजरा करा. तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या साक्षीने त्यांच्या विचारांचा कार्यक्रम करण्यासाठी किमान प्रामाणिकपणा लागतो. नागपूर मेळाव्यात जमलेले माळी शरिराने ‘लखवाग्रस्त’ होते व मेंदूने ‘बधीर’! नागपूरला उपस्थित माळ्यांमध्ये एक जरी माणूस तात्यासाहेब महात्मा फुलेंवर प्रेम करणारा असता तर त्याने गडकरींचा निषेध केला असता. आरक्षणाच्या सिद्धांताचे जनक असलेल्या तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या फोटोसमोर व माळ्यांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या विरोधात बोलण्याची हिम्मतच कशी होऊ शकते? गडकरी अशी हिम्मत करू शकलेत कारण, शेकडो वर्षे एकतर्फी 100 टक्के आरक्षण जातनिहाय होते. मनुस्मृतीप्रमाणे सर्व कष्टमय-यातनादायी-सेवाधर्मी’ व्यवसायांचे 100 टक्के आरक्षण शुद्रादिअतिशूद्रांच्या माथी मारून व ‘भोगमय-आरामदायी-नफाधर्मी’ व्यवसाय ब्राह्मण-क्षत्रिय(?)-सरंजामदार-वैश्यांसाठी 100 टक्के राखीव ठेवून शतकानुशतके जी सत्ता उपभोगत आहेत, त्यातून आलेली ही गुर्मी आहे. या गुर्मीमुळेच ‘फुले-विचार’ मारण्याचे धाडस गडकरी करू शकलेत.
-2-
जातीव्यवस्थेच्या अनेक वैशिष्ट्यांसोबत एक वैशिष्ट्य हे आहे की, प्रत्येक जातीला आपला नेता वरच्या जातीतून अथवा वरच्या जातीच्या मान्यतेतून आलेला पाहिजे असतो. संघटना जातीय असो कींवा वर्गीय, त्या संघटनेचा नेता सवर्ण जातीय अथवा त्यांच्या मान्यतेचाच लागतो. शेतकरी हे सर्वच्या सर्व शूद्रच आहेत, पण त्यांच्या वर्गीय संघटनेचा नेता शरद जोशी (ब्राह्मण) अथवा जाट-सरंजामदार टिकैतच असतो. कामगारवर्गात मोठ्या संख्येने शूद्रादिअतिशूद्रच असतात, परंतू त्यांना नेता म्हणून दत्ता सामंत, डांगे, राव सारखे ब्राह्मणच लागतात. शासकीय कर्मचार्‍यांमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक असतात, पण त्यांना नेता म्हणून मुसलमान-दलित चालत नाहीत, तिथे नेता कर्णिक (ब्राह्मणच) लागतात. जातनिहाय संघटनांचं सूत्र यापेक्षा वेगळे नाही. माळ्यांचा नेता किंवा ओबीसींचा नेता कोण होऊ शकतो? ज्याच्या डोक्यावर गडकरी-ठाकरेंचा आशिर्वाद आहे किंवा ज्याच्या खांद्यावर पवारांचा हात असेल, तोच माणूस माळ्यांचा किंवा ओबीसींचा नेता होऊ शकतो. तेली, कोळी, सुतार, लोहार, कुंभार, नाभिक-धोबी-परीट वगैरे सर्व जातींची हीच कहाणी आहे. फरक एवढाच आहे की, माळी, तेली सारख्या मोठ्या जातींचे नेते स्वतः पवारसाहेब नियुक्त करतात व नाभिक-धोबीसारख्या छोट्या जातीतील नेत्यांची नियुक्ती आर.आर.आबांसारखे दुय्यम नेते करतात. एकतर ब्राह्मण-मान्यता हवी किंवा मराठा-मान्यता पाहिजे. एकमेव बौद्ध समाज असा आहे कि, त्यांचे नेते भुमिहिनांच्या वर्गीय व नामांतरासारख्या जातीय-संघर्षातून निर्माण झालेले आहेत. परंतू अशा संघर्षशिल नेत्यांना आमदार-खासदार-मंत्री होण्यासाठी सरंजामदार्‍यांच्या किंवा पेशव्यांच्या पायाशी लोळण घ्यावीच लागते. त्याशिवाय ते मान्यताप्राप्त दलित-नेते होतच नाहीत. वामन मेश्राम, बोरकर, माने-मानकर हे दलितांचे नेते होऊ शकत नाहीत, कारण त्यांना अजून पेशव्यांचा आशिर्वाद लाभलेला नाही किंवा मराठा-सरंजामदारांकडून शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडलेली नाही.
त्याचप्रमाणे कोणाच्या सभेला जायचे आणी कोणाच्या सभेला नाही जायचे, हे सूत्रसुद्धा
याच पद्धतीचे असते. मंडल आयोगासाठी आयुष्यभर चळवळ करणार्‍या व ओबीसी आरक्षणाला मराठ्यांपासून वाचविणार्‍या श्रावण देवरेंच्या सभेला मोठ्या संख्येने लोक येत नाहीत, परंतू भुजबळ फॉर्मवर रोजच जत्रा भरते! त्याचे साधे कारण हे आहे कि, श्रावण देवरेला गडकरी-ठाकरे-पवारांनी गो-मूत्र शिंपडून पवित्र करून घेतलेले नाही. अशा ‘अपवित्र’ श्रावण देवरेला नेता कसे मानणार, असा प्रश्न माळ्यांना व इतर ओबीसी जातींना पडलेला असतो. हे पेशवा व सरंजामदार केवळ ओबीसी-दलित नेत्यांवरच गोमूत्र शिंपडतात असे नाही तर, दलित-ओबीसी जातीतील विचारवंत, साहित्यिक, बुद्धिवंत आदि तज्ञ लोकांवरही गोमूत्र शिंपडतात. त्याशिवाय या बुद्धिवंतांना साहित्य महामंडळाचे सदस्य वा अध्यक्ष बनता येत नाही. भांडारकर संशोधन संस्थेचे डायरेक्टर होणे म्हणजे किती मोठे मानाचे पद. पण त्यासाठीसुद्धा पेशव्यांच्या पायावर ‘डोके’ ठेवावे लागते. त्यानंतरच ते गोमूत्र शिंपडतात व पवित्र करून घेतात.
-3-
तर सांगायचा उद्देश असा की, सभेला जातांना सुद्धा लोक असा विचार करतात की, या सभेचा मुख्य नेता गोमूत्र शिंपडलेला आहे की नाही. सभेचा प्रमुख पाहूणा पेशवा किंवा सरंजामदार असेल तर, हे ओबीसी-दलित लोक डोळे झाकून सभेला जातात. नागपूरच्या माळी मेळाव्यात हेच पेशवा-सूत्र काम करीत होते. नागपूरच्या मेळाव्यात माळ्यांचे अधःकारमय भविष्य व भयानक वर्तमान स्पष्टपणे दिसत असतांना अरणच्या माळी मेळाव्याने मात्र आशेचा किरण दाखवीला. जातीतून बाहेर पडून ‘जात्यंतक’ राजकारण काय असते, ते अरणला जमलेल्या माळ्यांनी दाखवून दिले. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर होते, ही एक तत्वज्ञानात्मक परिवर्तनाची दिशा आहे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंनी एखाद्या राजा-महाराजाला, जमिनदार-सरंजामदाराला वा ब्राह्मण-पेशव्याला गुरू नाही मानले. किंवा संत सावता माळ्यालाही गुरू नाही मानले. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंनी मातंग जातीतील क्रांतीवीर लहूजी साळवेंना गुरू-मार्गदर्शक मानले. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी संत चोखा महाराला गुरू नाही मानले. परजातीय-परधर्मीय बुद्ध, कबीर, फुलेंना मार्गदर्शक मानले. या महापुरूषांच्या पावलावर पाऊल ठेवत अरणला जमलेल्या माळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षशील नातवाला मार्गदर्शक मानले, हाच आहे खरा ‘फुले-महामार्ग’, अशी असते परिवर्तनाची दिशा, हे या माळ्यांनी सिद्ध केले आहे. आपण नागपूरच्या दिशेने जाऊन गडकरीसारख्या ‘फुलेंच्या शत्रू’ला डोक्यावर घ्यायचे की अरणच्या दिशेने जाऊन ‘फुले-प्रेमी’ प्रकाश आंबेडकरांना नेता मानायचे, हे ठरविण्यासाठी मेंदू ‘बधीर’ असून चालत नाही. तो मेंदू वैचारिकदृष्ट्या तल्लख व सतर्क असला पाहिजे, तरच योग्य व अचूक दिशा सापडते.  
याच्या उलटी आणखी एक दिशा आहे, ती समजल्याशिवाय अरणच्या माळ्यांचे ‘फुले महामार्गावर’ येणे किती क्रांतीकारक आहे, हे लक्षात येणार नाही. आमच्या बहुजन हुशारांना एखादा चांगला मुद्दा समजून सांगायचा असेल तर, केवळ सिद्धांत सांगून समजत नाही. त्यासाठी एखादे उदाहरणच द्यावे लागते, किंवा तुलनात्मक फरक स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे द्यावी लागतात. म्हणून मला नाइलाजास्तव मराठा समाजाचे उदाहरण तुलना करण्यासाठी द्यावे लागते आहे. परंतू पुढच्या बहुजननामात.......
तत्पूर्वी आण्णासाहेब शंकरराव लिंगे व तरूण तडफदार नेते शाहीर सचिन माळी यांनी महाकष्ट घेऊन हा अरणचा मेळावा यशस्वी केला, याबद्दल त्यांचे नाव ‘जात्यंतक’ चळवळीच्या इतिहासात निश्चितच नोंदले जाईल. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
या विषयाशी निगडीत अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर आपण पुढील बहुजननामात चर्चा करीत राहू........तो पर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 19 सप्टेंबर व प्रकाशनः 20 सप्टेंबर 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)