http://shrwandeore.blogspot.in/

Monday, May 18, 2020

110 BahujanNama AGMD 17May20 Daily Lokmanthan


बहुजननामा-110
अंगामाढो-1
-1-
न मिळालेल्या आमदारकी संदर्भात सध्या सोशल मिडियावर सुषमाताई अंधारे यांचे नाव बरेच गाजते आहे. लोकसभा-2019 च्या निवडणूकीत न मिळालेल्या कॉंग्रेसी तिकीटामुळे प्रवीणदादा गायकवाड यांचे नाव असेच गाजले होते. हाच संदर्भ अजून ताणला तर या दोघांच्या सोबतीने ऍड. सुरेश मानेसाहेब व प्रदिप ढोबळेसाहेबांचे नाव घेता येईल. म्हणून या बहुजननामाचे नाव आहे- ‘अंगामाढो’, अर्थात अंधारे, गायकवाड, माने व ढोबळे!

महाराष्ट्रील या चारही व्यक्तींबाबत एक साम्य आहे. या चारही जणांनी आपली कर्तबगारी आपल्या अंगभूत गुणांनी सिद्ध केलेली आहे. डॉ. सरेश माने आपल्या सुक्ष्म व सखोल अभ्यासातून घटनातज्ञ म्हणून ओळखले जातात. बहुजन समाज पक्षाचे एक देशपाळीवरचे नेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती. महाराष्ट्रात असे एकही सभागृह वा मैदान नसेल जेथे सुषमा अंधारे यांची मुलुख मैदान तोफ धडाडली नसेल. त्यांच्या मार्‍यातून भलेभले दिग्जज सुटलेले नाहीत. पवार-चव्हाणांपासून मोदि-फडणवीसपर्यंतचे राजकारणी त्यांच्या शाब्दिक मार्‍याने घायाळ झाले आहेत. सुषमाताई माईकसमोर स्टूलवर उभ्या राहिल्यात की, गजानन-साईबाबापासून ते गणपती-पार्वतीपर्यंतचे सर्व देवी-देवता आपापले देव पाण्यात घालून बसतात! त्यांचे आडवे-तिडवे ऑपरेशन झालेच समजा! स्वतःच्या वकृत्व शैलीतून करियर घडविणारी महाराष्ट्रातील ही पहिली महिला! प्रविण दादा गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेड स्थापन करून तमाम महाराष्ट्रातील आधुनिक पेशव्यांना अक्षरशः घाम फोडलेला आहे. पुण्यातील भांडारकर तोडले, संभाजी उद्यानातले गडकरी फोडले, लाल महालातला दादू उखडला अशा अनेक वादग्रस्त घटनांच्या मालिकेतून प्रवीणदादा सतत चर्चेत राहीलेले आहेत. या तिघांनी सामाजिक चळवळीतून आपली कर्तबगारी सिद्ध केली. अंगामाढो हे चार मणी मी एकाच माळेत घातले असले तरी त्यात प्रदिप ढोबळे या मण्याचा रंग वेगळा असल्याने त्यांच्याबद्दल मी नंतर लिहीणार आहे. आता आपण फक्त अंगामा या तिघांबद्दल चर्चा करणार आहोत. 
सामाजिक चळवळीतील कर्तबगारी सिद्ध झाल्यावर ती तेथेच थांबत नाही व रेंगाळतही नाही. नव्या दिशा, विस्तारलेले क्षितिज आणी गगनभरारी या कर्बगारीला खुणावत असतात.  परंतू येथून पुढचा प्रवास सामाजिक-राजकीय असतो. हा प्रवास तीन दिशात विभागलेला असतो. एक रस्ता आपल्याला नेऊ इच्छितो सामाजिक चळवळीच्या वैचारिक शिखरावर! आजवरच्या अभ्यासातून व अनुभवातून मार्गदर्शन करून चळवळीला वैचारिक दिशा देण्याची बुजुर्ग भुमिका वठविणे, या रस्त्याला अभिप्रेत असते. दुसरा रस्ता राजकिय महत्वाकांक्षेचा असतो. स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करा व सत्ताप्राप्ती करा, असे हा दुसरा मार्ग सुचवितो. आणी तिसरा मार्ग अत्यंत शॉर्टकट असतो. एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षाचे शेपूट पकडून विधानसभेत-लोकसभेत पोहोचणे!
नोकर भरती, सैन्य भरती, नाक्यावरची बिगारी भरती यांचे जसे वेगवेगळे नियम असतात, त्याचप्रमाणे राजकारणातील नेता-भरतीचेही वेगळे नियम असतात. भारतात जातीव्यवस्था असल्याने सगळ्याच भरती-प्रक्रियांमध्ये ‘जात’ फॅक्टर काम करतो. राजकारणात तर तो फारच प्रभावी असतो. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांचे गड-किल्ले आपापल्या जात-तटबंदीने सुरक्षित केलेले असतात. आपल्या गड-किल्यात नवीन व्यक्तीला भरती करून घेतांना सर्वात आधी जातीचा फॅक्टर विचारात घेतला जातो. कोणत्याही पक्षाची रचना ही गड-किल्ल्यासारखीच असते. पक्षातील बिगार-भरतीला तटबंदीच्या आत प्रवेश नसतो. सैन्यात जसे रसद ने-आण करणारे ‘बाजार-बुणगे’ असतात, तसे पक्षातही असतात. या बाजार-बुणग्यांना किल्ल्यात प्रवेश असतो, परंतू दरबारात प्रवेश नसतो. काही सरदारांना दरबारात प्रवेश असतो, मात्र खलबत-खान्यात प्रवेश नसतो.
सामाजिक चळवळीत प्रबोधन व संघटनचे काम एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर राजकीय वेध लागतात. स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणे व सत्ता हस्तगत करणे, हे फार खडतर काम असते. शतकात एखादाच ‘कांशिराम वा लालु-मुलायम’ अवतार घेतो व उच्चजातीयांची तटबंदी तोडत थेट दरबारात घुसून सिंहासनावर कब्जा मिळवितो. लालु-मुलायम व कांशिरामसाहेबांचे अनुकरण करीत स्वतंत्र पक्ष स्थापण करण्याचा प्रयत्न नंतर अनेकांनी केला. मात्र जेथपर्यंत लालू-मुलायम-कांशिराम पोहोचलेत तेथपर्यंत नंतर कोणीही पोहोचू शकलेले नाहीत. लालू-मुलायम-कांशिराम हे आपापल्या एकाच राज्यात अडकून उध्वस्त का झालेत, दिल्लीपर्यंत का पोहोचले नाहीत, या सर्व प्रश्नांचा उहापोह करण्याची ही जागा नाही. तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. फक्त एकच हिंट देऊन ठेवतो कि या देशाचे नियंते-भाग्यविधाते हे कर्मठ-ब्राह्मणावादी आहेत व ते जिथपर्यंत जाण्याची परवानगी देतात, तिथपर्यंतच तुम्ही पोहोचतात. त्यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण-रेखा’ ओलांडण्याचा विचार जरी तुमच्या डोक्यात आला तरी, तुम्ही भस्म होतात.
आज बहुतेक सर्वच स्वतंत्र राजकीय महत्वाकांक्षी नेते प्रस्थापित उच्चजातींच्या पक्षांना शरण गेलेले आहेत व त्यांच्या ओसरीवर विसावलेले आहेत. हा सर्व अनुभव बघता अंगामा नेत्यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दुसरा खडतर मार्ग न स्वीकारता तिसरा शॉर्टकट रस्ता पकडला. आता आपण राजकीय पक्षाच्या भरती-प्रक्रियेकडे येऊ! लोकशाहीचा डोलारा स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन खांबांवर उभा आहे व त्याला जागतिक मान्यता पावलेले मानवी मुल्य समजले जाते. व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक-वांशिक समता व सर्वधर्मसमभावाची बंधुता ज्या देशात नांदते, तोच देश लोकशाही-प्रधान देश समजला जातो व त्या देशालाच जागतिक महासत्तांची मान्यता मिळते. अशी मान्यता मिळविण्यासाठी त्या देशाला लिखित संविधान आवश्यक असते. मोकळ्या व सुरक्षित वातावरणात निवडणूका व सर्व समाजघटकांना समावून घेणारे राजकीय पक्ष असावे लागतात. अर्थात हा केवळ जागतिक मान्यतेचा प्रश्न नाही! तिसर्‍या जगातील विकसनशिल देशांमध्ये राजकीय जागृती वाढत असल्याने त्या मुल्यांचे पालन करणे ही बहुतेक सर्वच देशांची व त्यातील राजकीय पक्षांची अपरिहार्यता झालेली आहे. त्याशिवाय त्या पक्षांना सत्ता हस्तगत करताही येत नाही. हुकूमशाही असलेल्या देशातही जनतेचा हिंसक उठाव होऊ नये म्हणून कमी-अधिक प्रमाणात ही लोकशाही मुल्ये स्वीकारावी लागतात. भारतातलेच एक उदाहरण देतो. भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर जनसंघ नावाचा एक पक्ष स्थापन झाला. जनसंघ हा सुरूवातीपासून ‘‘वाण्या-बामणांचा पक्ष’’ म्हणून ओळखला जात होता. हा पक्ष उघडपणे जागतिक हुकूमशहा असलेल्या हिटलरला आदर्श मानतो. जनसंघाचे ध्येय, धोरण व उद्देश ‘नाझी’ पक्षासारखेच आहे. त्यामुळे या पक्षाला भारतात सत्ता मिळणे दूरच, 2-4 नगरसेवकही निवडून आणणे शक्य नव्हते. जेव्हा हा जनसंघ लोकशाही मूल्ये असलेल्या जनता पक्षात विलीन झाला, तेव्हाच त्याचे खासदार निवडून आलेत व सत्तेत सहभागही मिळाला.
हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की, सर्वच राजकीय पक्षांना आपला मुखवटा पुरोगामी ठेवावा लागतो. त्यासाठी हे पक्ष अधून-मधून आपल्या पक्षात पुरोगामी कार्यकर्त्यांची ‘भरती’ करीत असतात. बाबा आढावांनी त्यांच्या चळवळीत तयार केलेले काही भटके-विमुक्त कार्यकर्ते शरद पवारांनी कॉंग्रेस पक्षात भरती करून घेतलेत. अनेक दलित नेते व ओबीसी नेते मतांची रसद पुरविण्यासाठी पक्षात भरती केलेले आहेत. राजकीय पक्षातील सत्ताप्राप्तीची लढाई जेव्हा अटी-तटीची होते, तेव्हा सामाजिक चळवळीतील काही कर्तबगार कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे भाव वधारतात. या पार्श्वभूमीवर अंगामा यांचे राजकीय महत्वाकांक्षा प्रकरण व प्रस्थापित सत्तांकाक्षी पक्षांशी त्यांची जवळीकता बघीतली पाहिजे.
अंगामा यांनी 2019 च्या लोकसभा-विधानसभा निवडणूकीत स्वतःचे कमावलेले सर्व करियर पणाला लावून कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षासाठी खर्च केले. प्रवीणदादा यांनी स्वतःचे (संभाजी ब्रिगेड पक्ष व शेकाप हे) राजकीय पक्ष गुंडाळून कॉंग्रेस पक्षाचे तिकीट मागीतले. मानेसाहेबांनी सुद्धा स्वतःचा राजकीय पक्ष, त्याचा झेंडा व चिन्ह वगैरे गुंडाळून ठेवले व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर-चिन्हावर निवडणूक लढविली. सुषमाताईंनी आपली कमावलेली ईमेज पणाला लावली, आपली ब्राह्मण-मराठाविरोधी भूमिका सोडून देत राष्ट्रवादी पक्षाचा झंझावाती प्रचार केला. अंगामा या तिघांच्या पुरोगामित्वाचा फायदा निश्चितच कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला झाला आहे. आज हे पक्ष सत्तेत सहभागी आहेत. त्याचे थोडेतरी श्रेय या तिघा नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेचा थोडाफार लाभ मोबदल्यात मिळण्याची अपेक्षा ठेवणे गैर नाही, त्यांचा तो हक्कच होता व आहे. विधान परिषदेची आमदारकी या तिघांना मिळणे अपेक्षित होती. सोशल मिडियात तशी चर्चाही रंगली होती. मात्र ती तिघांनाही मिळाली नाही. ती का मिळाली नाही याची कारणमिमांसा आपण बहुजननामाच्या पुढील 111 व्या भागात करू या!
तोपर्य जयजोती जयभीम! सत्य की जय हो!
(लेखनः 16 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 17मे20 

लेखकः- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 270
Blog ब्लॉग https://shrwandeore.blogspot.in/                  

Links for this article to read text file………………..




Sunday, May 10, 2020

109 BahujanNama Pravah 10May20, Daily Lokmanthan


बहुजननामा-109
एकदिक्प्रवाही कुंठीतता व बहुदिक्प्रवाही मुक्तता
-1-
कॉम्रेड सतीश जोशी यांनी जातीअंतासाठी काय कार्यक्रम असू शकतो, असा सवाल करणारी व त्यावर सूचना मागविणारी दोन ओळींची एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्याला आता किमान दहा दिवस झाले असतील. त्यावर चर्चा करणार्‍या 4 कॉमेंट्स आल्यात आणी चर्चा थांबली. जात्यंतक महापुरूषांवर कोणतीही एक पोस्ट टाका, त्यावर 5 मिनिटात 15 कॉमेंट्स येतील. गेल्या आठवड्यात मी महामानव गौतम बुद्धांवर एक पोस्ट टाकली. कॉमेंट्सची संख्या नव्वदीच्या पार गेली! त्यात भावनिक उत्तेजनातून आलेल्या धार्मिक पोस्ट सर्वाधिक होत्या. 3-4 पोस्ट मूळ मुद्द्यांवर चर्चा करणार्‍या होत्या! तोच मुद्दा घेऊन त्याच पद्धतीची एक पोस्ट मी मार्क्सवादावर टाकली. 4 कॉमेंट्सच्या पलिकडे चर्चा अजूनही गेलेली नाही.
हे सर्व सांगण्याचा उद्देश हा आहे की, आपल्या बहुजन समाजाचा वैचारिक बुद्ध्यांक नेमका किती व कसा आहे, हे समजून यावे. अर्थात फेसबुकवरील चर्चा एकमेव बुद्ध्यांक ठरविणारी कसोटी नाही. सर्व भारतीय महापुरूषांवर अनेक ग्रंथ, पुस्तके, लेख प्रकाशित होत असतात. त्यांची संख्या भारतीय विचार-क्षेत्रासाठी गौरवास्पद आहे. परंतू त्यांचे वाचन, त्यांची समिक्षा व त्यावरील चर्चा इतकी सिमित असते की, ती नसल्यातच जमा होते. याबाबत फेसबुकचे एक वैशिष्य नोंदवावे लागेल. फेसबुकवर व्यापक वैचारिक चर्चा होऊन प्रबोधनाचा ‘रेनैसन्स मुव्हमेंटचा दर्जा’ आपण गाठू शकतो! मात्र तो दर्जा आपण गठू शकत नाही, कारण आपण अजूनही पुरोगामित्वाच्या नावाखाली व्यक्तीपूजक आहोत, कट्टर धार्मिक आहोत व कट्टर जात-हितसंबंधी आहोत. म्हणजे ज्या सरंजामी मूल्यांचा विनाश करण्यासाठी युरोपमध्ये ‘यशस्वी’ रेनैसन्स मुव्हमेंट (Renaissance Movement) झाली, तीच सरंजामी मुल्ये आम्ही आमच्या ह्रदयाशी लावून धरली असल्याने वैचारिक चर्चा होऊच शकत नाही. कारण वैचारिक चर्चा घडवून आणणारा आमचा मेंदू आजही मध्ययुगीन अंधारातच वावरत आहे. आमच्या जातीचा महापुरूष, आमच्या धर्माचा महापुरूष हाच एकमेव सत्याचा प्रकाश देतो व तोच एकटा जगातले सर्व प्रश्न सोडवू शकतो, हा एकांगी एकदिक्प्रवाहवाद बहुजनसमाजाचा बुद्यांक वाढू देत नाही. जगातील ज्या ज्या राष्ट्रांनी वा ज्या ज्या कम्युनिटिजनी प्रगती केली आहे, त्याला कारण त्यांचा वाढता बुद्ध्यांक आहे. बुद्धयांक कुंठीत झाला की, नवे विचार, नवे नियोजन, नव्या योजना यांचा मार्ग अवरूद्ध होतो व जुनेच विचार, जुने नियोजन, जुन्या योजना व जुनी व्यवस्था कालबाह्य होऊनही आपल्या बोकांडी बसून आपल्याला ‘मागे’ नेते.
-2-
उदाहरण दिल्याशिवाय आमच्या बहुजनांना सोप्या-सोप्या गोष्टीही समजत नाहीत, कारण लो बुद्ध्यांक! म्हणून उदाहरण देतो.... युरोपमध्ये रेनेसन्स मुव्हमेंट झाली. या मुव्हमेंटचा मुख्य उद्देश जनतेच्या मनात बिंबलेली सरंजामी मूल्ये नष्ट करून त्या जागी नवी भांडवली मूल्ये रूजविणे. युरोपमधील तत्कालीन भांडवलदार वर्गाला आपल्या स्वतःच्या वर्गीय हितसंबंधांना व्यापक व मजबूत करण्यासाठी त्यांना या रेनेसन्स मुव्हमेंटचे नेतृत्व करावे लागले. युरोपातील भांडवलदार वर्गाने राजकीय क्रांती करून राजकीय सत्ता हस्तगत केली, मात्र जनतेने आपल्याला केवळ राज्यकर्ता म्हणून नव्हे तर आपली नवी भांडवली मुल्येही स्वीकारली पाहिजेत, तरच भांडवली लोकशाही क्रांती होईल व आपण कायमचे सत्ताधारी होऊ! भांडवलदांचे प्रतिनिधी वा त्यांचे राजकीय पक्ष केवळ ‘राज्यकर्ता’ असते, तर सरंजामी राजे त्यांची सत्ता केव्हाही उलथून टाकू शकतात व नवी भांडवली व्यवस्था फेकून देऊ शकतात. राज्यकर्त्याला ‘सत्ताधारी’ व्हायचे असेल तर, त्याला सांस्कृतिक क्रांती किंवा प्रतिक्रांती करावीच लागते, याचे भान युरोपियन भांडवलदारांना होते. म्हणून त्यांनी तत्कालीन वैचारिक-सांस्कृतिक रेनेसन्स मुव्हमेंटला राज्य-सत्तेचा पूर्ण सपोर्ट दिला व तेथे ती क्रांती यशस्वी झाली. भांडवली लोकशाही क्रांती यशस्वी झाल्यामुळे युरोपमधील अनेक राष्ट्रे प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेत व भारतासारखे अनेक मागासलेले देश तिसर्‍या जगात  राहून ‘मांडलिक’ बनलेत. रेनेसन्स मुव्हमेंटची दोन तत्वे आहेत. एक म्हणजे मानवी मेंदूला एकदिक्प्रवाहाच्या कैदेतून मुक्त करणे व दुसरे, त्याला अनेकदिक्प्रवाहाच्या मार्गी लावणे.
बदलत्या काळातील व्यवहार, त्यातून निर्माण होणार्‍या समस्या व त्यांची सोडवणून करून पुढे जाण्यासाठी माणासाच्या मेंदूला बहुदिक्प्रवाही व्हावेच लागते. युरापातील सरंजामशाहीच्या काळातील सर्व समस्यांची उत्तरे चर्चकडे असायची. चर्च जे सोल्युशन देईल, ते मनोभावे स्वीकारून लोक जीवन जगत होते. प्रसुतिवेदनाशमक (गुंगीचे) औषध देऊन बाळाला जन्म देणे निषिद्ध आहे, कारण ते प्रभूच्या ईच्छेविरूद्ध आहे. या एकदिक्प्रवाही विचारामुळे अनेक स्त्रिया प्रसुतिवेदना असह्य झाल्यामुळे मेल्यात! परंतू या पेक्षा वेगळे सोल्युशन असू शकते, असा विचारही तत्कालीन युरोपियन माणूस करू शकत नव्हता. मात्र रेनेसन्स मुव्हमेंटमुळे त्याचा मेंदू चर्चच्या गुलामीतून मूक्त झाला व त्याने प्रसुतिवेदनाशमक औषधाचा स्वीकार करून आपल्या स्त्रियांचे बाळंतपण सुखकर केले. वेदनाशमक औषधी कंपन्यांचा माल (प्रॉडक्ट) बाजारात मोठ्या प्रमाणात खपायला लागला, त्यांचा नफा वाढला व व्यापारही वाढला. या वाढलेल्या नफ्यातून त्यांनी काही हिस्सा रेनेसन्स मुव्हमेंटच्या कार्यकर्त्यांना दान दिला. अशा अनेक भांडवलदारी कंपन्यांनी आर्थिक मदत देऊन रेनेसन्स मुव्हमेंट वाढविली व मजबूत केली. भांडवली सत्ताधार्‍यांनी त्या मुव्हमेंटला राजकीय आश्रय दिला व भांडवली कारखानदारांनी आर्थिक आश्रय दिला. त्यामुळे युरोपममधील जनतेचा मेंदू एकदिक्प्रवाहातून मुक्त होऊन बहुदिक्प्रवाही विचार करून लागला. विचारवंत जनतेच्या समस्यांचे व घडलेल्या घटनांचे विश्लेषण करण्यासाठी बायबलच्या बाहेर जाऊन अभ्यास करू लागलेत. पृथ्वी सपाट आहे की गोल, याचे उत्तर बायबलच्या बाहेर शोधू लागलेत. आकाशातील वीज देवाच्या ओरडण्यातून नाही, तर ढगांच्या घर्षणातून निर्माण होते व तीला विशिष्ट तारेतून प्रवाहीत केले तर ती आपली गुलाम होते, प्रकाश देते व उर्जाही देते. या सर्व बहुदिक्प्रवाही विचारातून युरोपात शास्त्रज्ञ जन्मण्याची लाट पसरली, नवनवीन हजारो शोध रोज लागू लागलेत, त्यातून औद्योगिक क्रांती झाली, भांडवली लोकशाही क्रांती झाली. परिणामी ते सर्व देश विकसित झालेत.
जे युरोपमध्ये झाले तेच रशिया, चीन व जपानमध्ये झाले. चीनमधील बुद्धिस्ट नेते महाराष्ट्रातील बुद्धिस्टांप्रमाणे ‘कट्टर’ राहिले असते, तर काय चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली असती व तो देश आज महासत्ता झाला असता? जपानमधील बुद्धिस्ट नेते महाराष्ट्रातील बुद्धिस्टांप्रमाणे ‘कट्टर धार्मिक’ असते तर, काय जपान भांडवली राष्ट्रवादाने प्रेरित होऊन अणूबॉम्ब-संकटातून उभा राहिला असता? आज जपानने जी प्रगती साध्य केली आहे, ती बुद्धिस्ट म्हणून कि, भांडवली राष्ट्रवादी म्हणून? तीच बाब रशियाची! दुसर्‍या महायुद्धानंतरच बहुतेक सर्व राष्ट्रांच्या विकासाचा आलेख सुरू होतो. ज्या देशातील बहुसंख्य जनतेने वा त्यांच्या सत्ताधारी नेत्यांनी बहुदिक्प्रवाही विचार वा तत्वज्ञान स्वीकारले तेच बदलत्या काळाची आव्हाने पेलू शकलेत! चीनमध्ये ‘‘कार्ल मार्क्स की बुद्ध’’ असा वादविवाद झडलाही असेल, मात्र या वादावादीला त्यांनी कट्टरता चिकटू दिली नाही. चीनी जनतेची ‘बुद्धपूजा’ व ‘धम्मनिष्ठा’ त्यांच्या मार्क्सवादी क्रांतीच्या रस्त्यात कधीच आडवी आली नाही. चीनमध्ये साम्यवादी क्रांतीनंतर हुकूमशाहीची कट्टरता अपरिहार्यपणे वाढत गेली. परंतू माओने नंतर ‘शंभर फुले फुलू द्या’ ही टॅगलाइन देऊन बहुदिक्प्रवाही सांस्कृतिक क्रांती घडवून आणली. संपूर्ण चीन घुसळून काढणार्‍या या क्रांतीने अवरूद्ध झालेल्या साम्यवादी क्रांतीची वाट मोकळी केली.
-3-
भारतात मात्र सर्वत्र कट्टर-ग्रस्तता दिसते. वैदिक, हिंदू, बौद्ध, जैन, लिंगायत, नाथ, शाक्त या सर्व अ-ब्राह्मणी व ब्राह्मणी धर्मांमध्ये कट्टरतेची शर्यत चालू आहे. मार्क्सवाद, समाजवाद, फुले-वाद, आंबेडकरवाद यांच्यातील वादावादी ‘कोण किती कट्टर आहे’ यावरच चालू असते. ही कट्टरतेची शर्यत तोच जिंकेल जो सर्वात जास्त कट्टर आहे. कट्टरतेच्या बाबतीत वैदिक ब्राह्मणांचा हात कोणीच धरू शकत नाहीत. त्यामुळे ते ही शर्यत सहजपणे जिंकलेत. परिणामी आज आपल्या देशाची सत्ता वैदिक ब्राह्मणांच्या हातात गेलेली आहे व ते आपल्या कट्टर ब्राह्मणी धर्माच्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार चालवित आहेत. वैदिक धर्माचे ब्राह्मण लवचिक आहेत, पण तरीही ते तुटत नाहीत, ते व्यवहारात तडजोड करतील पण तत्वज्ञानात तडजोड करणार नाहीत, ते सतत डावपेंच बदलत राहतील पण धोरणात स्थीर राहतील, ते झुकतील पण मोडणार नाहीत, ते खोटं बोलतील पण खोट्याला खरं करूनच दाखवतील! अशा या बहुदिक्प्रवाही ब्राह्मणवादाला तुम्ही कसे रोखू शकणार आहात, तुम्ही तर आपल्या डबक्यालाच जग समजतात!
कॉ. सतिश जोशी यांनी आवाहन केल्याप्रमाणे जातीअंताचा कार्यक्रम व्यापक व बहुदिक्प्रहाही चर्चा केल्याशिवाय कसा तयार होणार? केवळ जातीअंत नाही तर ‘जात-वर्ग-स्त्रीदास्य अंताचा कार्यक्रम हवा आहे. कॉ. जोशींच्या या पोस्टवर चारच लोक फिरकलेत, कारण जात-वर्गअंताच्या बहुदिक्प्रवाही चर्चेत आपल्या जातीचा महापुरूष, आपल्या धर्माचा महापुरूष, आपला ईझम लुळा पडेल की काय, अशी रास्त भीती सर्वांच्या मनात घर करून बसली असल्याने कृतीकार्यक्रमावर बहुदिक्प्रवाही चर्चा करायला सर्वच घाबरतात.
     चला! जयजोती जयभीमचा कट्टर नमाज अदा करतो व ‘‘सत्य की जय हो’’ चा जयघोष करून पुढच्या बहुजननामात भेटण्याची अपेक्षा धरतो.
       (लेखनः 9 मे 2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 10मे20)
    ------- प्रा. श्रावण देवरे
   Mobile – 88 301 270                     

 Blog ब्लॉग:- https://shrwandeore.blogspot.in/ 


Prof Shrawan Deore on Contemptuousness of Chatrapati Shahu Maharaj by Fadanvis, Ex CM of Maharashtra


Sunday, April 12, 2020

108 BahujanNama Change 12 April 20


बहुजननामा-108
करोनाः आमूलाग्र बदलाची संधी!
-1-
      मानव प्राणी हा अत्यंत चिवटपणे परंपराप्रिय असतो. नवी परंपरा मान्यताप्राप्त होत नाही, तोवर तो जुनी परंपरा त्यागत नाही. त्यालाच अलिकडे काही लोक धार्मिक कट्टरता वगैरे म्हणतात. खरे म्हणजे परंपराप्रिय असणे हे मानवाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे त्या कट्टरतेचा धर्माशी काहीही संबध नाही. महाभारत युद्धात मृत्यु पावत असलेला भिष्म आपला प्राण उत्तरायणसाठी 58 दिवस रोखून ठेवतो, कारण त्याला नरक टाळून स्वर्गात जायचे असते. साक्षात मृत्युच्या दारात असतांनाही लोक आपल्या श्रद्धा, सण-उत्सव व यात्रा-मेळावे सोडायला तयार नाहीत, हे करोनाच्या जीवघेण्या संकटानेही सिद्ध केले आहे. त्याबाबत सर्वधर्मसमभावच म्हटले पाहिजे.
        परंतू कोणतीही नियमित सामुदायिक कृती ही परंपरा बनण्याच्या प्रक्रियेत असतेच! जोपर्यंत ती वैचारिक पाळीवर असते तो पर्यंत माणूस तीच्यापासून प्रेरणा घेत असतो. आपल्या समुदायाचे वेगळेपण त्यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. कोणतीही नियमित कृती प्रथा-परंपरा बनत असतांना ती वैचारिक व प्रतिकात्मक अशा दोन्ही आघाडीवर सातत्य ठेवत असेल तरच त्यातून येणार्‍या पुरोगामी कट्टरतेमुळे काही चांगले नवे बदल घडून येतात व समाज पुढील नव्या उच्चतर पातळीवर जातो. परंतू जर ती कृती वैचारिकता गमावून केवळ प्रतिकात्मक राहात असेल तर त्यातून येणारी कट्टरता प्रतिगामी बनते व समाज नवे मिळविलेलेही गमावतो.
          मरकज, ईस्टर, रामनवमी, कृष्णाष्टमी, यात्रा-जत्रा व शब्बे बारात वाले हे जेवढे कट्टर आहेत तेवढेच कट्टर फुलेआंबेडकरवादीपण आहेत. मात्र दोघात एक महत्वाचा फरक आहे. या दोघांच्या कट्टरतेत पुरोगामी व प्रतिगामीची विभागणी-रेषा आहे. करोनाच्या काळात बहुतेक सर्वच पुरोगाम्यांनी जाहीर आवाहन केले आहे की, 11 एप्रिल व 14 एप्रिल रोजी घरात राहूनच फुले आंबेडकर जयंती साजरी करायची आहे. त्याला अजून कुठेही विरोध झालेला नाही, उलट वेगळे वेगळे उपक्रम घरातूनच राबविले तरी ते समुदायिकपणाच्या अभावाची भरपाई करणारे आहेत. त्यापैकी काही उपक्रम पुढीलप्रमाणे- 1) 11 एप्रिल व 14 एप्रिल रोजी घराबाहेर पिवळ्या व निळ्या रंगाची गुढी उभारून फुले आंबेडकरांना अभिवादन करता येईल.
2)
घरातील फुले आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती वा दिवा लावून जयंती साजरा करा.
3)
फुले आंबेडकरांच्या ग्रंथांचे वाचन करून जयंती साजरा करता येते.
                              -2-
       असे अनेक कार्यक्रम सूचविले जात असतांना फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठाचे एक परीक्षाप्रमुख राजू कांबळे (मुंबई) यांनी 5 एप्रिल रोजी मला फोनवरून विनंती केली की, ‘‘तुमचे बरेचसे कार्यक्रम करोनामुळे रद्द झालेले आहेत. आता त्याला पर्याय म्हणून 11 एप्रिल व 14 एप्रिल रोजी आपण किमान एक तासाचे व्याख्यान फेसबुकवर लाईव्ह द्या, महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी कार्यकर्ते व श्रोते त्या व्याख्यानाचा लाभ घेतील.’’ त्यावर मी विचार करतो’, असे फोनवर सांगीतले. गेल्या 30-35 वर्षांपासून जे काम अथकपणे करत आहोत, तेच व्याख्याने देण्याचे काम करोना काळातही करावे, हे फारसे पटत नव्हते. नवे काहीतरी करावे जेणेकरून लोकांचाही त्यात सहभाग असावा. त्याच दिवशी एरंडोल-जळगावचे निलेश देवरे व लातूरचे दत्ता माळी यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणेसंबंधात माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी चंद्रपूरचे कार्यकर्ते हरिदास गौरकर व अजित साव यांनी माझ्याशी फोनवरून निबंध स्पर्धा आयोजन करण्याबद्दल चर्चा केली. मला हे दोन्ही कार्यक्रम आवडलेत. याच कार्यक्रमांना सक्रिय मदत करून राज्यस्तरावर नेले तर आपली व लोकांचीही करोना काळातील बळजबरीची सुट्टी सार्थकी लागेल व घरात बसूनच फुले आंबेडकर जयंती साजरा करण्याचा आनंदही घेता येईल.
        त्या पैकी एक वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम मी व माझ्या मित्र-कार्यकर्त्यांनी या आधीच सोशल मिडियावरून व्हायरल केलेला आहे. 15 एप्रिलपासून मी निबंध स्पर्धेचाही कार्यक्रम जाहीर करणार आहे. आपला मूळ विषय आहे, प्रथा परंपरा साजरा करण्याचा व जतन करण्याचा! रामजन्मोत्सव, कृष्णाष्टमी, बळीराजा श्राद्धपक्ष, खंडोबा, जोतिबा, नवरात्र, कूलमातांच्या यात्रा वगैरे हे सर्व सण-उत्सवांच्या परंपरा व फुले आंबेडकरांच्या जयंती-स्मृतीदिनाच्या परंपरा यात एक मोठी तफावत हीच आहे की, फुलेआंबेडकरांच्या नावाने होणारे कार्यक्रम अजूनही वैचारिक पातळी जपून आहेत, त्यांचे अजून दैवतीकरण झालेले नाही. आणी म्हणूनच करोनाच्या संकटातही कट्टरता कायम ठेवून सुरक्षितपणे सण-उत्सव साजरा करण्याचा आदर्श घालून देता येतो. 
          मानव समाजाच्या सांस्कृतिक प्रवाहात अनेक सार्वत्रिक उलथा-पालथी झालेल्या आहेत. कॉलरा, पटकी, प्लेग सारख्या असंख्य वेगवेगळ्या साथीच्या रोगांनी जगाच्या पाठीवर अनेकवेळा धुमाकूळ घातलेला आहे. त्यावर मात करीत माणूस आपले अस्तित्व आपल्या संस्कृतीसह अखंडपणे प्रवाही व वर्धिष्णू ठेवीत आहे. आधुनिक काळातही पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध ही मानवनिर्मित जागतिक संकटे आलीत, या संकटांना संधी समजून अनेक राष्ट्रांनी परिश्रम घेऊन प्रगतीचे शखर गाठले व महासत्ता म्हणून नव्याने उदयास आलेत. करोना हे दोन्ही महायुद्धांपेक्षा जास्त गंभीर व जास्त परिणामकारक आहे. या महायुद्धात अमेरिका, फ्रान्ससारख्या जागतिक महासत्ता करोनासमोर सपशेल चीत झाल्यात, तेथे भारतासारखा महाकाय अविकसित देश मात्र शर्थीने लढतो आहे व करोनाला नियंत्रित करतो आहे. तुर्कमेनिस्थानसारखा छोट्या व अत्यंत गरीब देशात आजही शून्य करोनाग्रस्त आहेत व त्यांनी एक दिवसाचाही लॉकडाऊन पाळला नाही. आजही तेथे सर्व सण-उत्सव प्रचंड उत्साहत लाखोंच्या संख्येने एकत्र येत साजरा करीत आहेत. कारण त्यांनी करोनाशी दोन हात करतांना जे उपाय केलेत ते उपाय इतर कोणताही देश अमलात आणू शकला नाही.
          असे म्हणतात की आपणच पैदा केलेले पोरगे आपल्या जीवावर उठते. चीनने करोना व्हायरसचे सत्य दोन महिने दडपून ठेवले, ते का? अमेरिकेने अजूनही अधिकृतपणे लॉकडाऊन जाहीर केलेला नाही, का? बहुतेक सर्वच प्रगत देश करोनाग्रस्त होत असतांना कडक उपाय योजना लागू करायला घाबरत होते, का? कारण आपणच पैदा केलेल्या पोराला एकूलता एक लाडका म्हणून आपण त्याला वाढवतो, आपल्या म्हातारपणी आपलं पोरगं आपल्याला सुखात ठेवील, या आशेने आपण नको ते अनैतिक व अवैध कृत्ये करीत त्याला खूश करण्याचा प्रयत्न करतो व शेवटी पोरगं बिघडतं, गुन्हेगार बनतं व आपल्याच जन्मदात्यांचा खून करतो. जगातील मूठभर भांडवलदारांनी जी अर्थव्यवस्था देशपातळीवर व नंतर जागतिक पातळीवर (LPG) उभी केलेली आहे, ती जगविण्यासाठी, वाढविण्यासाठी व वाचविण्यासाठी महायुद्धे लादली जातात. करोनासारख्या जागतिक संकटातही ते अमानवीपणे वागतात. अमेरिकेत एक लाख लोक मेलेत तरी काही हरकत नाही, असे निवेदन करणारे ट्रम्फ जागतिक साम्राज्यवादाच्या क्रूरतेचे खरेखूरे प्रतिक ठरतात.
          भांडवल श्रेष्ठ, श्रम कनिष्ठ, भांडवलदार हेच देशाचा विकास करतात, श्रमिक मात्र नेहमीच आंदोलने करून विकासाला अढथळा आणतात. धरण बांधणारे विकासपूत्र आणी धरणग्रस्त हे विकासाला अपशकून ठरतात. पूजापाठसारखी थोतांडे करून पोट भरणारे भिखारी भूदेवम्हणून मान्यता पावतात व कष्ट करून दुसर्‍्यांचीही पोटे भरणारे शूद्रादिअतिशूद्र हे अपवित्र-अस्पृश्यठरतात! अशा कृत्रिम व अनैतिक सिद्धांतांवर उभी असलेली ऐतखाऊंची वर्ग-जातव्यवस्था टिकून राहावी म्हणून देश अनेकवेळा धोक्यात टाकला गेला व आजही टाकला जात आहे.
करोना संकट हे देशाबाहेरून आणले गेले आहे. कोणाच्या प्रेमापोटी? अर्थातच आपल्या लाडक्या पूत्रांसाठी व नातेवाईकांच्या प्रेमापोटी! परकीय देशात काहीही संकट आले की हे लगेच आपल्या पोरा-बाळांसाठी विमाने पाठवितात व त्यांना आपल्या देशात घेऊन येतात. कारण ही लाडकी मुलं डॉलर-पौंड पाठवीत असतात. त्यांच्यासाठी आख्खा देश करोनाग्रस्त झाला तरी चालेल, परंतू आपले पूत्रप्रेम जागविले पाहिजे.
                               -3-
         कोणतेही देशव्यापी अथवा जागतिक संकट आले की समाजातला प्रत्येक घटक त्यातून वाट काढीत आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करतो. आपल्याच देशाचे उदाहरण द्यायचे तर वाढत्या सजातीय असंतोषातून आपले उच्चजातीय राजकारण टिकवून ठेवण्यासाठी ईव्हीएम आणण्यात आलं. जातीय लुटीची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी टॅक्स सिस्टीम दिल्ली-केंद्रीत (GST) करण्यात आली. आपली लूटीची व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी कृत्रिम उपाय-योजना करण्यातून तब्ब्येत अधिकच बिघडत गेली व त्यावर उपाय म्हणून नोटबंदीचा जालीम उपाय योजला गेला. तोही जातीय लूटीचाच एक प्रकार सिद्ध झाल्याने अर्थव्यवस्था डबघाईस गेली. रिझर्व बँकेचा रिझर्व फंडही वापरून झालेला आहे. त्यात करोना संकट आलं आणी त्याला एक संधी समजून आता आर्थिक आणीबाणी लादण्याचा घाट घातला जात आहे. ईव्हीएम आणून राजकीय आणीबाणी लादली गेलेली आहे, हिंदू-मुस्लीम धृवीकरणातून समाजिक आणीबाणी सुरूच आहे, त्यात आता आर्थिक आणीबाणी आणून देशातील SC+ST+OBC च्या 85 टक्के जनतेला देशोधडीला लावण्याचे काम सुरू होणार आहे. राजकीय आणीबाणी+सामाजिक आणीबाणी+आर्थिक आणीबाणी याचा अर्थ देशपातळीवरची पेशवाई भक्कम करणे होय!
           करोना संकटाला एक संधी म्हणून उच्चजातीय वापर करू शकतात तर आपण शूद्रादिअतिशूद्र का करू शकत नाहीत? ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य या शेठजी+भटजी+लाटजी विरोधात लढा उभारण्यासाठी SC+ST+OBCयांनी व श्रमिकवर्गाने एकत्रितपणे विचार केला पाहीजे. समोरून जोरात वाहन (संकट) येत असेल तर कुत्रं-मांजरही जीव वाचविण्यासाठी उडी मारून रस्ता बदलतो. आपण तर जीते-जागती माणसं, त्यात मार्क्सवादी+फुलेवादी+आंबेडकरवादी! आपल्यालाही थोडंफार नव्हे आमूलाग्रबदललंच पाहिजे! आपले सिद्धांत, आपले महापुरूष व आतापर्यंतचे कृती-कार्यक्रम मूर्ती-रूढी-परंपरा स्वरूपात प्रतिगामी प्रतिके बनण्याआधी त्यात क्रांतीकारी बदल केला पाहिजे.
        तसा आमूलाग्र बदल करण्याची बुद्धी या फुले आंबेडकर जयंतीपर्वात सर्वांना               यावी, अशी अपेक्षा करुन जयजोती जयभीमचा कडक सॅल्युट मारतो व सत्य की जय हो चा घोष करून निरोप घेतो.
             (लेखनः 11 एप्रिल 2020)
                                                                               ------ प्रा. श्रावण देवरे
                                                                              Mobile – 88 301 270                      
                              Blog ब्लॉग  https://shrwandeore.blogspot.in/                             Email- s.deore2012@gmail.com


Saturday, April 4, 2020

107 BahujanNama Chemical 5April20

बहुजननामा-107
करोनाः व्हेज, नॉनव्हेज आणी केमिकल लोच्या
-1-
        करोनाशी लढणार्‍या आरोग्य कर्मचारी अधिकार्‍यांना प्रत्यक्ष कृतीतून दिलासा देणारी आज देशात एकमेव व्यक्ती रतनजी टाटा आहेत. जी कामे शासनाने अत्यंत गांभीर्याने व वार्‍याच्या वेगाने केली पाहिजेत, ती सर्व कामे रतन टाटा करीत आहेत. हा माणूस केवळ प्रधानमंत्री निधीमध्ये पैसे देऊन 'धन्य' झाला नाही, तर आपली करोडो रुपये कमाईची फाईव्ह स्टारहॉटेल्स आरोग्य कर्मींना राहण्यासाठी देऊन टाकलेली आहेत. वास्तविक शासनाने स्वतःच पुढाकार घेऊन देशातील सर्व शासकीय व अशासकीय विश्रामगृहे,हॉटेल्स व वस्तीगृहे ताब्यात घेऊन तेथे प्रांतीय व परप्रांतीय कष्टकर्‍यांना ठेवता आले असते. पोलीस, डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचारी तसेच कोरोंटाइन केलेल्यांची राहण्याची व्यवस्था अशा हॉटेल्समध्ये करू शकले असते. कारण करोनाग्रस्तांच्या सहवासात राहणारे आरोग्य कर्मचारी व पोलीस आपली ड्युटी संपवून घरी जातात, तेव्हा त्या घरातील सदस्यांचेही जीवन धोक्यात येते. देशातील सर्व रजिस्टर्ड डॉक्टर्स व नर्सेसना अगदी सुरूवातीपासूनच अशा हॉटेल्स व वसतीगृहात ठेवले असते तर निश्चितच ते मानवतावादी ठरले असते. कारण या हॉटेल्समध्ये व होस्टेल्समध्ये जेवण्याची व राहण्याची उत्तम सोय आधीपासूनच असल्याने नवीन काही व्यवस्था करण्याची गरजही नव्हती. घरातच कोरोंटाइन केलेल्या व हातावर शिक्के मारलेल्यांना अशा होस्टेल्समध्ये ठेवले असते तर ते कुठे पळून जाण्याचीही शक्यता नव्हती. कारण तथे पोलीस बंदोबस्त ठेवता आला असता. परंतू जे रतन टाटा सारख्या एका व्यक्तीला सुचते ते शासनव्यवस्थेच्या नियंत्यांना सूचत नाही, असे कसे होऊ शकते?
-2-
         शासनव्यवस्थेचे प्रमुख असलेले प्रधानमंत्री आतापर्यंत देशाला 3 वेळा सामोरे आलेत, परंतू त्यांच्या एकाही भाषणात करोनाला नियंत्रित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय नव्हता. थाली ठोका, टाळी पिटा आणी आता अंधार करून दिवे लावा यासारख्या फालतू उपाययोजना वारंवार करायला लावणारे प्रधानमंत्री आजवर जगात कुठेच झाले नाहीत व पुढेही होऊ शकणार नाहीत. हे फक्त भारतातच घडू शकते कारण भारताची सर्वंकष सत्ता अशा 'एका' जातीच्या हातात गेली आहे, जी जात या देशाचे वाटोळे करण्यातच स्वतःचे 'अस्तित्व' पाहते. ही जात जेव्हा जेव्हा सत्तेवर येते, तेव्हा तेव्हा या देशाचे वाटोळे करण्यातच ती धन्यता मानीत आली आहे. त्यांनी या देशाची फाळणी खूप आधीपासूनच करून ठेवलेली आहे. आर्य-अनार्य, सूर-असूर, वैदिक-अवैदिक, ब्राह्मण- अब्राह्मण, अवर्ण-सवर्ण, हिंदू-मुस्लीम अशा अनेक सामाजिक विभागणीतून त्यांनी या देशाच्या धृवीकरणाची प्रक्रिया शतकांनुशतकांपासून सुरू ठेवलेली आहे. याला केमिकल लोच्या करणारी प्रक्रिया म्हणता येईल. अशा प्रकारे मेंदूंचा सामुदायिक रासायनिक लोच्या करणार्‍या प्रक्रियांमधून ते आज 'ब्राह्मण भारत' व 'अब्राह्मण भारत' बनवू शकलेले आहेत. अब्राह्मण भारत म्हणजे शूद्रादिअतिशूद्रांचा (SC+ST+OBC) भारत व ब्राह्मण भारत म्हणजे ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य यांचा ब्राह्मण-वैदिक भारत होय! ब्राह्मण भारतात ब्राह्मणांचे एकतर्फी निर्विवाद वर्चस्व असते व बाकीच्या जाती व व्यक्ती त्यांच्या-त्यांच्या जातीय व व्यक्तिगत हितसंबंधांना कायम ठेवीत व्यापक
ब्राह्मणी हितासाठी काम करीत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतलेली ही दोन राष्ट्रे प्रत्येक गावाच्या विभागणी सीमेपासून सुरू होतात. ही दोन्ही राष्ट्रे प्राचिन काळापासूनच शत्रू-राष्ट्रे म्हणून एकाच भूप्रदेशात नांदत आलेली आहेत, असेही बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात. जेव्हा सम्राट बळीराजा, जैन चंद्रगुप्त सम्राट, बौद्ध अशोक सम्राट, जैन-ओबीसी बिज्जल राजा, शाक्त ओबीसी शिवाजी-संभाजी-शाहू राजे, जातीयवादविरोधी व्हि.पी.सिंग, ओबीसीवादी देवेगौडा यांच्यासारखे राजे होतात, तेव्हा (SC+ST+OBC) भारत-राष्ट्राची समतावादी शासनव्यवस्था, समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था मजबूत होते. परिणामी ब्राह्मणांच्या विषमतावादी भारतराष्ट्राचे अस्तित्व धोक्यात येते. परंतू प्रदिर्घ सांस्कृतिक प्रति-क्रांतीतून ते आपल्या ब्राह्मण-भारत राष्ट्राला पुन्हा-पुन्हा जीवदान देण्यात यशस्वी होतात. तेव्हा या प्रतिक्रांतीतून ब्राह्मणी-वैदिकी राम, चाणक्य-शिष्य चंद्रगुप्त, ब्राह्मण पुश्यमित्र शृंग, ब्राह्मण-शशांक राजा, ब्राह्मण हेमाद्री पंडित, ब्राह्मण नेहरू घराणे, ब्राह्मण अटलबिहारी व ब्राह्मणी-वैदिकी नरेंद्र मोदी सारखे राजे राज्यकर्ते होतात व ते त्यांच्या ब्राह्मण-भारत राष्ट्राची अर्थव्यवस्था, शासनव्यवस्था व समाजव्यवस्था मजबूत करतात. म्हणजेच (SC+ST+OBC) भारत-राष्ट्राची शासनव्यवस्था, समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था खिळीखिळी करतात.
-3-
करोनासारख्या जागतिक महासंकटात मोदीजी प्रधानमंत्री म्हणून काही धोरणात्मक निर्णय घेतील, पॅकेज जाहीर करतील वा काही सुखद निर्णय घेतील अशी अपेक्षा घेऊन मोदीजींचे प्रत्येक भाषण कान देऊन ऐकले जाते, मात्र प्रत्येकवेळी पदरी निराशाच येते. अशाप्रकारे वारंवार निराशा का येते याच्या मुळाशी कोणी जाण्याचे प्रयत्न करीत नाहीत. खरे म्हणजे प्रयत्न करण्याचाही प्रश्न नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी समजावून सांगीतलेल्या दोन शत्रू राष्ट्रांचा सिद्धांत नव्या संदर्भात विस्तारून मांडला गेला पाहिजे. तेही काम आजचे पुरोगामी म्हणविणारे लोक करीत नाहीत. यांना बाबासाहेब फक्त राखीव जागांपुरतेच पाहिजे आहेत. आणी बाबासाहेबांच्या ज्या संविधानाचा हे उदो उदो करतात, ते संविधान ब्राह्मण-भारतराष्ट्र व SC+ST+OBCचे अब्राह्मणी भारत-राष्ट्र यांच्यात लोकशाही समन्वय साधणारे एक तात्पुरते 'साधन' होते. विशिष्ट काळानंतर ते या बाजूने वा त्याबाजूने निकामी होणारच होते, त्याप्रमाणे ते साधन निकामी झालेच आहे! जर SC+ST+OBC भारत-राष्ट्राचे नेते खरोखर पुरोगामी राहिले असते तर त्यांनी हे ‘समन्वयक संविधान’ नष्ट करून नवे आक्रकम समतावादी संविधान अस्तित्वात आणले असते. मात्र SC+ST+OBC भारत-राष्ट्राचे नेते बदमाष व ब्राह्मण-भारत राष्ट्राचे नेते प्रामाणिक असल्याने त्यांनी भारताचे ‘समन्वयक संविधान’ नष्ट करून नवे आक्रमक विषमतावादी संविधान अस्तित्वात आणले आहे.
ब्राह्मणी-भारत राष्ट्राच्या संविधानाचा पहिला फतवा हा आहे की, प्रत्येक संकटात वा प्रत्येक आनंदी प्रसंगात समाजाचे धृवीकरण घडवून आणले गेले पाहिजे. मागील महिन्यातील दिल्लीतील दंगल भडकाविणारे मिश्रा-ठाकूर सारखे ब्राह्मण-क्षत्रिय होते. ते उघडपणे पिस्तूल ताणून फिरत होते, पोलीसांच्या साक्षीने भडकाऊ भाषणे देत होते. तरीही या दंगलीचा मिडियामधील वृतातं आळणा म्हणजे कोणतीही चव नसलेला होता. मात्र आप पक्षाचा मुसलमान नेता ताहीर हुसेन त्याच्याच घराच्या टेरेसवर काठी घेऊन फिरतांना टिपला गेला आणी तेव्हापासून दंगलीचा वृतांत खमंग-मसालेदार चविष्ट झाला. हिंदू-मुस्लीम मसाला नसेल तर या देशात कशातही राम नाही. करोनाचे तेच झाले. जनता कर्फ्युनंतरही संसद चालू होती. संसद चालू असणे याचा अर्थ 800 सांसद, त्यांचे प्रत्येकी 5 स्टाफ व 5 कार्यकर्ते मिळून 8,000 लोकांचा हा जमावडा रोज संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत एकत्र येत होता व नंतर देशभरात आपापल्या मतदारसंघात विखूरला जात होता. त्याचवेळी मध्यप्रदेशातील कॉंग्रेसी कमलनाथांचे सरकार पाडण्यासाठी व वाचविण्यासाठी शेकडो आमदार व त्यांचे हजारो कार्यकर्ते राजस्थान ते बंगळूरू वगैरे राज्यातुन फिरून आलेत व नंतर भाजपाई चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्याच काळात कर्नाटकच्या भाजपाच्या आमदाराच्या घरी शाही थाटात लग्न-समारंभ पार पडला. यातही 4-5 हजार लोक देशभरातून एकत्र आलेत व एकाच्याही तोंडावर मास्क नसतांना पुन्हा देशभर पसरलेत, महाराष्ट्रात एका धार्मिक यात्रेत 3-4 हजार भाविक जमलेत, त्यांना विरोध करणारे पोलीस मार खाऊन पळून आलेत, अयोध्येतील एक संत रामनवमीला करोनाकडे दुर्लक्ष्य करायला सांगून लाखोंच्या संख्येने अयोध्येत येण्याचे आवाहन करीत होता. या सर्व बातम्या मिडियाला धार्मिक द्वेषाचा मीठ-मसाला नसल्याने आळणी म्हणजे कोणतीही चव नसलेल्या वाटत होत्या. मात्र निजामुद्दीनचे तबलीगी सापडताच करोनाच्या बातम्या चवदार झाल्यात आणी सर्व मिडिया एकदम तुफान बनून तुटूनच पडला. युद्ध करोनाशी आहे की मुसलमानाशी? अर्थातच मुसलमानाशीच आहे, करोना निमित्त मात्र आहे! काय ईराण-इराकमध्ये हिंदू अल्पसंख्य राहात नाहीत? काय ब्रिटन-अमेरिकेत मुसलमान राहात नाहीत? तेथील मिडिया अशा मसालेदार चटपटीत बातम्या का देत नाही? कारण तेथील जनतेच्या मेंदूंचा केमिकल लोच्या झालेला नाही. कारण त्या देशात अजून आर्य-वैदिक-ब्राह्मण सत्तेत आलेले नाहीत.
-4-
भारतात आता प्रत्येक करोनाग्रस्त हा कसा तबलीगी वा तबलिगीच्या सहवासात आला आहे, याचे रसभरीत वर्ण सुरू आहे. ब्राह्मणभारत राष्ट्राचे जावडेकर-सितारमण यांनी जाहीर केलेले एक लाख सत्तर हजार कोटी रूपयांचे पॅकेज किती गरीबांपर्यंत पोहोचले, किती राज्यांना किती निधी दिला, केंद्र शासनाने किती अन्नछत्रे सुरू केलीत, आणी तरीही या कष्टकरी लोकांचे लोंढे गावाकडे का जात आहेत, आतापर्यंत किती भूकबळी गेलेत, टाटांनी दिलेले पैसे कुठे वापरलेत, मदत करण्यासाठी अंबानीला अजून मुहुर्त का सापडत नाही, अजीम प्रेमजी मदत करतांना शासकीय यंत्रणेवर अविश्वास का दाखवितात, करोनाच्या संकटकाळात संसद अधिवेशन चालू ठेवणार्‍यांवर पोलीस कारवाई केव्हा करणार, कर्नाटकचा लग्नाळू आमदार जेलमध्ये केव्हा डांबणार, ऐन करोना संकटात देशहिताकडे दुर्लक्ष्य करणारया व एक राज्य सरकार पाडून तेथे नवे सरकार आणणार्‍यांवर कारवाई केव्हा करणार वगैरे प्रश्न ब्राह्मण-भारत राष्ट्रात गैरलागू आहेत. कारण या प्रश्नांना धार्मिक-जातीय द्वेषाचा मीठ-मसाला नाही. हे सगळे प्रश्न व्हेज आहेत. त्यामुळे असे प्रश्न विचारण्याचे धाडस कुणी करू नये. निजामुद्दीनच्या मीठ-मसाल्यातून करोना फ्रायच्या तबलीगी नॉन-व्हेज बातम्या मिडियातून घरोघरी परोसल्या जात असतांना निव्वळ आळणी व व्हेज बातम्या पाहिजेतच कशाला तुम्हाला? मोठमोठे पुरोगामी म्हणविणारे नेते, विचारवंत इतिहास-संशोधक बगैरे लोक केमिकल लोच्याला बळी पडतात, तेव्हा या देशाची चिंता निश्चितच जीवघेणी ठरते.आज भलभले पुरोगामी केमिकल लोच्याला बळी पडत आहेत. या केमिकल लोच्या विरोधात संघर्ष करायचा म्हणजे तुम्हालाही तेवढाच प्रदिर्घ व सखोल असा परिणामकारक सांस्कृतिक संघर्ष करावा लागणार आहे. परंतू त्याआधी केमिकल लोचा झाला आहे, हे तर मान्य करावे लागेल. तो मान्य होणे कठीणच ! त्यामुळे असा संघर्ष सुरू होणे आतातरी कठीण वाटते. परंतू तरीहि या ब्राह्मणी केमिकल लोच्याविरोधात लढण्याची प्रेरणा कधीतरी पुरोगाम्यांना मिळेल या अपेक्षेत सर्वांना जयजोती, जयभीम,
सत्य की जय हो!
(लेखनः 4 एप्रिल 2020)
------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270